राजधानी मुंबई : बेरजेच्या राजकारणाचा नवा अध्याय

वंचितांशी बहुजनांची मोट बांधत राजकारण करणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीत सामील व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
Prakash Ambedkar
Prakash Ambedkarsakal

वंचितांशी बहुजनांची मोट बांधत राजकारण करणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीत सामील व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याचे कारण त्यांच्याकडे असलेला जनाधार महाराष्ट्रातील तब्बल २० लोकसभा मतदारसंघांत निर्णायक ठरू शकतो. त्यांची ही मते भाजपविरोधी असल्याने ती फुटू नयेत, एकसंघपणे आपल्याकडे यावीत, असा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे.

निवडणूक आयोग पाच मार्चला वेळापत्रक घोषित करेल, अशी चर्चा असल्याने लोकसभा निवडणुका जेमतेम एक महिन्यावर आल्या आहेत. नरेंद्र मोदी यांच्या सरकारला तिसऱ्यांदा संधी मिळेल, असे जवळपास प्रत्येक राजकीय निरीक्षकाला वाटत असल्याने विरोधकांना अग्निपरीक्षा द्यायची आहे.

महाराष्ट्रात तर लढाई स्वाभिमानाची आहे. देशव्यापी कॉँग्रेसला स्वत:ची पत राखायची आहे. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला गद्दारांना धडा शिकवायचा आहे. बघतोच कशा ४०० जागा जिंकतात ते, हे त्यांचे वाक्य भाजपेतरांच्या मनातली धुगधुगी एकदम अंगार धारण करण्याएवढे प्रेरक आहे.

राष्ट्रवादी कॉँग्रेसचा शरद पवार गट फार बोलत नसला तरी संघर्षाला सज्ज होतो आहे. भाजपविरोध हा तिघातला समान धागा आहेच; पण ‘किमान समान कार्यक्रमा’त दुसरेही एक सर्वमान्य कलम आहे, ते म्हणजे प्रकाश आंबेडकरांना समवेत घेणे! आंबेडकरांशिवाय तरणोपाय नाही याबद्दल तिघांनाही खात्री आहे. तिघांनाही ते हवेच आहेत.

आंबेडकर इंडिया आघाडीच्या बाबतीत कटू सत्य सुनावयला कमी करीत नाहीत. तरीही ‘मविआ’ला ते हवे आहेतच. याचे कारण २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाने तब्बल ३७ लाख ४३ हजार मते घेतली होती. पाठोपाठच्या विधानसभा निवडणुकीत ‘एमआयएम’ त्यांच्यासमवेत नसल्याने असेल कदाचित, पण ही मतसंख्या २४ लाखावर घसरली तरी ५८ मतदारसंघात ‘वंचित’ने कोण जिंकेल हे ठरवले होते.

२०१४ च्या निवडणुकीत एक टक्का मतेही मिळवू न शकलेल्या या पक्षाने केवळ पाच वर्षात मतटक्का ६.९८ पर्यंत नेऊन ठेवला होता. उद्धव ठाकरे यांनी त्यांचे हे महत्त्व गेल्या काही वर्षांपूर्वीच ओळखले होते. सुभाष देसाईंच्यामार्फत त्यांच्याशी संवाद सुरु ठेवला होता.

महाराष्ट्र उभाआडवा जाणणारे ज्येष्ठ नेते शरद पवार त्यांच्याशी व्यक्तिगत पातळीवर संवाद राखून आहेत आणि महाराष्ट्राचे नव्याने प्रभारी झालेले कॉँग्रेसनेते रमेश चेन्नीथला यांनी स्वत: त्यांची भेट घेत पटोले, चव्हाण, थोरात या तिघांवर आंबेडकरांशी संपर्क ठेवायची जबाबदारी सोपवली आहे. सत्ताधारीही आंबेडकरांच्या संपर्कात आहेतच.

वंचित आणि बहुजनांचे राजकारण करणाऱ्या प्रकाश आंबेडकरांना बरोबर घेण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते एवढे आतूर का आहेत? वंचितांना प्रकाश दाखवणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ते नातू आहेत, हे तर एक कारण आहेच. त्याचबरोबर त्यांनी दलित, अल्पसंख्यांक आणि ओबीसींची आघाडी बांधायचा प्रयोग यशस्वी करुन दाखवला आहे. निवडणूकांचा मोसम असला वा नसला तरी पायाला भिंगरी लागल्यासारखे आंबेडकर फिरत असतात.

