राजधानी मुंबई : आदित्याय नम: | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aaditya Thackeray
राजधानी मुंबई : आदित्याय नम:

राजधानी मुंबई : आदित्याय नम:

वडिलांच्या जबाबदाऱ्या त्यांच्या मुलांनी सांभाळणे, त्यांना सर्वतोपरी मदत करणे ही भारतीय परंपरा आहे. जे काही वडिलोपार्जित संचित आहे, ते जपायचे- वाढवायचे, त्यात भर टाकायची यासाठी नवी पिढी मनापासून प्रयत्न करत असते. गेली काही वर्षे आदित्य उद्धव बाळासाहेब ठाकरे हे कर्तव्य इमानेइतबारे पार पाडत आहेत. भाजपची आता शिवसेनेला परकी झालेली मंडळी त्यांना फारसे काही जमत नाही, असा टोमणा मारतीलही; पण त्यात काही तथ्य नाही. आदित्य मन:पूर्वक कर्तव्यपालन करतात. सत्तासूत्रे हाती ठेवत दुरून नियंत्रण ठेवण्याची शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची रिमोट कंट्रोली शैली बाजूला ठेवून उद्धव ठाकरे थेट मुख्यमंत्री झाले, त्याआधीच आदित्य रिंगणात उतरून आमदार म्हणून निवडून आले होते. प्रबोधनकार ठाकरे यांनी ‘माझा मुलगा मी महाराष्ट्राला अर्पण करतो आहे’ असे जाहीर करत बाळासाहेबांना सार्वजनिक जीवनात आणले होते. बाळासाहेबांनीही 'उद्धवला सांभाळा, आदित्यला सांभाळा’ असे भावनिक आवाहन अखेरच्या काळात केले होते. अलीकडेच मुख्यमंत्र्यांनी ‘आदित्य आपल्याला खूप मदत करतात’, असे जाहीरपणे सांगितले. एका घरात दोन मंत्रीपदे उगाच नक्कीच दिली गेली नसतील.

उद्धव ठाकरे विचारपूर्वक पावले टाकतात. परंपरेला मोडता घालून स्वत: मुख्यमंत्री होण्याचे त्यांनी ठरवले, ते भाजप व राष्ट्रवादी अशा कावेबाज पक्षांना पुरुन उरण्यासाठी. शिवसेनेची वाढ करण्यासाठी त्यांच्याकडे अन्य पर्याय नव्हता. आदित्य यांचे नवागत नेतृत्व सर्वमान्य व्हावे, यासाठीही त्यांना मंत्रिपद दिले गेले असेल. शिवसेनेच्या जुन्या रुपडयाशी अगदी विसंगत असणारे आदित्य शांत संयत वागतात. कविता करतात. सध्याही ते प्लास्टिकमुक्ती ,प्रदूषण रोखणारी इलेक्ट्रिक वाहने असे महत्त्वाचे अन भविष्यगामी प्रकल्प राबवत असतात. हे प्रशंसनीय आहे. शिवसेनेत त्यांनी मावसभाऊ वरूण सरदेसाई ,सूरज चौहान ,अमोल कीर्तीकर ,अमेय घोले ,राहुल कनाल अशी विश्वासाची मंडळी एकत्र करून पर्यायी यंत्रणा तयार केली आहे. पिढीनुसार बदल होत असतातच. त्यात काही गैर नाही. प्रश्न आहे तो कधीही ६० ते ६५ अशी राज्यातली एकपंचमांश आमदा संख्या गाठू न शकलेल्या शिवसेनेला ते पुढे नेऊ शकतील का? अन हे ६० ,६५ आमदार त्यांना नेता मानतील का हा.

