राजधानी मुंबई :  निवासी डॉक्‍टरांचे वेदनापर्व 

राजधानी मुंबई :  निवासी डॉक्‍टरांचे वेदनापर्व 

रुग्णांचे हाल तर आहेतच, पण उपचार करणाऱ्या तरुण डॉक्‍टरांची कहाणीही तेवढीच करुण आहे.  प्रगत महाराष्ट्रात डॉक्‍टरांचाही "कोरोना'मृत्यू होतोय अन्‌ रुग्णांवर उपचार करण्यासाठी रात्रंदिवस धडपडणाऱ्या  निवासी डॉक्‍टरांची अवस्थाही केविलवाणी आहे. 

वादळ तर उडून गेले; पण महामारी अर्थव्यवस्थेचा, सामाजिक रचनांचा  गळा आवळते आहे. भारतासारख्या गरीब देशात सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर महामारीशी लढण्याची मुख्य  जबाबदारी;पण महाराष्ट्रासारख्या तुलनेने संपन्न राज्यातही निधीअभावी ती जर्जर झाली आहे. शेकडो रुग्ण गेले साठ दिवस रोज उपचारांसाठी रूग्णालयासमोर रांगा  लावून उभे आहेत. रुग्णांचे हाल तर आहेतच, पण उपचार करणाऱ्या तरुण डॉक्‍टरांची कहाणीही तेवढीच करुण आहे. प्रगत महाराष्ट्रात डॉक्‍टरांचाही "कोरोना'मृत्यू होतोय अन्‌ अभावात रुग्णांवर उपचार करण्यासाठी रात्रंदिवस धडपडणाऱ्या निवासी डॉक्‍टरांची अवस्थाही केविलवाणी आहे. स्थलांतरित मजुरांसारखी. मुंबईत सरकारी पाच आणि खासगी चार अशी नऊ वैदयकीय महाविद्यालये आहेत. राज्यात ही संख्या 22 च्या आसपास आहे. सरकारी निधीवर चालणाऱ्या महाविद्यालयात 4230 मुलामुलींना एमबीबीएस पदवीसाठी, तर 2200 जणांना पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश  दिला जातो. धनाढयांना डॉक्‍टर होण्याची संधी देणाऱ्या खासगी कॉलेजात ही संख्या अनुक्रमे सुमारे 2000  आणि 1000 अशी आहे. यातील पदवीचे शिक्षण झालेल्या व अनुभवासाठी त्या त्या महाविद्यालयात सेवा  देणाऱ्या निवासी डॉक्‍टरांच्या जीवावर अन्‌ जोरावर रुग्णसेवा सुरू असते. हा  काळ डॉक्‍टरांना अनुभवसंपन्न करतो, असे म्हणतात. त्यामुळे नव्या डॉक्‍टरांनी टणक व्हावे, यासाठी ही  कारकीर्द कठीणच असावी, असे ज्येष्ठ डॉक्‍टर एकमुखाने सांगतात. "कोरोना'काळात मुंबईत सुमारे  1500 निवासी डॉक्‍टर हा गाडा खेचत आहेत. त्यांना मदत करण्याची जबाबदारी रुग्णालयातल्या  परिचारिकांची व वॉर्डबॉय, आयाबाईंची आहे. ही संख्या किमान 15  ते 16 हजारांत असावी. लॉकडाउनच्या 75 दिवसांत ही आरोग्यसेवक मंडळी गायब आहेत. टाटा  हॉटेल समूहाने आणि नंतर "आयटीसी'ने रुग्णसेवकांना पाठवलेल्या भोजन सेवांवेळी हजर होणारे हे चेहरे  प्रत्यक्ष उपचाराच्या वेळी गैरहजर असतात, असे लक्षात आले. मग मुख्य सचिवांनी एकेका रुग्णालयावर  एकेक "आयएएस' अधिकारी नेमला. प्रशासक थकले, पण ही रुग्णसेवेत महत्त्वाची असणारी मंडळी हजर  झाली नाहीत. निवासी डॉक्‍टरच एकीकडे काम करत असताना साथग्रस्त होतो आहे. मुंबईत केईएम  70 रुग्णालयात, तर "नायर"मध्ये 30 निवासी डॉक्‍टरांना लागण झाली; अन्‌ ही तरुण मंडळी हादरली. मग  यातील काही जणांनी व्हिडिओ काढत वास्तव व्हायरल केले. व्यवस्थेला असे धिंडवडे निघणे कधीच मान्य  होत नसते. त्यामुळे तरुणांनी अशी आगळीक केली, तर त्यांना पदवी मिळणार नाही, असे ज्येष्ठांनी फर्मान काढले. पुढचे पुढे, आम्हीच मेलो तर "कोरोना'वर उपचार करणार तरी कोण असा प्रश्न केल्याने आता 72 तासात या चुकार कर्मचाऱ्यांनी कामावर यावे, असे आदेश मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्‍बालसिंग चहेल यांनी काढले आहेत. हे उशिरा सुचलेले शहाणपण  आहे. रुग्णालयातील वॉर्डबॉईज हे सेवेत कायम झालेले कर्मचारी आहेत. त्यांची दंडेली मोठी असते. त्यांना  राजकीय आशीर्वादही असतो. निवासी आणि प्रशिक्षणार्थी डॉक्‍टर हे जीवनदूत आहेत, त्यांची हेळसांड होत आहे.  डॉक्‍टरांनाच आधाराची गरज आहे. हे तरुण खऱ्या अर्थाने "कोविडयोद्धे' आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

आजकाल डॉक्‍टरांची संपन्न वातावरणात वाढलेली मुले या सेवेकडे अभावानेच वळतात. मध्यमवर्गीय घरातील मुलांचे डॉक्‍टरीकडे जाण्याचे प्रमाण मोठे आहे. ही मुले-मुली मध्यम शहरांतील आहेत. केंद्रीकृत प्रवेशांमुळे ती मुंबई- पुण्यात महाविद्यालयीन शिक्षणासाठी आली तर आहेत, पण कबुतरांच्या खुराड्यालाही लाजवेल अशा खोल्यात राहून शिक्षण पूर्ण करीत आहेत. या अयोग्य निवास व्यवस्थेमुळे दोन वर्षे आधी डॉक्‍टर क्षयरोगाची शिकार ठरले. त्यांचे पगार अडलेले असतात. 29 व्या वर्षापर्यंत शिक्षण सुरू राहते. काही अभियंते त्याच  वयात लाखात कमावतात. रोगराई वाढत असताना डॉक्‍टरांसाठी कल्याणकारी योजना राबवायला हव्यात.  महापालिकेचीच नव्हे, ही तर समाजाचीही जबाबदारी आहे. महाराष्ट्रातला मृत्यूदर आटोक्‍यात येत नाहीये. बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढतेय, असे सरकार सांगते आहे,  अन्‌ चाचण्या कमी केल्याने "कोरोना'बाधितांचा खरा आकडा समोर येत नसल्याचे विरोधी पक्ष म्हणतो.  उपाय प्रभावी ठरावेत, यासाठी तरी तरुण डॉक्‍टरांना आधार देण्याची गरज आहे. 
ठळक मुद्दे 
-आरोग्य व्यवस्थेचा कणा निवासी डॉक्‍टर 
-आधी मास्कची वानवा, मग "पीपीई कीट'मध्ये घामाच्या धारा 
-एकटयाने लढताहेत, वॉर्ड सांभाळण्याची जबाबदारी 
- अनेक निवासी डॉक्‍टरांना बाधा 
- त्यांच्यासाठी कल्याणकारी योजना राबविण्याची गरज 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com