देशी-परदेशी वृक्ष वाद निरर्थक

देशी-परदेशी वृक्ष वाद निरर्थक

जैववैविध्य राखण्यासाठी पूर्वापार चालत आलेल्या वाणांचे जतन-संवर्धन करावे; पण त्यासाठी देशी विरुद्ध परदेशी वृक्ष असा अशास्त्रीय वाद घालण्याची अजिबात गरज नाही. 

देशी विरुद्ध परदेशी वृक्ष आणि वनस्पती हा अलीकडे चर्चेचा विषय झाला आहे. या विषयावर अनेक अभ्यासक लेख आणि भाषणांतून गेली अनेक वर्षे संदिग्ध आणि विसंगत लिहीत-बोलत आहेत. हा लेख लिहिण्यामागे हेतू हा आहे, की या विषयावर व्यापक चर्चा व्हावी आणि त्यावर वनस्पतितज्ज्ञांनी मते मांडावीत. 

खरेतर ‘वसुधैव कुटुंबम‘ किंवा ‘हे विश्‍वचि माझे घर‘ या घोषणा मानवी; परंतु त्या तत्त्वांचे पालन करणारे मानव नव्हे, तर पशू, पक्षी, कीटक आणि इतर जैविक घटक, त्यात वृक्ष व सर्व वनस्पतीही आल्या, हे होत. गॉडवीट हा पक्षी 11हजार किलोमीटर प्रवास अगणित देशांत करतो, तर समुद्रात पडलेला नारळ दोन हजार मैलांवर जाऊन रुजतो. तेव्हा वृक्षांना व वनस्पतींना देशी आणि विदेशी अशी सरसकट विशेषणे लावणे बरोबर नव्हे. वनस्पतींना देशसीमा नाहीत. अनुकूल हवामान, पाण्याची उपलब्धता अशा जल-वायुमान अनेक गोष्टींनी आपोआप अथवा मानवी हस्तक्षेपाने त्यांचे स्थलांतर अविरत चालू आहे. आपल्या परिसरात नैसर्गिक रीतीने वाढत असलेले वृक्ष हे आपले वृक्ष हे मान्य करता येईल. काही विद्वान वेदांतील आणि संस्कृत वाङ्‌मयातील श्‍लोक घेऊन त्यात उल्लेखिलेले वृक्ष हे आपले वृक्ष म्हणत असतील, तर त्यावर आक्षेप येतो. वेदकाल व वेदकालीन मानव हा सुमारे तीन-साडेतीन हजार वर्षांपूर्वी होऊन गेला आणि त्याची वस्ती त्या काळी भारतात नव्हती. इतर देशांत होती, तेव्हा उल्लेखित वृक्ष त्या देशातील आणि त्या काळातील गृहीत धरावे लागतील. या मोठ्या कालावधीत अनेक वृक्षांमध्ये नैसर्गिक जनुकीय परिवर्तन होऊन नव्या जातीही निर्माण झाल्या असतील. त्यामुळे ते वृक्ष आपले आहेत काय, हे तपासावे लागेल. 

उपद्रवकारक व विषारी वनस्पती, मग त्या देशी-विदेशी, कोणत्याही असोत त्या नष्ट करावयास हव्यात हे मान्यच करावे लागेल. परंतु, काही उपयुक्त व नैसर्गिक सौंदर्य खुलविणारे वृक्ष केवळ ते विदेशी आहेत, म्हणून लावू नयेत असे म्हणणे चुकीचे आहे. उदा. गुलमोहोर, जकारांडा, कॅशियाच्या जाती, स्पॅंथोडिया, मणिमोहर, अम्‌हरस्टीया नोबिलिस, ब्राऊनिया इत्यादी सुंदर, आकर्षक फुलांचे वृक्ष ते विदेशी असल्याने लावू नयेत, हे पटण्यासारखे नाही. तसेच महोगनीसारखे उत्तम लाकूड देणारे वृक्ष केवळ विदेशी म्हणून वर्ज्य करणे बरोबर नाही. सिंगापूर चेरी आणि विलायती चिंच हे वृक्ष विदेशी खरे; पण ते आपल्या (?) पक्ष्यांना, खारींना आवडतात. किंबहुना विलायती चिंचेची गोड फळे खाण्याकरिता मुले धडपडत असल्याचे नेहमीच दिसते. ही झाडे आपण लावणार नाही काय? रबराचे झाड, गर्द, शांत सावली देते, टिकाऊ असते आणि मुख्य म्हणजे ते वड-पिंपळ कुळातीलच आहे. केवळ विदेशी म्हणून त्याचा दुस्वास करावा काय? चीनमधून आलेल्या तुतीच्या वृक्षामुळेच रेशीम उद्योग वाढला आहे. तेही झाड केवळ परदेशी म्हणून लावले नसते तर जागतिक कीर्तीचे रेशमी कापड येथे निर्माणच झाले नसते. 

