राजधानी मुंबई : महाराष्ट्रात भाजप पुन्हा फ्रंटफूटवर!

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांना सामोरे जाताना भाजप आता अधिक आत्मविश्वासाने वावरेल. विधानसभा निवडणुकांत तीन राज्यांत भाजपला मिळालेल्या यशाचे काही पडसाद महाराष्ट्रातही उमटतील.
BJP Party
BJP Partysakal

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांना सामोरे जाताना भाजप आता अधिक आत्मविश्वासाने वावरेल. विधानसभा निवडणुकांत तीन राज्यांत भाजपला मिळालेल्या यशाचे काही पडसाद महाराष्ट्रातही उमटतील.

महाराष्ट्राच्या प्रत्येक निवडणुकीत क्रमांक एकचा पक्ष ठरूनही भारतीय जनता पक्ष गेली तीन-साडेतीन वर्षे गोंधळलेल्या स्थितीत होता. चार राज्यांचे विधानसभा निवडणूक निकाल ‘सहन करण्याची’ ही अवस्था संपवू शकतात. लोकसभेच्या ऐन रणधुमाळीत त्या वेळच्या एकसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात निघालेली `अंमलबजावणी संचालनालया’ची (ईडी) नोटीस, ‘समोर पहिलवान दिसत नाही’ हे देवेंद्र फडणवीसांनी अतिआत्मविश्वासापोटी उच्चारलेले वाक्य, केंद्रीय नेत्यांनी कापलेली नेत्यांची तिकीटे या चुकांच्या मालिकेत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा मुद्दा उपस्थित करत थेट पर्यायी सरकार उभे करण्याचा घेतलेला निर्णय असे सगळे काही विरोधात जात होते.

दोन वर्षे सरकारबाहेर राहिल्यानंतर या ‘महाशक्ती’ने प्रेरणा देत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही प्रादेशिक पक्ष फोडले. सरकार आले; पण मुख्यमंत्रिपद मिळाले नाही. ज्या अजित पवारांवर आरोप केले, त्यांना मानाने सत्तेत शेजारी बसवून घ्यावे लागले. या सर्व निर्णयांचा भाजपच्या कार्यकर्त्यांवर खोल परिणाम झाला होता.

१०४ संख्या असतानाही सर्वांत कमी मंत्रिपदे ही अवस्था कोणत्याही राजकीय पक्षाला कशी आवडेल? पण अपरिहार्य म्हणत जे स्वीकारावे लागत होते, ते संपू शकेल असा विश्वास मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थानातल्या विजयाने महाराष्ट्राला दिला असेल. सत्तेचे सुखावणारे वारे अन्य राज्यात पसरले असले तरी त्याची हवीहवीशी गुलाबी थंडी महाराष्ट्र भाजपला खचितच जाणवत असणार.

राजकारण हे असेच असते-भावनिक आणि व्यावहारिक. यातला पहिला भाग भावनिक. नरेंद्र मोदींची लोकप्रियता कायम असली तरी २०२४ची निवडणूक जड तर जाणार नाही ना, या शंकेचा उच्चार नियोजनकर्ते, माध्यमे वारंवार करतात. माध्यमांचे ते कामच आहे; पण कार्यकर्त्यांनाही या चर्चांची झळ बसू लागली होती.

तीन राज्ये २०१९ मध्ये समवेत नव्हती तरी लोकसभेचे मैदान मारले गेले होते. आता केवळ सहा महिने शिल्लक असताना लोकसभेतले यश टप्प्यात आले आहे, असा भावनिक दिलासा निकालांनी दिला आहे.

पुढचा मुद्दा व्यावहारिक ! ‘मातोश्री’ची तमा न बाळगता एकनाथ शिंदे बाहेर पडले, म्हणून त्यांचे प्रमाणाबाहेर कौतुक करावे लागत होते. शिंदे जनतेत वावरतात, त्यामुळे लोकप्रिय होताहेत. मराठा समाजातले असल्याने त्यांचा खूप फायदा होतो आहे, हे लक्षात घेत भाजप काहीसे नमते घेत होते. शिंदे दिवसरात्र मेहनत करत असले तरी त्यांचे सहकारी फार प्रभावी नाहीत.

