कोळिष्टकं

मृणालिनी चितळे
मंगळवार, 9 एप्रिल 2019

जे  कृष्णमूर्ती! विसाव्या शतकातील महान तत्त्ववेत्ते. त्यांचं वैशिष्ट्य असं की ते उपदेश करत नाहीत की तुमच्या समस्यांना रेडिमेड उत्तरं देत नाहीत, तर ते करत असलेली विधानं तुमच्या बुद्धीला आणि संवेदनशील वृत्तीला आवाहन करत राहतात. विचारांना चालना देण्याचं फार मोठं सामर्थ्य त्यामध्ये असतं. एके ठिकाणी ते म्हणाले आहेत, "माणूस आपल्या आठवणी तीन प्रकारे जतन करत असतो. दगडावरची रेघ, वाळूवरची रेघ नि पाण्यावरची रेघ.' या विधानाची आठवण झाली ती शोभामुळे. तिच्या मुलाचं लग्न आठ दिवसांवर आलं होतं. निमंत्रणाच्या यादीवरून नजर फिरवताना लक्षात आलं, की किशोरीला बोलावणं करायचं राहून गेलं आहे.

जे  कृष्णमूर्ती! विसाव्या शतकातील महान तत्त्ववेत्ते. त्यांचं वैशिष्ट्य असं की ते उपदेश करत नाहीत की तुमच्या समस्यांना रेडिमेड उत्तरं देत नाहीत, तर ते करत असलेली विधानं तुमच्या बुद्धीला आणि संवेदनशील वृत्तीला आवाहन करत राहतात. विचारांना चालना देण्याचं फार मोठं सामर्थ्य त्यामध्ये असतं. एके ठिकाणी ते म्हणाले आहेत, "माणूस आपल्या आठवणी तीन प्रकारे जतन करत असतो. दगडावरची रेघ, वाळूवरची रेघ नि पाण्यावरची रेघ.' या विधानाची आठवण झाली ती शोभामुळे. तिच्या मुलाचं लग्न आठ दिवसांवर आलं होतं. निमंत्रणाच्या यादीवरून नजर फिरवताना लक्षात आलं, की किशोरीला बोलावणं करायचं राहून गेलं आहे. मी आणि शरदनं तिला दोन- तीन वेळा निदर्शनास आणून दिलं. तेव्हा काहीसं वैतागून ती म्हणाली, "तिनं तिच्या तन्मयच्या लग्नात मला आदल्या दिवशी फोन केला होता, मीही तसाच करणार आहे.' तिचं उत्तर ऐकून मी थक्क झाले.

कुठलेकुठले रुसवेफुगवे, राग-उद्वेग आपल्या मनात किती खोलवर जाऊन बसलेले असतात नाही काय? वास्तविक आपल्याला माहीत नसतं असं नाही, की आपल्या मेंदूची लक्षात ठेवण्याची क्षमता मर्यादित असते. आपल्याबाबत घडणारे किंवा आपल्या बाजूला घडणारे सर्वच्या सर्व प्रसंग लक्षात ठेवणं शक्‍य नसतं. मग त्यातील काय लक्षात ठेवायचं नि काय सोडून द्यायचं हे आपल्या हातात असूनही बोचरे क्षण पाण्यावरच्या रेघेसारखे का नाही नाहीसे होऊ शकत? नकोशा वाटणाऱ्या आणि म्हटलं तर क्षुल्लक वाटाव्या अशा आठवणी अशा शुभ प्रसंगी का उफाळून येतात? किशोरीनं शोभाला ऐनवेळी बोलावलं हे हेतुपुरस्सर असेल की अनावधानानं झालेली ती चूक असेल? काहीही असलं तरी ती चूक आहे, हे शोभाला कळत असेल तर तीच चूक तीही करत नव्हती काय? अशा प्रसंगांना पाण्यावरच्या रेघेइतकंच महत्त्व देता आलं, तर दुसऱ्या क्षणाला ती रेघ पुसली जाऊ शकते आणि निर्लेप मनानं आपण त्या माणसांशी वागू-बोलू शकतो. प्रत्यक्षात मात्र नकोशा वाटणाऱ्या प्रसंगांची जाळी आपण आपल्याभोवती विणत जातो. त्या कोळिष्टकात गुंतत जातो. कधी स्वत:ला कुरतडत राहतो, कधी दुसऱ्याला दोष देत राहतो. आजचा आनंद मात्र हरवून बसतो. वास्तविक कोणत्या आठवणी दगडावरच्या रेघेप्रमाणे जपायच्या, कोणत्या वाळूवरच्या नि कोणत्या पाण्यावरच्या हे निवडण्याचं स्वातंत्र्य आपल्याला असतं, पण चुकीच्या निवडीमुळे भूतकाळाचं कधी, कसं आणि केवढं मोठं ओझं होऊन जातं हे आपलं आपल्यालाच कळेनासं होतं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mrunalini chitale write pahatpawal in editorial