राजधानी मुंबई : गुड कॉप, बॅड कॉप | Paramvir Singh | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Parambir Singh
राजधानी मुंबई : गुड कॉप, बॅड कॉप

राजधानी मुंबई : गुड कॉप, बॅड कॉप

कारवाई झाली तरी न्यायप्रक्रियेला सामोरे जाण्याचा मार्ग न स्वीकारता परमवीरसिंग लपून का बसले आहेत?ते देशात आहेत, की देशाबाहेर? आपल्या व्यवस्थेविषयीच काही गंभीर मुद्दे यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत.

प्रशासनालाही चांगला आणि वाईट असे दोन चेहरे असतात का? सध्या पोलिसांच्या बाबतीत जे जे समोर येत आहे, ते या दुपेडी व्यवस्थेचे वर्तमानातील प्रकटीकरण समजायचे का? उत्तरप्रदेशातले पोलिस अधिकारी अमिताभ ठाकूर नोकरीचा राजीनामा देऊन तेथील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निवडणुकीत आव्हान देणार आहेत. वर्दीचा त्याग त्यांनी सत्तेला आव्हान देण्यासाठी केला आहे. राकेशकुमार दुबे या आयपीएस अधिकाऱ्याने बेहिशेबी मालमत्ता जमावल्याने कारवाईचा सामना केला आहे. आसामात पोलिस उपमहानिरीक्षक रौनक हझारिका यांना अवैध कामांमुळे नारळ मिळाला आहे. महाराष्ट्रात आज पोलिसप्रकरणे गाजताहेत. परमवीरसिंग प्रकरणावर पोहोचण्याआधी एक स्मरण. राहुल रायसूर हे महाराष्ट्र केडरचे अधिकारी. १९८१ च्या तुकडीतले. अंमलीपदार्थांशी संबंधित घटना चर्चेला आली .अमेरिकेने त्यांच्या मागे शक्ती उभी केली म्हणतात. मग ते संयुक्त राष्ट्रांच्या सेवेत पोहोचले. कुटुंबकबिला परदेशात पोहोचला. मग सूरसाहेबांनी नोकरी धाब्यावर बसवली. प्रकरण ‘मॅट’सह सर्वत्र गाजले.आज ते सगळेच विस्मृतीत गेले आहे. आज गाजताहेत परमवीरसिंग .महानायक ते खलनायक. लंबक झुलतोच आहे. तो स्थिरावेल कुठे, केव्हा ,कुणामुळे हे प्रश्न अनुत्तरीत आहेत. फक्त कायदा त्याच्या रक्षणाची जबाबदारी असलेल्या वर्दीतल्या माणसालाच शोधतो आहे. परमवीरांना संरक्षण हवे आहे अन बिळातून बाहेर या, असे न्यायालय सांगते आहे. कुठल्याही हिंदी सिनेमाला न सुचलेले कथानक आहे हे! सुरस चमत्कारिक आणि लाजिरवाणे.

महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर प्रचंड उलथापालथी सुरु असताना नोकरशाही त्यात ओढली जाणे अपरिहार्य होते आणि काहीसे स्वाभाविकही .पूर्वीच्या राजवटीत ‘गुड कॉप’ ठरलेले काही अधिकारी अचानक ‘बॅड कॉप’ ठरवले गेले होते. आज सीबीआयचे प्रमुख झालेले सुबोध जयस्वाल, राज्याचा गुप्तवार्ता विभाग सांभाळणाऱ्या रश्मी शुक्ला, शहरी नक्षलवादावर प्रहार करणारे पुणे, नागपूर अशा महत्त्वाच्या शहरात आयुक्तपद निभावणारे डॉ.व्यंकटेशन, सुपरकॉप देवेन भारती हे सत्ताबदलानंतर ‘बॅड कॉप’ वर्गात गेले. काही लगेच आणि काही हळुहळू. विवेक फणसळकरांसारखे नेमस्तही काहीसे बाजूला पडले .पाच वर्षांपूर्वी कुठेही नसलेले अमिताभ गुप्ता, रितेशकुमार त्या राजवटीत ‘बॅड कॉप’ नव्हते हे खरे; पण त्यांची गणना कुठल्याही महत्त्वाच्या मांदियाळीत होत नव्हती. ते ‘गुड कॉप’ होत महत्त्वाच्या जागांवर विराजमान झाले. या चढाओढीच्या किंबहुना राजकीय सापशिडीच्या खेळात हेमंत नगराळेंसारखे काही पोलिस अधिकारी प्रारंभी दोन्ही राजवटीत ‘गुड’ यादीतले स्थान अबाधित राखू शकले. नगराळे पोलिस महासंचालक पदावरून पायउतार झाले खरे; पण ते आजही मुंबई आयुक्तपदाची महत्त्वाची जबाबदारी सांभाळत आहेत.

