नाममुद्रा :  बंडखोर पुतणी 

mary-trump
mary-trump

अमेरिकेत "कोरोना' रुग्णांची आणि मृतांची संख्या चिंता वाढवीत असताना, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची बेलगाम वक्तव्ये आणि "ब्लॅक लाईव्ह मॅटर' आंदोलनाबाबतची आक्रस्ताळी भूमिका यामुळे त्यात भरच पडली. याच वेळी ट्रम्प यांची कार्यपद्धती व क्षमतेविषयी गंभीर प्रश्न उपस्थित करणारे पुस्तक प्रकाशित झाले आणि एकच खळबळ उडाली. कारण "टू मच अँड नेव्हर इनफ' हे पुस्तक अन्य कोणी नव्हे, तर ट्रम्प यांची बंडखोर पुतणी मेरी हिने लिहिले आहे. पुस्तकातील "हाऊ माय फॅमिली क्रिएटेड द वर्ल्डस मोस्ट डेंजरस मॅन' या वाक्‍यामुळे पुस्तकांविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली नसती तरच नवल. पहिल्याच दिवशी या पुस्तकाच्या दहा लाख प्रती विकल्या गेल्या. 

मेरी ही ट्रम्प यांच्या मोठ्या भावाची पुतणी. तिने कोलंबिया विद्यापीठातून साहित्यात मास्टर्स, तर अडेल्फी विद्यापीठातून मानसशास्त्रात डॉक्‍टरेट मिळविली आहे. "लाइफ कोच' असलेली मेरी मानसिक आघातांमधून लोकांना सावरण्याचे काम करते. वडिलांचे छत्र हरपल्यानंतर तिला मोठा संघर्ष करावा लागला, ज्याला डोनाल्ड ट्रम्प व पत्नी काही प्रमाणात कारणीभूत होते, असा तिचा दावा आहे. तिच्या आजोबांच्या निधनानंतर संपत्तीच्या वाटणीवरून वाद झाला. हा वाद न्यायालयात मिटला, तेव्हा त्यावेळी एका गोष्टीवर सहमती झाली. त्यानुसार कौटुंबिक बाबींविषयी कुणीही माहिती उघड करायची नाही असे ठरले. याचा अर्थ डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाबतीत "दाल में कुछ काला है' हे उघड होते. 1999 मधील या घडामोडीनंतर मेरीने आता हे पुस्तक लिहिले आहे. त्यामुळे तिने पैसा किंवा प्रसिद्धीसाठी हे केलेले नाही हे स्पष्ट होते. ट्रम्प यांनी विद्यापीठ प्रवेश परीक्षेला डमी बसविला होता, असा मेरीचा दावा आहे. "ज्या दिवशी ट्रम्प अध्यक्ष बनले, तो दिवस सर्वांत दुःखद असून मी देशासाठी शोक करीत आहे', असे "ट्‌विट' तिने केले होते. ट्रम्प यांची अध्यक्षपदी फेरनिवड होऊ नये, अशी मेरीची इच्छा मात्र नक्कीच आहे. राष्ट्रप्रमुखांचे निकटवर्तीय सत्तेचा गैरवापर करून माया कमावतात, अशी जगात अनेक उदाहरणे समोर असताना मेरी मात्र त्याला अपवाद आहे, यात शंका नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com