अनोखं नातं

मृणालिनी चितळे
मंगळवार, 18 जून 2019

जून महिना उजाडला की शाळा भरण्या-सुटण्याच्या सुमारास रिक्षा मिळणं अवघड असतं. लोकलला जशी माणसं लटकलेली असतात, तशी या शाळांच्या रिक्षांना दप्तरं, डबे, रेनकोट, पाण्याच्या बाटल्या लटकत असतात. आत दाटीवाटीनं बसलेल्या मुलांचा दंगा चालू असतो. एकमेकांना टपला मारणं, खोड्या काढणं, जोडीला रिक्षाफेम गाणं, ‘ओए ओए कांदेपोहे, बच्चा रोये, लेट हो जाए, आज भी...’ शाळा सुटायच्या आणि भरायच्या वेळी शाळेच्या दारात ५०-६० रिक्षांच्या रांगा लागलेल्या असतात. घंटा झाली की धरण फुटावं तसा मुलांचा लोंढा बाहेर पडतो. गणवेशातील सगळीच मुलं सारखी दिसत असतात.

जून महिना उजाडला की शाळा भरण्या-सुटण्याच्या सुमारास रिक्षा मिळणं अवघड असतं. लोकलला जशी माणसं लटकलेली असतात, तशी या शाळांच्या रिक्षांना दप्तरं, डबे, रेनकोट, पाण्याच्या बाटल्या लटकत असतात. आत दाटीवाटीनं बसलेल्या मुलांचा दंगा चालू असतो. एकमेकांना टपला मारणं, खोड्या काढणं, जोडीला रिक्षाफेम गाणं, ‘ओए ओए कांदेपोहे, बच्चा रोये, लेट हो जाए, आज भी...’ शाळा सुटायच्या आणि भरायच्या वेळी शाळेच्या दारात ५०-६० रिक्षांच्या रांगा लागलेल्या असतात. घंटा झाली की धरण फुटावं तसा मुलांचा लोंढा बाहेर पडतो. गणवेशातील सगळीच मुलं सारखी दिसत असतात. रिक्षावालेकाका मात्र आपल्या मुलांना अचूक टिपतात आणि मुलं आपापल्या रिक्षांना.खरंतर मुलांना शाळेत पोचविण्याचं काम रिक्षाचालकांनी व्यवसाय म्हणून स्वीकारलेलं असतं, परंतु हळूहळू मुलं आणि त्यांच्यात भावबंध निर्माण होतात. मुलांचे आई-वडील नोकरी करत असले की शाळेतल्या बारीकसारीक गोष्टी पालकांपर्यंत पोचविण्याची जबाबदारी रिक्षाचालक काका मायेनं उचलतात आणि मुलांना त्यांच्या हाती सोपवून पालक निर्धास्त होतात. रिक्षाचालकांनी आपणहून स्वीकारलेलं मुलांचं पालकत्व लक्षात घेऊन काही शाळांमधून शाळा सुरू झाली की पालकांप्रमाणे रिक्षाचालकांचीही सभा घेतली जाते. त्यांना शाळेचे नियम आणि वेळा समजावून दिल्या जातात.

पुण्यातल्या एका शाळेत स्नेहसंमेलनाच्या वेळी श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला जातो. मुलांविषयी ते जे प्रेम आणि जबाबदारीची जाणीव जपतात, त्याची दखल घेण्याची ही पद्धत कौतुकास्पद आहे. मुलांच्या दृष्टीने रिक्षावालेकाका म्हणजे त्यांचं परमदैवत असतं. आपल्या वाढदिवसाला त्यांना हे काका हवेच असतात. शिवाय या खास दिवशी त्यांच्या इतर मित्र-मैत्रिणींना घेऊन येण्याचं काम हे काकाच करतात. रिक्षातला एखादा दोस्त आजारी पडल्यामुळे बरेच दिवस शाळेत येऊ शकला नाही, तर काका मुलांना घेऊन त्याला भेटायला जातात. वर्ष संपलं की आपापल्या रिक्षातील मुलांसाठी वडापाव नि आइस्क्रीमची पार्टी आयोजित करतात. त्यांना बागेत घेऊन जातात. मुलं सुटीसाठी बाहेरगावी गेली तर आपल्या काकांसाठी भेटवस्तू घेऊन येतात आणि मुलांनी रिक्षात दंगा केला की काका वडीलकीच्या नात्यानं रागावतातही. दिवसेंदिवस शहरं आणि गावं चारी बाजूंनी हातपाय पसरत चालली आहेत. लोकवस्ती वाढत चालली आहे. शाळेत जाणाऱ्या मुलांची संख्या वाढली आहे. रस्त्यावरच्या वाहनांच्या संख्येत तर रोजच्या रोज भर पडत आहे आणि घरातील माणसांची संख्या मात्र कमी होत चालली आहे. आपल्या मुलांची जबाबदारी सोपविण्यासाठी पर्यायी व्यवस्था निर्माण होणं ही आजच्या काळाची गरज आहे. गरजेतून निर्माण झालेल्या या व्यवस्थेतही उमटणारे हे सौहार्दाचे स्वर नि जपलं जाणारं नातं नक्कीच सुखावणारं आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mrunalini chitale write pahatpawal in editorial