esakal | म्हातारी न इतुकी...
sakal

बोलून बातमी शोधा

mrunalini chitale

म्हातारी न इतुकी...

sakal_logo
By
मृणालिनी चितळे

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वृद्धाश्रमाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यावर एकेका आजींच्या खोलीत जाऊन त्यांची ओळख करून घेत होते. शोभनाताई देशपांडे यांच्या खोलीत गेल्यावर प्रथमदर्शनी नजरेत भरला तो तेथील नीटनेटकेपणा. मायक्रोवेव्ह, फ्रीज, भलामोठा टीव्ही, जमिनीवर भारीपैकी लिनोनियम. भिंतीवर १०-१२ लहान मुलांचा कोलाज केलेला फोटो... प्रत्येक वस्तूला लाभलेला सुखवस्तूपणाचा स्पर्श जाणवत होता. या साऱ्याला साजेशी त्यांची सुबक ठेंगणी मूर्ती. नितळ गोरा रंग. बारीक कापलेले केस. स्लिव्हलेस ब्लाऊज. त्यानंतर अनेकदा त्यांच्याशी भेटीगाठी झाल्या. त्यांच्याशी बोलताना जाणवलं, की शोभनाताई म्हणजे वानप्रस्थाश्रमाचं नियोजन कसं करावं याचा आदर्श वस्तुपाठ आहे. नर्सिंगचा कोर्स केल्यावर २२ वर्षे त्यांनी ‘ससून’मध्ये नोकरी केली. निवृत्त झाल्यावर कुठं रहायचं हा प्रश्न त्यांनी निवृत्तीपूर्वी वृद्धाश्रमात खोली घेऊन सोडवून टाकला. नोकरी संपल्यावरही ‘स्वान्त सुखाय’ आयुष्य जगणं त्यांच्या स्वभावाला मानवणारं नव्हतं. त्यांनी वसतिगृहातील टेलिफोन बूथवर काम करायला सुरवात केली. एकदा, अमेरिकेतील एका मराठी कुटुंबात बालसंगोपनासाठी नर्स हवी असल्याची वर्तमानपत्रातील जाहिरात त्यांना दिसली. त्यांनी केलेल्या अर्जाला लगेच उत्तर आलं. मग वर्ष/सहा महिने नवजात अर्भकाच्या देखभालीसाठी परदेशात जाण्याचा जणू परिपाठ पडला. लाघवी स्वभाव आणि नर्सिंगचा अनुभव यामुळे त्यांना नोकरीसाठी आपणहून बोलावणी येऊ लागली. त्यांच्यामुळे आपल्या मुलांवर भारतीय संस्कार होत असल्याचा अनुभव परदेशस्थ भारतीयांना सुखावत होता. शिकागो, कॅलिफोर्निया, डल्लास, फ्लोरिडा, लंडन, टांझानिया अशा ठिकाणी जाऊन एकूण बारा मुलांचं त्यांनी बेबी सिटिंग केलं. एकदा कौतुकानं भिंतीवरील फोटो दाखवत त्या म्हणाल्या, ‘ही सारी माझीच नातवंडं.’ ज्या घरांत त्या राहिल्या त्यांच्याशी त्यांनी आजीचे नाते जोडलेच, शिवाय त्या सर्वांना संस्थेच्या भाऊबीज निधी संकलनाच्या कामाशी जोडून घेतले. आतापर्यंत काही लाख रुपयांचा निधी शोभनाताईंनी जमवला आहे. याशिवाय वृद्धाश्रमासाठी त्यांनी संगणक, प्रिंटर, टीव्ही, बीपी बघण्याचं मशीन अशा अनेक वस्तू घेऊन दिल्या आहेत. संस्थेच्या दवाखान्यात सेवाभावी वृत्तीनं काम केलं आहे.

शोभनाताईंना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अनंत दु:खांशी सामना करावा लागला आहे. परंतु, त्याचा पुसटसाही ओरखडा त्या जाणवू देत नाहीत. त्या म्हणजे उत्साह आणि प्रसन्नता यांचं उसळतं कारंजं आहे. मैत्रिणींबरोबर पत्ते खेळणं, सणवार साजरे करणं यामध्ये त्यांचा पुढाकार असतो. वयोमानाप्रमाणे त्या थकल्या असल्या, तरी त्यांच्या रोमारोमांत भरलेला उत्साह आणि प्रसन्नता त्यांना स्वस्थ बसू देत नाही. गेल्या आठवड्यातील गोष्ट, माझ्या या ब्याऐंशी वर्षाच्या मैत्रिणीला मी भेटायला येत असल्याचं सांगितलं, तर फणसाची भाजी करून ती माझी वाट पाहात होती.

loading image