आजचा युगधर्म

सत्ता कुटुंबातच ठेवणे आजचा युगधर्म झालाय. राहुल गांधींना यश मिळत नसले तरी कॉंग्रेसचा आटापिटा थांबलेला नाही. जगातही हे दिसते. मात्र बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेले शिवसेना नावाचे गारुड जपण्यासाठी अशी घराणेशाही लागू पडेल का ?की मुळात राजकारणात रस नसलेल्या उध्दव ठाकरेंना मुलाला येथे रुळवत आराम करायचा आहे ? राज यांना दूर सारून वारसाहक्क त्यांनी स्वत:कडे ठेवला. त्यांच्या घरात पुढे सौम्य आदित्य आणि आक्रमक तेजस यांच्यात संघर्ष होईल का? कुणास ठाऊक. सध्याचा मुद्दा आहे तो सेनेला नेतृत्व देण्याचे कसब आदित्य यांच्यात आहे काय हा. ते सत्तेत येताच कोविड संकट आले, त्यावेळी वडिलांना शक्य नसल्याने राज्यभराचे दौरे मुलाला करता आले असते. शिवसेनेतला सेवाभाव जागवता आला असता.

भाजपने अभिनेता सुशांतसिंह याच्या मृत्यूप्रकरणाचे धागेदोरे आदित्यपर्यंत नेण्याचे अप्रत्यक्ष प्रयत्न सर्वशक्तीनिशी केले म्हणतात,तेंव्हा आदित्य शांत राहिले. चवताळले नाहीत. हा गुण का अवगुण ते नव्या काळात सांगता येणार नाही. मुख्यमंत्रीपद स्वीकारलेल्या वडिलांवर शस्त्रक्रिया झाली तेंव्हा आदित्य परदेशात पर्यावरणबदल परिषदेचे निमंत्रण मिळवून हजर झाले. त्यांचे तसे बाहेर जाणे काही विशिष्ट हेतूंनी असावे,जोडलेल्या धनाचे व्यवस्थापन करण्यासाठी ते बाहेर होते, अशी कुजबूज झाली. आवश्यक होते म्हणून आदित्य यांना बरेच काही करावे लागत असावे. सध्या ते सक्रिय दिसतात. लग्नसमारंभ ,संमेलने यात हजेरी लावताना दिसतात. नेता होण्यासाठी तेवढेच पुरते काय? आजाराने थकलेले बाबा पुन्हा कार्यरत होतील; पण मुलाला लॉंच करण्याची त्यांची इच्छा आता लपलेली नाही. बिजू नवीन पटनाईक ,करुणानिधी, स्टालिन या पितापुत्रांच्या जोड्या मुख्यमंत्रीपद सांभाळत्या झाल्या. त्यांच्या प्रादेशिक पक्षांना तेथे लोकांचे पाठबळ मिळाले. शिवसेना असा एकछत्री अंमल गाजवू शकेल?

मुंबई महापालिका पुन्हा जिंकणे शिवसेनेसाठी आवश्यक आहे. तीन पक्षांचे सरकार प्रभाव पाडू शकलेले नाही.अशा वेळी एखाद्या नेत्याने हे आव्हान पेलायचे असते. मतदारांचे सरासरी वय कमी झालेले असताना आदित्यसारख्या तरुण नेत्यांना मोठी संधी असते. त्यांनी नवे भान द्यायचे असते. आधुनिकता समाजाला आवडते, त्यामुळे मुंबईतल्या वरळी सी -लिंकवरचे लेझर शोसारखे आदित्यप्रयोग जनतेला भावतात. मात्र नेत्याभोवती उभी झालेली लाचारांची फळी नागरिकांना आवडत नाही. आदित्य यांचे लॉंचिंग प्रशांत किशोर यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वीच केले. ‘आदित्यसंवाद’ सुरु झाले. हे कार्यक्रम पूरक होते, शिवसेनानेत्यांच्या खांद्यावर त्याची जबाबदारी होती. शिवसेनेतले ज्येष्ठ दुखावले गेले आहेत. त्यांना चुचकारत नवे रक्त सक्रिय करणे आवश्यक आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांत विशेषत: नागरी भागात शिवसेनेला विजय मिळवावा लागेल. ते जलवा दाखवतील का ते पाहायचे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top