मुक्त असण्याचा अर्थ

मृणालिनी चितळे
Tuesday, 5 March 2019

महिला दिन उंबरठ्यावर उभा असताना गेल्या शंभर वर्षात स्त्री जीवनात झालेल्या स्थित्यंतरांचा आढावा घ्यावासा वाटला नि आठवली, विसाव्या शतकाच्या सुरवातीला रूढीबंधनात जखडलेली स्त्री. स्वयंपाकघर ते माजघर एवढंच भावविश्व असलेली. समाजसेवकांच्या प्रयत्नांमुळे ती शिकायला लागली; परंतु तिच्या शिक्षणामागचा बहुतांश हेतू होता तो तिनं सुगृहिणी नि सुमाता व्हावं असा. या शतकाच्या मध्यान्हीला स्त्रिया नोकरी करायला लागल्या ते घराला आर्थिक हातभार लावण्यासाठी. त्यामागे स्वत:ला काय आवडेल या विचारापेक्षा नाइलाज अधिक असायचा. १९७५च्या आंतरराष्ट्रीय महिला वर्षाच्या निमित्तानं बाह्य जगाचं वारं तिला लागलं.

महिला दिन उंबरठ्यावर उभा असताना गेल्या शंभर वर्षात स्त्री जीवनात झालेल्या स्थित्यंतरांचा आढावा घ्यावासा वाटला नि आठवली, विसाव्या शतकाच्या सुरवातीला रूढीबंधनात जखडलेली स्त्री. स्वयंपाकघर ते माजघर एवढंच भावविश्व असलेली. समाजसेवकांच्या प्रयत्नांमुळे ती शिकायला लागली; परंतु तिच्या शिक्षणामागचा बहुतांश हेतू होता तो तिनं सुगृहिणी नि सुमाता व्हावं असा. या शतकाच्या मध्यान्हीला स्त्रिया नोकरी करायला लागल्या ते घराला आर्थिक हातभार लावण्यासाठी. त्यामागे स्वत:ला काय आवडेल या विचारापेक्षा नाइलाज अधिक असायचा. १९७५च्या आंतरराष्ट्रीय महिला वर्षाच्या निमित्तानं बाह्य जगाचं वारं तिला लागलं. संसार आणि करिअर यांची सांगड घालण्यासाठी ती धडपडू लागली. ही धडपड कष्टप्रद असली, तरी आयुष्य समृद्ध करणारी असते हे तिला उमगलं. या धडपडीतून जन्माला आला तो ‘सुपर वुमन सिंड्रोम.’ ती स्वत:ला बजावत राहिली, करिअर करतानाही पै पाहुणे, सणवार, मुलांचा अभ्यास या जबाबदाऱ्या माझ्या एकटीच्या आहेत. शिवाय स्वत:चा बांधा टिकवणं, आकर्षक दिसणं या अपेक्षांचं ओझं असतं ते वेगळंच. स्त्री म्हणून स्वत:ला सिद्ध करताना स्वत:च्या शारीरिक-मानसिक स्वास्थ्याकडे होणारं अक्षम्य दुर्लक्ष म्हणजेच ‘सुपर वुमन सिंड्रोम.’ असंख्य व्यवधानं सांभाळताना नि अनेक आव्हानं स्वीकारताना भांबावून गेलेल्या अनेक स्त्रिया आपल्या आजूबाजूला दिसतात, तेव्हा मनात येतं, की कोणत्याही क्षेत्रात खुलेपणानं वावरण्याची संधी खुणावत असताना, ‘स्त्री’ असण्याचा जाहिरातीसारख्या अनेक माध्यमांतून होणारा वापर ओळखण्याचं भान आज तिला आलं आहे का? मुक्तता आणि उच्छृंखलता, बांधिलकी आणि बंधनं या मधल्या सीमारेषा तिला तरी उमगल्या आहेत का? हे प्रश्न माझे मलाच विचारत असताना एक सुंदर कविता आठवली, आजी-नातीच्या संवादातून आत्मभानाचा प्रवास उलगडू बघणारी.
भयाण वाऱ्यानं रान पेटते.
पण चूल पेटवायची तर फुंकर घालावी लागते.
चुलीपुढे फुंकर घालता आली तर जगणे सुसह्य होते,
पुष्कळसे दुसऱ्यांसाठी, थोडेसे स्वत:साठी.
फुंकरीनं बासरीतून सूर निघतो, तर फुंकणीने जाळ पेटतो.
सूर दूरवर जाऊ द्यावा, जाळ जवळ ठेवून घ्यावा.
लक्षात घे माझे बाई, बासरी कृष्णाच्या हातात असते
राधेच्या हातात फुंकणीशिवाय काहीच नसते.
पण आजी, आम्हाला आता गरज नाही
फुंकणीची किंवा फुंकरीची.
आम्ही बटणं दाबू शकतो, हवे ते सुरू करण्यासाठी
आणि नको ते बंद करण्यासाठी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mrunalini chitale write pahatpawal in editorial