प्रतिष्ठेची झालर काढून घेतल्यास व्यसनांना आळा

mukta puntambekar
mukta puntambekar

महाभारतात ‘यक्षप्रश्‍न’ नावाची गोष्ट आहे. यक्षांच्या तलावात उतरल्यामुळे पुतळे झालेल्या भावांना वाचविण्यासाठी युधिष्ठिर यक्षाच्या प्रश्‍नांना उत्तरे देतो. यक्ष विचारतात, ‘‘तुला सर्वात जास्त आश्‍चर्य कोणत्या गोष्टीचे वाटते?’’ युधिष्ठिर म्हणतो, ‘‘आपण अनेक लोकांचे मृत्यू बघतो. पण तरीही मृत्यू माझ्यासाठी नाही, अशी आपली समजूत असते. या गोष्टीचे मला आश्‍चर्य वाटते.’’

‘मुक्तांगण’मध्ये येणाऱ्या रुग्णांची वाढती संख्या बघता आम्हालाही हे आश्‍चर्य वाटते. व्यसनामुळे झालेले अपघात, आजार, मृत्यू यापैकी काहीतरी आपण शेजारी-पाजारी  बघितलेलेच असते. चित्रपटगृहात तंबाखूविरोधी जाहिराती बघतो. पाकिटावरचा इशारा वाचतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार भारतात दरवर्षी दहा लाख मृत्यू तंबाखूच्या सेवनाने, तर तीन लाख मृत्यू दारूमुळे होतात. हे सगळे माहीत असूनही लोक तंबाखू, दारूचे सेवन करतात. सुमारे २५ वर्षांपूर्वी ‘मुक्तांगण’ला भेट द्यायला काही परदेशी विद्यार्थी आले होते. त्यांनी विचारले, ‘‘इथे फक्त पुरुष रुग्ण दिसतात. महिलांना तुम्ही कुठे ठेवता?’’ मला आश्‍चर्य वाटले. मी म्हणाले, ‘‘आमच्या देशात स्त्रिया नाही दारू पीत.’’ पण काही वर्षांनी माझे म्हणणे खोटे ठरले. २००९ मध्ये आम्हाला स्त्रियांसाठी विभाग सुरू करावा लागला. व्यसनाचा सरासरी वयोगटही कमी होऊ लागला आहे. दहा टक्के रुग्ण विशीही गाठलेले नसतात. आमच्याकडचा सर्वात लहान रुग्ण नऊ वर्षांचा आहे. स्त्रिया, मुले किंवा तरुणांमध्ये व्यसन वाढण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे सध्या दारू, सिगारेटला मिळत असलेली सामाजिक प्रतिष्ठा. प्रत्येक पार्टीत अगदी छोट्या घरगुती पार्टीतही दारू (अर्थातच दारू न म्हणता त्याला ‘ड्रिंक्‍स’ म्हणतात) प्यायली जाते. स्त्रिया आणि मुलांनाही आग्रह केला जातो. दारू न पिणाऱ्या व्यक्तीला बावळट ठरवले जाते. व्यसनाची सुरवात अशीच होते. म्हणूनच जागतिक आरोग्य संघटना ‘सोशल ड्रिंकिंग’लाही विरोध करते. चित्रपटांमध्ये पूर्वी फक्त हिरो दारू पिताना दाखवायचे. आता हिरॉईनसुद्धा दारू पिते. हिरोला दुःख झाले, तर तो स्वतःला दारूत बुडवून घेतो; आनंद झाला तरी जल्लोषासाठी दारूच असते. यातून आनंद साजरा करायला किंवा दुःख पचवायला दारू प्या, असा चुकीचा संदेश त्यांना मिळतो. रुग्णांशी बोलताना चित्रपटांच्या प्रभावामुळे ते व्यसनाधीन झाले, हे लक्षात येते, तेव्हा चित्रपटांमध्ये या दृश्‍यांना बंदीच घालायला हवी, असे वाटते. नुसते इशारे पुरेसे नाहीत. सध्या तरुणांमध्ये गांजा म्हणजेच ‘वीड’चे व्यसन वाढते आहे. गांजाचे व्यसन लागत नाही, असा गैरसमज आहे. गांजा मेंदूवर अतिशय वाईट परिणाम करतो. प्रचंड चिडचिड, भास होणे, मानसिक संतुलन ढासळणे अशा कायमस्वरुपी दुष्परिणांमामुळे आयुष्यातून उठलेली बरीच मुले आम्ही पाहिली आहेत.
 इंटरनेट, स्मार्टफोन, टीव्ही, व्हिडिओ गेम या सर्वांच्या अतिवापराचे वर्तनात्मक व्यसन वाढते आहे. या व्यसनाचे शारीरिक, मानसिक परिणाम दारू-ड्रग्जइतकेच भयानक आहेत. व्यसनाधीनता वाढत आहे, त्यामानाने व्यसनमुक्ती केंद्रांची संख्या कमी आहे. बऱ्याचशा केंद्रांची गुणवत्ता चांगली नाही. उपचार घेऊनही पुन्हा व्यसनाकडे वळण्याचे प्रमाणही बरेच आहे. म्हणून व्यसन लागूच नये, यासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे. ‘अंमली पदार्थांची उपलब्धता’ हे व्यसन वाढण्याचे सर्वात मोठे कारण. ज्यांच्या कार्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी झाली त्या डॉ. अभय बंग यांच्या म्हणण्यानुसार दारूबंदी केली तर हा प्रश्‍न कमी होऊ शकेल. ज्या राज्यांमध्ये किंवा जिल्ह्यांमध्ये दारूबंदी आहे, तेथील व्यसनाधीनतेचे प्रमाण कमी झाले आहे. व्यसनांमुळे होणारे अपघात, आजार, गुन्हे यांचेही प्रमाण कमी झाल्याचे आढळले. दारूबंदी शक्‍य नसेल तर निदान दारू, तंबाखू, ड्रग्ज विक्री संदर्भातल्या कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी केली तरी त्याचा सुपरिणाम जाणवेल.

 हा शाळेच्या अभ्यासक्रमाचा भाग व्हायला हवा, त्यासंबंधी घोषणा बऱ्याचदा झाल्या; पण अंमलबजावणी झाली नाही. खरे तर आपण प्रत्येकानेच यासाठी काम केले पाहिजे. पालक निर्व्यसनी असतील तर मुलांपुढे तो एक चांगला आदर्श होईल. पालक-मुलांमध्ये चांगला संवाद असेल, तर मुलांना याविषयीची योग्य माहिती देता येईल. मुलांचे ताण-तणाव, समस्या लवकर समजून येऊन मार्ग काढता येईल. अंमली पदार्थांची उपलब्धता कमी करून योग्य प्रकारे प्रबोधन, उपचारांची सोय, कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण अशा एकत्रित प्रयत्नांनी व्यसनाधीनतेचा प्रश्‍न काही प्रमाणात कमी होऊ शकेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com