भाष्य : जंगलांचा ऱ्हास अन् ‘नगररुदन’ 

भाष्य : जंगलांचा ऱ्हास अन् ‘नगररुदन’ 

उत्तराखंड राज्यात गेल्या वीस वर्षांत विविध ‘विकासकामां’च्या योगे ५० हजार हेक्‍टर जंगल नाहीसे झाले, असा एक अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. याबद्दल हळहळ वाटणं स्वाभाविक आहे. परंतु, हे केवळ ‘नगररुदन’ ठरू नये. त्यासाठी या प्रश्‍नाचा अधिक खोलात जाऊन विचार करावा लागेल.

काही वर्षांपूर्वी कुमाऊँ प्रदेशातल्या एका छोट्या गावी राहण्याची संधी मला मिळाली. तिथे नौला पाहिला. उतारावरची बांज, बुरांस आणि अनेक झाडाझुडपांची छोटी राई. पायाखालती ओलसर पाचोळा. पानांचा, मातीचा खास रानगंध आणि एका मोठ्या ओक वृक्षाखालून येणारं जिवंत झऱ्याचं पाणी. हा नौला. एक छोटा आडोसा करून झाकलेलं पाणी. तिथं गाईगुरं तोंड घालू शकत नाहीत. ही जागा पूज्य समजली जाते. ‘नव्या नवरीला इथे दर्शनाला आणलं जातं. वर्षभर या नौल्यात पाणी राहतं. डोंगराच्या पोटातलं पाणी हे. पावसाचं तसच वितळलेल्या बर्फाचं. वर्षभर इथे पाण्याला ददात नाही.‘ तिथली शेजारीण सांगत होती. मी या परिसरात एक हापसा असा पाहिला की ज्यातून पाण्याची चांगली मोठी धार सतत वाहत राहते, कोणीही हापसत नसतानाही. इतकं पाणी. ‘दीदी, आता दिल्ली, लखनौ, मुंबईहून आलेली मंडळी तिथे मोठमोठया टाक्‍या बांधताहेत. हजारो लिटर पाणी स्वतःसाठी साठवताहेत. हे रेनवॉटर हार्वेस्टिंग नाही. ओढ्याचच पाणी वळवताहेत. असं झालं तर नौला व्यवस्था तर बंद पडेल.‘

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

त्या कुमाऊँ सखीच्या गोष्टी ऐकताना माझ्या डोळ्यासमोर सह्याद्री, सातपुडा उभे राहिले. पर्वत, जंगल आणि पाणी यांचं नातं थोड्याफार फरकानं सारखंच. कोकणात किती ठिकाणी देवराई आणि पाण्याचे झरे आजही ताजे आहेत. पाणी उताराच्या दिशेने नुसतं धावत नाही, तर वाहताना अनेक जीव फुलवतं, जगवतं. ही अलवार व्यवस्था काही दशकांपूर्वीपर्यंत जिवंत होती. डोंगरात कधी कोणी पाणी पूर्ण अडवित नसे. पाणी वाहतावाहता आपली तहान शमवतं; झाडामुळातून आलेलं हे पाणी तहानेला चांगलं. ते औषधीही असल्याची पद्धत. कुमाऊँ परिसरातच ऐकल्या होत्या ‘चिड’क्‍या पेटत्या जंगलांच्या धुमसत्या कथा. ओक, देवदार, बुरांस हा जंगलाचा पोत संपून चिड-पाईनने व्यापलेले डोंगरउतार त्यांची कथा सांगत होते. ब्रिटिशकाळात इमारती लाकूड म्हणून पाईन मुद्दाम वाढवला गेला. तीच पद्धत पुढे चालू राहिली. आता त्या पाईन वृक्षांच्या जंगलात झाडाच्या सुया खाली पडतात, जमीन झाकतात, तिथं काही उगवू देत नाहीत, जमीन ॲसिडीक करतात. सगळ्यात धोकादायक म्हणजे या सुया चटकन पेट घेतात. सुयांचे साठलेले ढीग म्हणजे पेट घेण्यासाठी आतुर बॉम्बच. तसेच या झाडाचे कोन. उत्तराखंडमध्ये काही वर्षांपूर्वी जी प्रचंड आग लागून जंगलं नष्ट झाली, त्यात पाईनच्या सुया आणि कोनांनी मोठा हातभार लावला. हिमालयाच्या तीव्र उतारांवरून कोन गडगडत खाली आले आणि त्यांनी जाळ पसरवला. पाऊस आगीच्या खुणा तात्पुरत्या झाकतो. पर्यटकांच्या नजरेला पाईनच्या उन्हात न्हायलेल्या सुया जादुई वाटतात. गावकरी आपल्या शेतात, घराच्या आजूबाजूला पाईन ठेवत नाहीत. जंगलात ओक राहू देत नाहीत. पर्वतावर माती चांगली धरून ठेवली गेली नाही, की खालच्या भागात काय हाहाकार होतो हेदेखील आपण पाहिलंय. नद्या बेफाट वाहतात. अतिरिक्त प्रमाणात गाळ खाली आणतात. पात्र मोडून धावतात. या व्यथा आजच्या नाहीत. गेल्या वीस वर्षात पन्नास हजार हेक्‍टर जंगल नाहीसं झालंय याची हळहळ वाटणं स्वाभाविक आहे. परंतु हे केवळ ‘नगररुदन’ ठरू नये. आपण जबाबदार धरतो कोण्या पक्षाला, नेत्यांना, प्रशासकांना, मनोवृत्तीला. हे सारं बदललं की गोष्टी वेगळ्या होतील. आपला विश्वास असतो. पण असं कुणाला तरी दोषी ठरवून आपला प्रश्न सुटल्याची भावना मेंदूला तात्पुरतं सुख देणारी असली तरी गोष्ट तिथवर संपत नाही.  प्राचीन मेसोपोटेमियातील गिलगमेश, भारतीय उपखंडातील महाभारत ही महाकाव्ये जंगलांच्या ऱ्हासाची चर्चा करतात.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

