‘हितावह तंत्रज्ञाना’तून कल्याणाकडे

Pollution-and-warming
Pollution-and-warming

स्पेनमधील माद्रिद येथे नुकतीच संयुक्त राष्ट्रसंघाची जागतिक हवामान परिषद झाली. पण जागतिक तापमानवाढीवर कुठलाही ठोस कार्यक्रम जाहीर न करता या परिषदेची सांगता झाली. दोनशे देशांदरम्यान दोन आठवडे झालेल्या चर्चेतून कार्बन उत्सर्जनावर मर्यादा घालण्यासाठी आवश्‍यक उपाययोजनांवर एकमत तयार करण्यात आंतरराष्ट्रीय समुदायाला अपयश आले. या निमित्ताने काही प्रश्न नव्याने समोर आले. तापमानवाढ आणि प्रदूषण यांच्यापुढे माणूस हतबल आहे काय? कळतंय पण वळत नाही, अशी त्याची स्थिती आहे काय? यातून बाहेर पडण्यासाठी उपाय कोणते? निसर्गनियमांच्या प्रकाशात या समस्यांची स्पष्टीकरणे आणि उपाय शोधणे ही आजवर फारशी चोखाळून न पाहिलेली पद्धत.

विमानात बसून किंवा उपग्रह छायाचित्रांच्या माध्यमातून भूमीकडे बघता आले तर तीन गोष्टी स्पष्ट दिसतात. काय झाले आहे, काय चालू आहे आणि काय होऊ शकते अथवा नाही! उंचावरून दिसते असंख्य छोट्या-मोठ्या चौकोनांत विभागलेली भूमी. ही शेतीसाठी वापरात असलेली भूमी. तिथे शेती सुरू असेल असे नाही. पण मूळ हे तुकडे कसण्यासाठी आखले गेले. शहराजवळ दिसतात मोठ्या खाणी. काही वापरून सोडून दिलेल्या, काही वापरात असलेल्या. उंचावरून दिसतात पाण्याचे मार्ग. तिथे पाणी वाहत असेल असे नाही. पण पाण्याचे नैसर्गिक मार्ग. शहरात कुठे त्यांच्या दोन्ही बाजूंना भिंती दिसतात. शहराजवळ कचऱ्याचे डोंगर आणि धुळीचे धुराचे तरंगणारे ढग. ही आणि अशी कितीतरी भूचित्रे सांगत असतात, काय झालेले आहे, काय चालू आहे आणि काय होऊ शकते अथवा नाही.काळाच्या पटावर आपल्याला हे दिसते की शेती सुरू झाली तेव्हा रानवा मागे हटला. शेती सुरू झाली म्हणून गावे वसली, नगरे उभी राहिली. खनिज तेल आणि कोळसा वापरायला सुरुवात झाली, तेव्हा महानगरे उभी राहिली. यातल्या कशाहीबाबत आता काळाच्या क्रमात मागे जाऊन बदल करणे शक्‍य नाही. इथवर आल्यावर आता आपण म्हणतो आहोत आम्हाला रानवा हवा, प्रदूषण नको, कचरा नको इत्यादी. असे दावेही करतो आहोत की गुंतागुंतीचे, जटिल तंत्रज्ञान वापरूनही शून्य कचरा शक्‍य आहे. प्रदूषणमुक्त शहरे शक्‍य आहेत. यामागील इच्छा समजण्यासारखी असली तरी वस्तुनिष्ठ पातळीवर विसंगती आहे. कशी ते समजावून घेण्यासाठी काही वैश्विक निसर्गनियम आणि आजची परिस्थिती यांच्यातील संबंध जाणून घेणे गरजेचे आहे. वस्तू आणि ऊर्जा यांच्या अविनाशित्वाचा नियम असे सांगतो की आपण आजवर दगड, माती, पाणी, वनस्पती याबाबतीत जे करत आलो आहोत ते बदल नष्ट करता येत नाहीत. ते पुढे चालू राहतात. कोळसा आणि खनिज तेल आजच्या तंत्रज्ञानाचा प्राण आहे. हे इंधन वापरल्यानंतर त्या संपूर्ण मालाचे वायू, धूर, राख व काजळीमध्ये रूपांतर होते आणि ते सर्व जमिनीच्या वरच्या भागात निरूपयोगी पदार्थ व प्रदूषक म्हणून राहते. तेच जमिनीखालून काढलेल्या खाणसामानाबाबत होते. निरूपयोगी पदार्थ ज्याला आपण कचरा म्हणून संबोधतो, तो नष्ट करता येत नाही. त्याची विल्हेवाट लावणे म्हणजे फक्त त्याची जागा व स्वरूप बदलणे असते. हे खनिज इंधन वापरताना वाढीव उष्णता, प्रदूषण, राख, गाळ, रबल, कचरा, घाण, मोडीत निघालेल्या वस्तू या स्वरुपात आपल्या आजूबाजूला उपपदार्थ साठत जातात.

