शस्त्रे आणि कायदे यांचा उत्कर्ष कधीच एकत्र होत नाही. — ज्युलियस सीझर.मराठवाड्यातील नांदेडनगरी कधीकाळी सामाजिक अन् राजकीय चळवळींचे केंद्र म्हणून ओळखली जात असे. गोदाकाठी वसलेले आणि देदीप्यमान सामाजिक-राजकीय इतिहास लाभलेले हेच शहर आजमितीस गँगवॉरमुळे अक्षरशः रक्तबंबाळ झाले आहे. दाक्षिणात्य चित्रपटातील हिंसाचारालाही लाजवेल, अशी स्थिती येथे पाहायला मिळते. नांदेडमध्ये खूनसत्र सुरू असताना पोलिसांचा धाकच नाही, असे चित्र निर्माण झाले आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत सर्वसामान्य नागरिकांची होणारी लूटमार, तरुणींची छेड यांसारख्या घटना पोलिस ठाण्यातील नोंदवहीपर्यत पोहचतदेखील नाहीत. .गृहखाते दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांभाळत आहेत. त्यांनी याची गांभीर्याने दखल घेऊन काही मूलभूत उपाययोजना करायला हव्यात. हल्ली त्यांना विरोधी पक्ष सोडले तर दुसरे कुणीच घाबरत नाही, असे वाटण्याजोगी स्थिती आहे. सध्याचा रक्तपात ही फक्त एकट्या नांदेडची कथा नाही. याआधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील वाल्मीक गँगच्या कारवाया चव्हाट्यावर आल्या होत्या. जालन्यातही गुंडगिरी माजली आहे. लातूरमध्येही महाविद्यालयात गुंडांनी विद्यार्थ्याचा खून केला होता..नांदेडमध्ये तर मागील तीन दिवसांतच पाच खून झाले आहेत. या गुन्हेगारी कारवायांमागचे ‘पंजाब कनेक्शन’ लपून राहिलेले नाही. तरुणाईच्या हाती अगदी सहजपणे पडणारी शस्त्रे त्यांना नकळतपणे गुन्हेगारी जगतामध्ये घेऊन जातात. ‘थ्रिल’मधून सुरू झालेला हा प्रवास नंतर टोळ्यांमधील वर्चस्ववादापर्यंत जाऊन कधी पोहोचतो, तसेच महाविद्यालयीन तरुण याला बळी पडतात, ते कुणालाच कळत नाही. यातही सर्वांत चिंताजनक बाब म्हणजे तरुणाईमधील गुन्हेगारीचे वाढत चाललेले आकर्षण. यातूनच शहरांमध्ये नवनव्या टोळ्यांचा जन्म होतो. या टोळ्यांत आपापसांत प्रचंड स्पर्धा असते. ‘खून का बदला खून’ या न्यायाने प्रत्येकजण प्रतिस्पर्ध्याच्या नरडीचा घोट घेण्यासाठी आसुसलेला असतो. .गुन्ह्यांमधील अल्पवयीन आरोपींचे वाढते प्रमाण हे चिंताजनक आहे. हे सगळे संपावे, असे मुळात आपल्या व्यवस्थेला वाटते का, असाच प्रश्न निर्माण होतो. पोलिस दलांतील सुधारणांचा विषय आपल्याकडे नुसता चर्चिला जातो. परंतु कोणीही त्या मूलभूत आव्हानाला सामोरे जात नाही. तमिळनाडूत कोठडीतील मृत्यूप्रकरणी नऊ पोलिसांना फाशीची शिक्षा सुनावणारा ताजा न्यायालयीन निर्णय महत्त्वाचा आहे. कायद्याचे रक्षकच भक्षक बनले तरी काय करायचे, असा प्रश्न न्यायाधीशांनी उपस्थित केला. तो फक्त त्या राज्यापुरता मर्यादित आहे, असे म्हणण्याजोगी स्थिती नाही..गुन्ह्यांमधील अल्पवयीन आरोपींचे वाढते प्रमाण हे चिंताजनक आहे. हे सगळे संपावे, असे मुळात आपल्या व्यवस्थेला वाटते का, असाच प्रश्न निर्माण होतो..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.