लपून का बसले?

पण परमवीरसिंगांची कहाणी या सगळ्या पलिकडची आहे. राजवटी बदलल्या तरी काही अधिकारी कायम महत्वाची पदे सांभाळतात. तशा एका अती बडया अधिकाऱ्याची आज पुरती वाट लागली आहे. प्रथितयश पोलिस अधिकारी आज जवळपास गुन्हेगारासारखे दिवाभीत आयुष्य जगत आहेत. ज्यांच्या नावाने मी मी म्हणणारे अपराधी चळाचळा कापत ते पोलिस अधिकारी परमवीरसिंग आज परागंदा झाले आहेत. हे त्यांचे व्यक्तिगत दुर्दैव आहे का? माहीत नाही. पण महाराष्ट्राच्या पोलिस प्रशासकीय इतिहासातले काळे प्रकरण आहे हे नि:संशय. भंडाऱ्याहून नव्वदच्या दशकाच्या अखेरच्या टप्प्यात मुंबईत आलेल्या परमवीरसिंग यांनी कधीही वळून पाहिले नाही. मुंबईला हादरवणाऱ्या बॉम्बस्फोटांचा तपास, त्यानंतर राजकारणाचे गुन्हेगारीकरण थांबवण्याचा गोपीनाथ मुंडे यांनी विडा उचलला त्या सर्व काळात परमवीरसिंग उत्तम कामगिरी बजावत राहिले. प्रशासनाच्या गळ्यातला ताईत झाले. गुन्हेगारांना टिपून मारण्याच्या चकमकफेम काळात मृत्यू हाच न्याय मानला गेला. या एन्काउंटर काळातल्या अधिकाऱ्यांच्या दंतकथा वादग्रस्त झाल्या; पण परमवीरांचे वैभव तसूभरही कमी झाले नाही. आर आर.आबांच्या काळात परमवीरसिंग कर्तृत्व गाजवत राहिले. मग सत्ता बदलली.

मालेगाव बॉम्बस्फोटाशी साध्वी, लष्करी अधिकाऱ्यांचे नाव जोडले गेले. परमवीरसिंग त्यांना यथाशक्ती जेरीला आणत राहिले असे म्हंटले जाई. त्या वेळची राजवट बदलली; पण हिंदुत्ववादी सत्तेत आले तरी परमवीर यांना उत्तम जागा मिळाली. ते ‘ठाणेकर’ झाले. त्यानंतर पुन्हा सत्तांतर झाले, तेव्हा परमवीरसिंग यांचे स्वप्न पूर्ण झाले. ते मुंबईचे आयुक्त बनले. त्यासाठी बरीच ‘मूल्ये’ खर्ची पडली असेही म्हणतात. त्यांच्या बरोबरीने दलात परत आलेल्या वाझे यांची बहुचर्चित आगळीक महाविकास आघाडी सरकारला भारी पडल्याने प्रचंड रणधुमाळी सुरु आहे.पोलिस बिळात घुसून बसले आहेत. परमवीर यांनी परदेशात ठिकाणा शोधल्याचे बोलले जाते आहे. हे घडले तेव्हा केंद्र आणि राज्य सरकार झोपले होते काय? की राष्ट्रवादी कॉंग्रेसला लक्ष्य करण्यासाठी या पोलिस अधिकाऱ्याचा वापर केला जात होता? हे प्रश्न अनुत्तरित आहेत. कारवाई झाली तरी न्यायप्रक्रियेला सामोरे जाण्याचा मार्ग न स्वीकारता परमवीरसिंग लपून का बसले आहेत? काळ मोठा कठीण आला एवढे बाकी खरे .

गुजरातेत मोदी राजवटीवर विरोधक आरोप करतात तो प्रशासनाचा वापर करत मन:पूत कारभार केल्याचा. महाराष्ट्रातही तोच कित्ता गिरवला गेला का? महाविकास आघाडीशी प्रारंभी प्रेमगुंजन करणाऱ्या परमवीरसिंग यांना ते लॉकडाऊनच्या सर्व प्रकारच्या नाकाबंदीमुळे जेरीस येताच पुन्हा आपल्याकडे ओढून भाजपने हिशेब चुकते करण्याच्या खेळात त्यांना खेचले का? ते लपून तरी बसले आहेत किंवा देशाबाहेर गेले आहेत. दोन्हीपैकी जे काही खरे असेल, ते कुणाच्या आशीर्वादाने घडले आहे / घडते आहे? गुड आणि बॅड या काळानुरुप बदलणाऱ्या बाबी आहेत काय?

loading image
go to top