पोरवय

मृणालिनी चितळे
मंगळवार, 19 मार्च 2019

शि री-खोला! संदक फु ट्रेकच्या मार्गावरचं अतिरम्य ठिकाण. तेथील हिरव्या रंगाचं ‘ट्रेकर्स हट’ तर नदीकाठी वसलेलं. नदी म्हणजे काळ्या खडकावरून खळाळत वाहणारं पाणी होतं. हिमालयात असतं तसं तिचं रौद्र रूप नव्हतं. मध्येमध्ये तर पाऊलभर पाणी होतं. तिथं दोन दिवस राहायचं ठरवलं. ज्याला जे पाहिजे ते करायचं. वेळेचं बंधन नाही. वनात फिरायला आडकाठी नाही. वाटलं तर दुलई पांघरून वाचत पडायचं वा वामकुक्षीसाठी नदीकाठचा खडक शोधायचा किंवा पहिल्यांदाच भेटणारे पक्षी न्याहळत बसायचं. स्वत:ला सैलावून टाकायचं. वाहत्या नदीकाठी काही काळ का होईना आयुष्य स्थिरावण्याचा अनुभव.

शि री-खोला! संदक फु ट्रेकच्या मार्गावरचं अतिरम्य ठिकाण. तेथील हिरव्या रंगाचं ‘ट्रेकर्स हट’ तर नदीकाठी वसलेलं. नदी म्हणजे काळ्या खडकावरून खळाळत वाहणारं पाणी होतं. हिमालयात असतं तसं तिचं रौद्र रूप नव्हतं. मध्येमध्ये तर पाऊलभर पाणी होतं. तिथं दोन दिवस राहायचं ठरवलं. ज्याला जे पाहिजे ते करायचं. वेळेचं बंधन नाही. वनात फिरायला आडकाठी नाही. वाटलं तर दुलई पांघरून वाचत पडायचं वा वामकुक्षीसाठी नदीकाठचा खडक शोधायचा किंवा पहिल्यांदाच भेटणारे पक्षी न्याहळत बसायचं. स्वत:ला सैलावून टाकायचं. वाहत्या नदीकाठी काही काळ का होईना आयुष्य स्थिरावण्याचा अनुभव. दुसऱ्या दिवशी डोंगराच्या कुशीत राहणाऱ्या आणि रानपाखरांचं आयुष्य जगणाऱ्या मुलांचा खेळ पाहायला मिळाला. सकाळी साडेनऊच्या सुमारास/मुलं नदीकिनारी आली. सोबत बकरीची तीन पिल्लं आणि एक कुत्रा. मुलांनी छोटेछोटे दगड वाहून आणून जिथं पाण्याचा प्रवाह अगदी कमी होता तिथं बांध घालायला सुरवात केली. थोडंफार पाणी अडायला लागलं. दोन दगडांमधील फटी शेवाळं लिंपून ती बंद करायला बघत होती. दीड दोन वाजून गेले तरी न कंटाळता ‘धरण’ बांधायचा त्यांचा खेळ चालू होता. अधूनमधून कोणत्या तरी झाडाची खांडं तोडून ऊस सोलून खावा तशी खात होती. काही फळं दगडानं ठेचून कुटत होती. तीन दगडांची चूल करून भाजत होती. माशांना पकडायला त्यांनी गळसदृश काहीतरी बनवलं. साठलेल्या पाण्यात टाकलेला गळ पाहून मी त्यांना विचारलं,
‘मच्छी पकडना चाहते हो?’
‘हा तो’
‘मिल गयी क्‍या?’ त्यांनी नकारार्थी मान हलवली. त्या नकारात चिमूटभरही खंत नव्हती. दिवसभर त्यांचा प्रयत्न जारी होता. उन्हं कलायला लागली. मुलांनी आवराआवर सुरू केली. मला उगाचच हुरहूर वाटायला लागली. तेवढ्यात एका मुलानं जरासा मोठा दगड उचलला आणि नदीमध्ये रचलेल्या दगडांवर मारला. मी दचकले. पण पाठोपाठ सगळे जण दगड मारू लागले. काही काळ अडलेलं थोडंफार पाणी खडकावरून खळाळत गेलं आणि पोरांचा औटघटकेचा खेळ संपला. आपणच उभा केलेला बांध तोडूनमोडून काळ्या कातळावरून उड्या मारत पोरं निघून गेली. दुसऱ्या दिवशी आम्हाला मुक्काम हलवायचा होता. निघताना सहज लक्ष गेलं तर समोरच्या साकवावरून तीच पोरं नाचतबागडत येत होती. मागे बकरीची तीन पिल्लं आणि एक कुत्रं. हसत हसत त्यांना हात केला. त्यांनी हात हलवून आम्हाला निरोप दिला. आपलंही पोरवय आठवून असं निरभ्रपणे जगता आलं तर आयुष्य किती सहज सोपं होऊन जाईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mrunalini chitale write pahatpawal in editorial