निसर्गनियम काय सांगतात?
चीनमधील ताओ ते चिंग या किमान दोन-अडीच हजार वर्ष जुन्या धर्मग्रंथात तथाकथित प्रगतीमुळे निसर्ग आणि मानव यांवर काय परिणाम होतो, याची चर्चा केली आहे. ही चिंता व्यक्त केली जात होती, जेव्हा वाफेच्या इंजिनाचं जहाज अजून खूप दूर होतं. वीज दूर होती. इलेक्‍ट्रिक उपकरणं नव्हतीच नव्हती. तरीही वनांचा ऱ्हास, वाढतं तंत्रज्ञान हा चिंतेचा विषय होता. शेती सुरु होऊन काही हजार वर्षं लोटली होती. त्याचे परिणाम जाणवत होते. पण यानं काय झालं? आपण शेती थांबवू शकलो? तीसोबत येणारी नागरी, व्यापारी संस्कृती थांबवू शकलो? तसं झालं नाही. पण सगळीकडे एकसारख्या पद्धतीने गोष्टी घडल्याही नाहीत. याचं कारण शोधायला आपल्याला निसर्ग नियमांकडे जायला हवं. सजीवांच्या बाबतीतला निसर्गनियम असं सांगतो, की स्वयंवाढ आणि स्वयंहालचाल ही सजीवांची व्यवच्छेदक लक्षणं आहेत. माणसं आफ्रिका खंडातून जगभर पसरली. शब्द-भाषा बोलू लागली, शेती करू लागली, त्यांची लोकसंख्या वाढली हा ‘वाढ आणि हालचाल’ दाखवणारा पॅटर्न आहे. हा काही आजतागायत थांबवता आलेला नाही. या मर्यादा केवळ भौतिक स्वरूपाच्या असतात. व्याधी आणि मृत्यू यांनी वाढ आणि हालचालीवर मर्यादा येतात.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 वाढीसाठी पळवाटा
निसर्गनियम असंही सांगतात, की विविधता कायम असणारच. भारताच्या भूचित्राबाबतीत सांगायचं तर सगळीकडे गंगा- यमुनेसारखी पूर-मैदानं नसतात. शेती पसरली, लोकसंख्येची घनता वाढली, नागरी संस्कृती बहरली ती या पूर- मैदानात. पर्वतात नाही. परंतु आपल्यासमोर असतात नागरी संस्कृतीपासून दूर. काही शहाणीव दाखवणाऱ्या प्रथा- परंपरा. कधी देवराई तर कधी नौला. आपण असा विचार करतो की इथे जे झालं ते इतरत्र का नाही झालं? हाव वाढली. सुविचार गेला. निसर्गाचा अधिकच ऱ्हास झाला. आपण जिथे उभे आहोत तिथून आपल्याला गोष्टी एका प्रकाराने दिसतात. प्रत्यक्षात देवराई काय किंवा नौला काय, या परंपरा नाममात्र शिल्लक राहिलेल्या दिसतात. नवी पाणी योजना नौला पद्धतीला झटकन रद्दबातल ठरवते. देवराई म्हणून फक्त एखादं झाड आणि देऊळ दाखवण्यात येतं. पन्नास हजार हेक्‍टरवरचं जंगल दोन दशकात नाहीसं होतं. ज्या पद्धतीनं स्वयं-वाढ आणि स्वयं-हालचाल वेगानं होताना दिसते त्या पद्धती जोर पकडतात. गमतीची बाब अशी की हे वन ज्या विकासकामांसाठी नष्ट झालं, असं सांगण्यात येतं, त्या कंपन्या सर्व काही कायद्याच्या मर्यादांच्या आत केलं, असं सांगताना दिसतात. कायदे माणसानं बनवलेत.त्यातून वाढ आणि हालचालीसाठी पळवाटा काढता येतातच. परंतु विविधता आपल्यातही असते. अनियंत्रित वाढ कर्करोगाप्रमाणे असते, असं जाणणारी माणसंही असतात. त्यांची संख्या कमी असेल; पण ती असतात. मग ज्यांना अनियंत्रित वाढ नको, असं वाटत असेल त्यांनी काय करायचं? त्यांनी परिस्थितीची जाणीव ठेवायची. आपण कोणत्या रेट्यात ओढले जात नाही ना ते बघण्याचा प्रयत्न करायचा. स्वयंनिर्भरता आपल्या जीवनशैलीत कशी येईल ते बघायचं. तरुण पिढीतली कितीतरी जण मुलं नको असा निर्णय घेताना दिसतात. यामागे तात्कालिक वैयक्तिक कारणांसोबत वनं नष्ट होण्याच्या, त्यातून साथीचे रोग पसरण्याच्या, हवामान बदलाच्या, तापमानवाढीच्या छाया असल्या तर त्यात आश्‍चर्य वाटायला नको. नष्ट झालेली उत्तराखंडची वनं आपल्याला असाच विचार करायला भाग पाडताहेत.

(लेखिका पर्यावरणाच्या अभ्यासक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com