शिक्का

mrunalini chitale
mrunalini chitale

मी एकदम विसराळू आणि वेंधळी. त्यापायी लहानपणापासून मी किती बोलणी खाल्ली वा स्वत:चं हसं करून घेतलं याला सुमार नाही. पेनपेन्सिल, वह्यापुस्तकं, पिशवी, पर्स यांची मोजदाद न केलेली बरी. एकदा मी दप्तर घेऊन गच्चीवर अभ्यासाला गेले, ती दप्तर विसरून आले. रात्री नेमका मुसळधार पाऊस. त्यामध्ये वह्यांमधील अक्षर अन्‌ अक्षर गेलं वाहून. मी आईला सांगत राहिले, की काल समोरच्या झाडावर एक पंचरंगी पक्षी येऊन बसला. त्याला पाहायच्या नादात... त्या दिवसापासून माझ्या मागच्या ‘विसराळू’, ‘वेंधळी’ या बिरुदांमध्ये ‘नादिष्ट’ या अजून एका शब्दाची भर पडली. विसराळूपणापायी वस्तू हरवल्याचं मला खूप वाईट वाटायचं. स्कर्टच्या खिशात ठेवलेले पैसे धुवायला गेले की डोळ्यांत पाणी यायचं. मग कुणीतरी समजूत काढायचं की जरा वय वाढलं की कमी होईल वेंधळेपणा, येईल मॅच्युरिटी. परंतु, किती वय वाढलं की असं घडेल हे मात्र कळायचं नाही. माझ्या पहिल्या मुलीचा जन्म झाला, तेव्हा मीरा मला भेटायला आली नि बाळाला पाहत पुटपुटली, ‘आता हिला कुठे विसरून येऊ नकोस म्हणजे झालं.’ मी हतबुद्ध, तर तिच्या चेहऱ्यावर योग्य सल्ला दिल्याचा भाव. एकदा तर कहर झाला. मंगळवारी एका मंडळात मी व्याख्यान द्यायला गेले. परत येताना न विसरता छत्री घेऊन आले. घरी येऊन पाहते, तो माझी छत्री जागेवर. मला इतकं अपराधी वाटलं की मी रिक्षा करून परत गेले तर सभागृह रिकामं. पुढच्या मंगळवारी छत्री देऊन आले. दरम्यानच्या काळात माझ्या हातातील छत्री कुणीतरी हिसकावून घेत असल्याची वाईटसाईट स्वप्नं पडत राहिली. वर रिक्षाचा भुर्दंड. माझा विसराळूपणा नि वेंधळेपणा कमी करण्याचे अनेक उपाय करून पाहिले. पण फारसा फरक पडला नाही. मग झालेल्या गडबड घोटाळ्यांबाबत मी कधी पडतं घेत गेले, तर कधी का विसरले याचं स्पष्टीकरण, तर कधी आपल्याच वागण्याचं समर्थन करत राहिले. असं वेंधळेपणानं जगताना माझी मलाच एक युक्ती सुचली. नातेवाईक, मित्रमंडळी यांना मी बजावून सांगितलं, ‘मी ही अशी आहे, विसराळू, नादिष्ट, बावळट! कपाळावर शिक्काच मारून घेतला म्हणा ना. त्यामुळे माझ्यात काही बदल झाला नाही; पण मला नावं ठेवणाऱ्यांच्या जिभेची धार थोडी कमी होत गेली. मग बसमध्ये शाल राहिलेली दिसली वा हॉटेलमध्ये पर्स की ‘मृणालिनी, तुझं काय विसरलंय बघ.’ असे काहीसे उपरोधमिश्र प्रेमळ स्वर कानावर यायला लागले. वेंधळेपणावर शिक्कामोर्तब झाल्यामुळे न विसरण्याचा धाक आणि धाकापायी येणारा ताण कमी होत गेला. आपल्या अवगुणांचे शिक्के आपणच मारून घेतले, की बोलणी कमी खायला लागतात, हे मला जरा उशिराच कळलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com