वनस्पतींच्या अशा पंक्तिप्रपंचांमुळे आणि काही वाणांवर बंदी घातल्याने शेतीवर काय परिणाम होईल हे पाहू. सुदैवाने आजपर्यंत तरी अशी बंधने न आल्याने शेती, अन्नधान्य, फळे, भाजीपाला यांची प्रगती बरी आहे. मात्र देशी-विदेशी विचारांच्या प्रभावामुळे सध्या जीटी-बीटी व इतर नव्या वाणांना विरोध होत आहे. पहिल्या महायुद्धात पकडलेले चिनी कैदी महाबळेश्‍वरमध्ये बंदिस्त होते. त्यांनी स्ट्रॉबेरीची रोपे आणली होती. ती लागवड यशस्वी झाल्याने स्थानिक शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरी लावणे सुरू केले. आज त्या लागवडीचा इतका प्रसार झाला आहे, की भारतातील 80 टक्के फळे या परिसरातून जातात. नुकतीच बातमी वाचली, की थायलंडचे ‘एनर्जी टॅबलेट‘ म्हटले जाणारे फळ कोकणात पिकणार. जगभर मागणी असलेले थायलंडमधील मॅंगोस्टीन फळाची लागवड दापोलीत यशस्वी झाली आहे. द्राक्षे निर्यात करून सांगली, नाशिक येथील शेतकरी शेकडो कोटींचे परकी चलन भारताला मिळवून देत आहेत. या सर्व द्राक्षजाती अफगाणिस्तान व उत्तर अमेरिकेतून आल्या आहेत. मोझॅम्बिकमधून एक लिंबूवर्गीय वृक्ष महाराष्ट्रात आणला गेला. ते फळ मोझॅम्बिकमधून आल्याने मोसंबी या नावाने ओळखले जाते. खरे तर पुष्कळ फळझाडे ही परदेशी आहेत. उदा. ः पेरू, चिकू, फणस, पपई, केळे, लिची, काजू इत्यादी. 

भारतीय उपखंडात अरब, ज्यू, पोर्तुगीज आणि ब्रिटिश यांचा वावर पूर्वापार होता. त्यापैकी अरब व्यापारी दीड हजार वर्षांपासून वृक्ष, वनस्पती आणून रुजवत आहेत. त्यांच्यामार्फत प्रसार झालेल्या वनस्पतींची यादी ः पोर्तुगीज - लाल भोपळा, बटाटा, काजू, सीताफळ, चिकू, पेरू, तंबाखू, मिरची, टोमॅटो. अरब, मुघल - कांदा, लसूण, कोबी, खरबूज, गाजर, खजूर, द्राक्ष. ब्रिटिश - बीट, कॉली फ्लॉवर, नवलकोल, स्ट्रॉबेरी, अल-बुखार, खसखस. या यादीवरून या तथाकथित परदेशी वनस्पती आपल्या आहारात किती सखोल विसावल्या आहेत व त्यामुळे संपन्नता आली आहे हे समजेल. 

तात्पर्य, वनस्पती व प्राणी या दोन्ही विश्‍वातील जिवांना माणसाने तयार केलेल्या सीमा, हद्दी अशी कुंपणे मान्य नसतात. माणसाला मिळणाऱ्या अन्नामध्ये, त्याने कमावलेल्या शेतीमध्ये जी विपुलता, संपन्नता व वैविध्य आज आढळते, ते या सरहद्द-हीन प्रसारामुळे! वैविध्य राखण्यासाठी पूर्वापार चालत आलेल्या वाणांचे जतन-संवर्धन करावे. पण त्यासाठी देशी विरुद्ध परदेशी असा अशास्त्रीय वाद घालण्याची अजिबात गरज नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com