क्रीडा क्षेत्रातील भीष्मपितामह 

bhishmaraj bam
bhishmaraj bam

ऐंशीच्या दशकात आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रीडा क्षेत्रात हौशी ते व्यावसायिक असे स्थित्यंतर होत होते. भारतीय क्रीडा क्षेत्र तेव्हा बाल्यावस्थेत होते. 1982 मधील आशियाई क्रीडास्पर्धा आणि 1983 मधील क्रिकेटचे जगज्जेतेपद अशा दोन लक्षणीय घटनांमुळे भारतीय क्रीडा क्षेत्रही कात टाकू लागल्याचे दिसू लागले. देशात खेळांसाठीच्या पायाभूत सुविधांच्या पातळीवर प्राथमिक घडामोडी होत असताना खेळाडूला केंद्रस्थानी ठेवून त्याच्या मानसिक जडणघडणीचा आणि एकूणच क्रीडा संस्कृती निर्मितीचा व्यापक विचार एका दूरदर्शी व्यक्तीने केला. ही व्यक्ती म्हणजे क्रीडामानसोपचारतज्ज्ञ भीष्मराज बाम. पोलिस खात्यात सर्वोच्च पद भूषविणाऱ्या बाम यांनी तेथेही छाप उमटविलीच; परंतु खेळाडूंची मानसिकता ओळखणे, तीत कोणते बदल उपकारक ठरतील, याचा त्यांचा अभ्यास व चिंतन या पायाभूत स्वरूपाचे काम ठरले. खेळाडूंसाठी ते वरदान ठरले. भारताचे नामवंत खेळाडू, प्रशिक्षक व संघटक या सगळ्यांनाच भीष्मराज बाम यांचे मार्गदर्शन लाभले. योगशास्त्र आणि मानसशास्त्राचा संगम साधत त्यांनी खेळाडूंना उपयुक्त कानमंत्र दिले. राज्यातीलच नव्हे, तर देशभरातील खेळाडूंना त्यांनी प्रेरित केले. 

राजा-महाराजांचा छंद अशी ओळख असलेली नेमबाजी तर त्यांच्यामुळे मध्यमवर्गीय मुला-मुलींपर्यंत पोचली. "एनससी'मधील मुलींनी हातात रायफल धरलेली असते. त्यांनाच सहल म्हणून राष्ट्रीय स्पर्धेसाठी पाठवायचे आणि ज्यांना खेळ भावेल त्यांना प्रशिक्षण द्यायचे ही कल्पना त्यांचीच. अशा प्रयत्नांतून अंजली वेदपाठक-भागवत ऑलिंपिकपर्यंत गेली. धापा टाकत न गाठता थेट विश्‍वविक्रम करूनच ऑलिंपिक पात्रतेचा निकष पूर्ण करण्याची प्रेरणा त्यांनी सुमा दीक्षित-शिरुरला दिली. या मराठमोळ्या मुलींना "रोलमॉडेल' बनविण्यात त्यांचा वाटा मोठा होता. 

गीत सेठी, राहुल द्रविड यांसारखे खेळाडू आपल्या पुनरागमनाचे श्रेय बाम सरांना देतात. ऑलिंपिकमध्ये ब्रॉंझपदक जिंकलेल्या गगन नारंगने तर जागतिक स्पर्धेतील पदक त्यांनाच अर्पण केले. बाम सरांचे वैशिष्ट्य म्हणजे एकेकाळी सरकारी अधिकारी असूनही त्यांनी आपल्या कामात "सरकारीपण' कधी येऊ दिले नाही. खासगी पातळीवरील प्रयत्नांना शासन दरबारी साथ मिळायला हवी यासाठी अथक प्रयत्न केले. क्रीडा धोरण ठरविणाऱ्या समितीला उत्तम मार्गदर्शन केले. क्रीडा क्षेत्रात हरियाणा, पंजाब आणि आता गुजरात अशी राज्ये पुढे जाताहेत. त्याच रांगेत महाराष्ट्राला नेऊन बसवायचे असेल तर बाम सरांच्या कल्पना कृतीत आणण्याची जबाबदारी राज्य सरकारवर आहे. तीच त्यांना श्रद्धांजली ठरेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com