‘नाहीरें’चे राजकारण

एकीकडे राममंदिर प्रतिष्ठापनसोहळ्याचे निमंत्रण देण्यास आलेल्यांचे स्वागत करतात अन् दुसरीकडे भीमा कोरेगावप्रकरणातून व्यवस्थेला आव्हान देणाऱ्यांचे नायकत्वही निभावतात. दलितांच्या मतपेटीला ओबीसींची जोड देण्याचे ‘अकोला पॅटर्न’ नावाने ओळखले जाणारे ‘भारिप-बहुजन महासंघ’ या नावाचे समीकरण त्यांनी आखले अन् बेरजेच्या राजकारणाचा यशस्वी अध्याय सुरु केला.

सर्व राजकीय पक्ष कमीअधिक प्रमाणात सारख्याच राजकीय संस्कृतीचे आहेत असे दलित, वंचित मानतात.‘कोई सापनाथ ,कोई नागनाथ’ हे मायावतींचे शब्द बहुचर्चित. आंबेडकर अशा शाब्दिक घोषणाबाजीत न अडकता मुद्याधारित बोलतात. प्रचलित राजकीय पक्षांना आव्हान देण्याची भाषा करणाऱ्या अशा ‘नाही रें’च्या राजकारणाला आगळेच महत्त्व असते.

प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या पत्नी अंजलीताई हे अचूक जाणत असावेत. राजकीय लाभाच्या प्रक्रियेबाहेर गावकुसाबाहेर राहिलेली मंडळी ते एकत्र आणतात. वंचितांशी बहुजनांची मोट बांधतात. हे समीकरण राज्यातील तब्बल २० लोकसभा मतदारसंघांत निर्णायक ठरू शकते.

ही मते भाजपविरोधी असल्याने ती फुटू नयेत, एकसंघपणे आपल्याकडे यावीत, असा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीतही कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेसने त्यांना चार लोकसभा मतदारसंघ देण्याची तयारी दाखवली होती. आंबेडकरांची मागणी १२ जागांची होती. बोलणी फिस्कटली अन् मतविभाजनाचा भाजपला लाभ झाला. आंबेडकरांना त्यामुळेच भाजपला जिंकवून देणारी आघाडी ‘बी-टीम’ ठरवले गेले.

शिक्का मान्य नाही

राजकीय प्रणालीशी संबंधितांनी त्यांच्यावर लावलेला हा शिक्का मतदारांना मान्य नाही. २०१८मध्ये ‘वंचित- बहुजन आघाडी’ची स्थापना झाली. त्यावेळी संघटन नव्हते. आज आहे. आंबेडकरांना मानणारा मतदार आजही त्यांच्या सभांना गर्दी करतो आहे. महाराष्ट्रात दलितांची मोठी संख्या आहे. ते राजकीयदृष्टया सजग आहेत.

१९९८ मध्ये गटातटांत विभागलेल्या रिपब्लिकनांचे ऐक्य झाले अन् त्यांचे रा.सू.गवई, प्रकाश आंबेडकर, जोगेंद्र कवाडे आणि रामदास आठवले हे चारही नेते निवडून आले. कॉंग्रेसचे २८ खासदार महाराष्ट्राने दिल्लीत पाठवले. ९९मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचा जन्म झाला, तेव्हा विलासरावांनी विधानसभेत कॉँग्रेसची कामगिरी उत्तम रहावी, यासाठी प्रकाशरावांना समवेत घेतले होते अन् त्यांच्या तीन जागा जिंकवत कॉंग्रेसच्या पदरात प्रतिकूलतेत ७५ मतदारसंघ पदरी पाडले.

आज आंबेडकरांच्या या शक्तीत वाढ झाली आहे, असे सत्तेतले अन् विरोधातले पक्ष मान्य करतात. चतुर चलाख आणि चाणाक्ष आंबेडकरांना आपले हे महत्त्व चांगलेच ज्ञात आहे. त्यामुळेच ते यावेळी १२ जागांची मागणी करत ४८ मतदारसंघांसाठी उमेदवार निश्चित करुन बसले आहेत. ते तडजोड करतात की सर्वहारांचा नवा राजकीय प्रवाह तयार करु बघतात, ते दिसेलच.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com