बदलती गावे : नांदगाव पेठ - उद्योगांच्या ‘धाग्या’ने विकासाचे वस्त्र

आज नांदगावपेठची ग्रामपंचायत ही अमरावती जिल्ह्यातील सर्वाधिक संपन्न म्हणून गणली जाते. विशेष म्हणजे, या भागातील अनेकांना याच व्यावसायिक संकुलांनी रोजगाराचे साधनसुद्धा उपलब्ध करून दिलेले आहे.
nandangaon peth
nandangaon pethsakal

गावात एकेकाळी कुठल्याही सोयी नव्हत्या. नांदगावपेठ सर्वसाधारण ग्रामपंचायतीसारखीच ग्रामपंचायत, गावात कुठल्याही सोयी नाहीत. युवकांमध्ये शिक्षणाविषयी फारशी आस्था नाही. शेती असली तर करायची, नसली तर दुसऱ्यांच्या शेतामध्ये राबायचे. युवकांमध्ये करिअरबाबत जागरूकताच नाही, अशी स्थिती. हेच जीवनचक्र पिढ्यान् पिढ्या सुरू असतानाच गेल्या काही वर्षांत हळूहळू गाव आणि परिसरात उद्योगांची रेलचेल वाढायला लागली, नागरिकांची वर्दळ सुरू झाली. आज नांदगावपेठची ग्रामपंचायत ही अमरावती जिल्ह्यातील सर्वाधिक संपन्न म्हणून गणली जाते. विशेष म्हणजे, या भागातील अनेकांना याच व्यावसायिक संकुलांनी रोजगाराचे साधनसुद्धा उपलब्ध करून दिलेले आहे.

नांदगावपेठची मूळ ओळख एवढीच की हे गाव अमरावती-नागपूर महामार्गावरील मोक्याचे ठिकाण आहे. नागपूरला जाणारे किंवा अमरावतीकडे येणारे प्रवासी या ठिकाणी आवर्जून चहा-नाश्त्यासाठी थांबतात. त्यापेक्षा फार काही वेगळी ओळख या गावाला नव्हती. गावाची सध्याची लोकसंख्या २५ हजारांच्या घरात आहे. कठोरा, माहुली जहांगीर, कापूसतळणी, रहाटगाव या मोठ्या गावांसह तेवीसहून अधिक गावे नांदगावपेठशी व्यापार आणि इतर कारणांनी जोडली आहेत.

नांदगावपेठ येथे पंचतारांकित औद्योगिक वसाहत निर्माण झाली आणि उद्योगांची रेलचेल वाढू लागली. काही लहान-मोठ्या उद्योगांच्या बळावर स्थानिकांना प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरित्या रोजगाराची संधी उपलब्ध होऊ लागली. मात्र मागील काही वर्षांत औष्णिक ऊर्जा प्रकल्प, रेमण्डस्, सियाराम, श्याम इण्डो फॅब यांसारख्या कंपन्यांनी येथे उद्योग सुरू करून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. त्यांच्यापाठोपाठ इतर उद्योगांना येथील पंचतारांकित वसाहतीने आकर्षित केले आहे. नांदगावपेठ म्हणजेच औद्योगिक, टेक्सटाइल्स हब अशी नवी ओळख मागील काही वर्षांत विकसित झाली आहे. त्याबरोबर वाढलेल्या उद्योगांना पायाभूत आणि भौतिक सोयीसुविधा पुरवण्यासाठी अनुषंगिक व्यापार, उदीम वाढून विस्तारला आणि स्थिरावला आहे. या सगळ्याचा परिणाम म्हणून स्थानिकांच्या जीवनात विकासाची नवी पहाट झाली आहे.

केवळ नांदगावपेठ औद्योगिक वसाहतीमुळेच हे गाव प्रसिद्धीस आले असे नाही तर आता या ठिकाणी दुसरा टेक्सटाइल हब म्हणजे बिझीलॅण्ड, सिटीलॅण्ड आणि ड्रीम्सलॅण्ड या कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेले कापड मार्केट झाले. त्याने या भागातील नागरिकांचे जीवनमानच बदलून टाकले आहे. शिक्षित असो की अशिक्षित, प्रत्येकालाच कमी अधिक प्रमाणात येथे रोजगार उपलब्ध झालेला आहे. त्यामुळेच या गावाला आर्थिक सुबत्तासुद्धा आलेली आहे. विशेष म्हणजे, या तीनही ठिकाणी कापडाची जवळपास १२०० मोठे होलसेल मार्केट आहेत. येथूनच संपूर्ण राज्यातच नव्हे तर परप्रांतातसुद्धा कापड विक्रीला जाते.

काही दुकानांमध्ये ८, तर मोठ्या दुकानांमध्ये १०० ते १५० कामगार, कर्मचारी काम करत आहेत. त्यातही महिला कामगारांचे प्रमाण अधिक आहे. युवकांना या कारखान्यांमध्ये थेट रोजगार तर मिळालाच, सोबत चहाटपऱ्या, ऑटोरिक्षा, मिनी ट्रक, भाड्याची घरे, किराण्यासह इतर दुकाने यांच्या माध्यमातून अनेकांना अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधीही उपलब्ध झाल्या आहेत. गावातच रोजगार उपलब्ध झाल्याने अनेक स्थानिक युवकांनी आयटीआय, तंत्रशिक्षणाचे धडे घेत नवनवीन उद्योगांचा श्रीगणेशा केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com