शिंदेंचे पाठीराखे खासदार निवडून येण्याची शक्यता कमी असल्याचे अहवालही भाजपला चिंतेत टाकणारे होते. आता या सहकाऱ्यांशी भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेतून बोलू शकेल. बरोबरीचा नव्हे, तर मोठेपणाचा व्यवहार बोलाचालीत करता येईल.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे मंत्री अनुभवी, हुशार; पण या तल्लख नेत्यांना देशात मोदीत्वाचा जयजयकार सुरू आहे हे कळेल; अन् औषधावाचून खोकला पळेल, असे भाजप कार्यकर्त्यांना वाटत आहे.

मोदी नावाच्या अद्भुत रसायनाची सध्या चलती आहे हे वेळीच ओळखत अडलेल्या विकासासाठी ‘राष्ट्रवादी’ने काही महिन्यांपूर्वी टोपी बदलली. या हालचाली आत्ता सुरू झाल्या असत्या तर, कोण जाणे भाजपने ‘आता जागा नाही’ म्हणत दरवाजे बंदही केले असते. या झाल्या भाजपसाठीच्या सत्तांतर्गत व्यावहारिक बाबी. अन्य लाभही व्यवहारात आहेतच.

‘भारत जोडो यात्रे’नंतर राहुल गांधी यांच्या नेतृत्वातल्या काँग्रेसला आजवर गड राहिलेल्या विदर्भाने हात दिला असता. गेल्या विधानसभेत विदर्भात जागा कमी झाल्या होत्याच, पण आता विदर्भाला लागून असलेल्या छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात भाजपला कौल मिळाला असल्याने त्याचा प्रभाव इकडेही निकालांवर पडू शकेल. शिवसेना फुटल्याने मराठवाड्यात लाभाची शक्यता आहेच.

पश्चिम महाराष्ट्रात ‘राष्ट्रवादी’तल्या फुटीने एनडीएच्या विकासाला फट दिली आहे. रामंदिर निर्माणानिमित्त होणारा संपर्क, देशात तयार होऊ शकणारे हिंदुत्ववादी वातावरण याचाही फायदा महाराष्ट्रात भाजपला होण्याची शक्यता आहेच.

गुलाबी वादळ शमले

तेलंगणात भाजपच्या जागा वाढल्या; पण खरे कौतुक काँग्रेसचे. त्यांनी निर्विवाद यश मिळवले. महाराष्ट्रातले माणिकराव ठाकरे तेथे काँग्रेसचे प्रभारी होते. त्या निकालांनी केसीआरना हरवले. महाराष्ट्रात पाय रोवण्यासाठी सरसावलेल्या त्यांच्या भारत राष्ट्र समितीने (‘बीआरएस’) प्रचंड निधी ओतायची तयारी दाखवली होती.

आता सत्ता नसल्याने महाराष्ट्राकडे वळलेला ओघ संपेल. ‘बीआरएस’चा भाजपला फायदा होईल, मतविभाजन होईल असे बोलले जाई, ते मात्र टळले. गुलाबी वादळ वावटळ ठरले अन् शमले.

कदाचित लोकसभा निवडणुका एक-दोन महिने लवकर होऊ शकतील. भाजपच्या आश्रयाला आलेल्या दोन पक्षांकडून लोकसभा निवडणुकीसाठी मेहनत करून घेतली जाईल. आता लोकसभेत मेहनत करा, विधानसभेत जास्त जागांचे फळ मिळेल, असेही कदाचित सांगितले जाईल. सवलतींची खैरात मतदारराजावर केली जाईल.

मोदी म्हणाले आहेत, ‘आमच्या दृष्टीने जाती चार - गरीब, युवक, दलित आणि महिला.’ त्यामुळे आता मोदींच्या उत्तरेतील जयघोषात महाराष्ट्रातील प्रादेशिक स्वर क्षीण होतील का ते पाहायचे. शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या विरोधाचा सामना करत ४८ जागांचा महाराष्ट्र भाजपला सोपा ठरणार का, ते आता पाहायचे. निवडणुकांना सामोरे जाताना भाजप आता अधिक आत्मविश्वासाने वावरणार, एवढे या निकालांवरून नक्कीच म्हणता येते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com