याखेरीज एक महत्त्वाचा निसर्गनियम आहे ज्याची चर्चा आजवर केवळ थर्मोडायनामिक बंद प्रणालींच्या संदर्भात केली गेली. परंतु वस्तुतः तो वैश्विक निसर्ग नियम आहे. तो म्हणजे एन्ट्रॉपीचा नियम. या नियमानुसार एन्ट्रॉपी सतत वाढत असते. म्हणजे विश्व, विश्वातील विविध वस्तुमात्र ज्या सूक्ष्म कणांनी बनल्या आहेत त्या सूक्ष्म कणांचे विखुरण (dispersal) सतत चालू असते. सूक्ष्म कणांची हालचाल म्हणजेच ऊर्जा असल्याने सूक्ष्म कणांचे विखुरण म्हणजे ऊर्जेचेही विखुरण सतत चालू असते. विखुरण होत असलेल्या सूक्ष्म कणांपैकी काही सूक्ष्म कण स्थानिक परिस्थितीनुसार एकत्र येऊ शकतात. एकत्रीकरणाला एन्ट्रॉपी कमी होणे म्हणतात. एकंदर सूक्ष्म कणांपैकी काहीच सूक्ष्म कण एकत्र येत असल्यामुळे एकत्रीकरणापेक्षा विखुरण जास्त असते व नक्त परिणाम विखुरण म्हणजे एन्ट्रॉपी वाढणे असाच असतो.

तंत्रज्ञान-वापरात विखुरण किती झालेले आहे म्हणजे एन्ट्रॉपी स्थिती (कमी-एन्ट्रॉपी अथवा जास्त-एन्ट्रॉपी) हा घटक महत्त्वाचा असतो. उदा. खनिज तेलाच्या टॅंकरमधील तेल बंदिस्त असल्याने (कमी-एन्ट्रॉपीचे) उपयोगी असते. टॅंकर फुटून तेल समुद्रावर विखुरले (जास्त-एन्ट्रॉपी) तर तेल हे तेलच रहात असले तरी ते निरुपयोगी ठरते. या नियमाचा परिणाम असा दिसून येतो की कोणत्याही तंत्रज्ञानात तोटा हा होतोच आणि तोट्याची भरपाई करावी लागते. आपल्या गाडीत जे इंधन भरले जाते, ते तेथे उपलब्ध होण्यासाठी त्याच्या कित्येकपट इंधन खर्च झालेले असते आणि त्या खर्चाची भरपाई खूप काही करून करावी लागते. इंधन जाळून ऊर्जा मिळवताना तयार होणारे विविध प्रदूषक सहन करावे लागतात. ऊर्जानिर्मिती व ऊर्जा-वापर (कारखाने) प्रकल्पांमुळे स्थलांतराला सामोरे जावे लागते. वीज वापराच्या आणि वीजनिर्मितीच्या जागा एकमेकांपासून दूर असू शकतात. त्यामुळे वीज निर्मितीसाठीच्या प्रदूषकांचे परिणाम आपल्याला थेट भोगावे लागत नसले, तरी इतर खर्चाची भरपाई करावीच लागते. कोणाला, केव्हा, कुठे आणि कशा प्रकारे भरपाई करावी लागते ते मानवी समाजरचनेत कोण कुठे आहे त्यावर ठरते. आपल्या जीवनात तंत्रज्ञानाचा वापर जितका अधिक तितके एन्ट्रॉपीच्या नियमाचे परिणाम (तोटा सहन करणे) जास्त. कोळसा आणि खनिज तेल यांनी निर्माण केलेल्या प्रश्नांना उत्तर म्हणून अपारंपरिक ऊर्जा स्रोतांची चर्चा केली जाते.

अपारंपरिक ऊर्जा मिळवण्यासाठी लागणारी उपकरणे, संयंत्रे, प्रकल्प बनवण्यासाठी, उभारण्यासाठी, त्याच्या दुरुस्ती-देखभालीसाठी जेवढी ऊर्जा लागते, तेवढी ऊर्जा ती उपकरणे, संयंत्रे, प्रकल्पाच्या आयुष्यभरात निर्माण होऊ शकत नाही. कारण तसे होण्यासाठी एन्ट्रॉपी नक्त कमी व्हावी लागेल, ते शक्‍य नाही. अशा तऱ्हेने प्रदूषण सर्वत्र असताना त्याचे परिणाम आपल्या आरोग्यावर झाले नाहीत तरच नवल. प्रदूषण नाहीच हे शक्‍य नाही. आपल्याला त्याचे परिणाम किती जाणवतात आणि जाणवून आपण त्यावर उपाययोजना काय करू शकतो या सर्वांवरच मर्यादा आहे. तंत्रज्ञान नेहमीच तोट्याचे असेल तर ते वापरूच नये काय? तसे मात्र नाही. तंत्रज्ञानाने आपली सुरक्षा, कष्टापासून मुक्ती व करमणूक यासाठीची कामे सोपी होतात. आपल्या (शारीरिक व बुद्धीच्या) क्षमतांशी सुसंगत उपकरणे, साधने, अवजारे करण्यासाठी तंत्रज्ञान वापरायचे असते. तोटे कमी असणारे, दुसऱ्यांना भरपाई करावी न लागणारे, सामाजिक प्रश्न निर्माण न करणारे असे तंत्रज्ञानदेखील असते. जगभरात अशा तंत्रज्ञानासाठी प्रयत्न केले जातात. आपल्या आजूबाजूलादेखील याविषयी प्रयत्न करणारी माणसे, संस्था असतात. त्यांच्या कामांची माहिती करून घेतली असता आपण स्वतःसाठी अनुकूल अशी राहणी आणि तंत्रज्ञान याचा शोध नक्कीच घेऊ शकतो. अवकाशातून दिसणारे आजचे भूचित्र आणि जवळून अनुभवता येणारे समाज-चित्र तर काही एकदम बदलणार नाही. परंतु, त्यात व्यक्तीला स्वतःचा अवकाश शोधता येतो. अजूनही ही संधी माणसाच्या हातात आहे. निसर्ग-नियमांच्या प्रकाशात तिचा शोध जरूर घेता येऊ शकतो.

(संदर्भ: रॉग थिअरी- गिरीश अभ्यंकर.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com