
अद्वैत : एक अंतर्यात्रा
- प्रा. नवनाथ रासकर
मानवी जीवनातील संघर्ष किंवा भांडण जे आहे ते ‘तू’ ‘मी’ मधील भांडण आहे. हा ‘मी’ म्हणजे माझा ‘अहंकार’, ‘मीपणा’ तसाच ‘तू’पणातही हाच मीपणा असतो. या मीपणाचे- अहंकाराचे शेवाळ बाजूला केले की खऱ्या ‘मी’चे आत्मतत्त्वाचे भान होते.
तसेच ते पुढच्यालाही होते. तेव्हा तू, मी ची भाषा संपते. कारण अहंकारामागे एकच आत्मतत्त्व असते. किंबहुना माणसासहित सर्व जीवांमध्ये एकच तत्त्व असते, हा भारतीय विचार जगाला मिळालेली शतकानुशतकांची देणगी आहे.
उपनिषदांतील हा विचार आठव्या शतकात आद्य शंकराचार्यांनी ‘केवल अद्वैत’ या स्वरुपात मांडला. ब्रह्म सत्य जगन्मिथ्या, जिवो ब्रह्मैव नापर:। या सूत्राने तो लोकांपुढे ठेवला. हा सिद्धांत एक मूल्य किंबहुना सर्वोच्य मूल्य आहे. जीवनाचे सूत्र आहे. आपल्या भारतीय समाज मनावर त्याचे अप्रत्यक्षरीत्या गारुड आहे.
आपल्यात असलेली सहिष्णूता, इतरांबद्दल कणव-प्रेम जे वाटत असते. तसेच हरतऱ्हेचे समाज आपल्या देशात हजारो वर्ष गुण्यागोविंदाने एकत्र राहत आहेत. त्याचे कारण अद्वैत विचारधारेत आहे, हे मान्य करावे लागेल. ‘जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी’ एकच तत्त्व एकच परमेश्वर आहे, ही भावना भारतीय मनात कायम आहे.
अनेक देवदेवतांची मंदिरे तसेच पुजाअर्चा आणि भक्ती व त्यानुसार विविध संप्रदाय असूनही सगळे देव सारखेच आहेत. सर्व लौकिक देवांमध्ये एकच विश्वात्म देव आहे, अशी आपल्या समाजाची धारणा आहे. या सर्वांमागे अद्वैत वेदांताचे योगदान आहे.
आज आपले समाजमानस काहीसे चंचल झाले आहे. प्रलोभनांनी भरलेले जग आणि मुठीत आलेल्या मोबाईलमध्ये रमलेले मन जागे करण्यासाठी मी कोण? पासून मी अमूक (ब्रह्म) आहे, हा प्रवास करावा लागतो. ही अंतर्यात्रा असते, साधनापथ असतो.
शंकराचार्यांनी तो सांगितला आहे ब्रह्म आहे (सत), त्याचे असणे जाणीव स्वरूप (चित) आहे आणि ते आनंदरूप आहे. म्हणजेच ते ‘सतचितआनंदस्वरूप’ आहे. जग मिथ्या आहे म्हणजे खोटे किंवा भासमय असे नाही; तर त्याच्यात सतत बदल होत आहेत. म्हणजे ते स्थिर नाही. पण त्याला व्यावहारीक मोल आहे. पारमार्थिक दृष्ट्या मात्र ते निरर्थक आहे.
‘जिवो ब्रह्मैव नापर:’ या म्हणण्याचा अर्थ जीव ब्रह्माहून वेगळा नाही. ब्रह्म कोठे आहे तसेच त्याची प्रचिती कशी येईल? अद्वैत दृष्टीनुसार ज्याला आपण मी किंवा जीव असे म्हणतो तोच वस्तूत: ब्रह्म होय. ब्रह्म हा शब्द बृह् या धातूपासून बनला असून त्याचा अर्थ वाढणे, विकसित होणे, व्यापणे असा आहे. यावरून अवघ्या विश्वाला ज्याने व्यापले आहे तेच ब्रह्म होय. ब्रह्म ही जाणिव आहे. ती एकमेवाव्दितीय आहे.
जीवाला आत्मा म्हटलेले आहे. आत्मा आणि ब्रह्म या दोहोत अद्वैत आहे. अद्वैत म्हणजे दोन नसणे. अनेक नसणे, खरेतर एकही नसणे. या पद्धतीने अद्वैताचा अर्थ प्रतिपादन करता येतो. अशा तऱ्हेने अद्वैत समजले की या विचाराची महती लक्षात येते. अर्थात हे ‘अद्वैत’ अंतिम सत्य आहे, असे शंकराचार्यांनी सिद्धांत रूपाने मांडले.
आता प्रश्न आहे की जगात हरतऱ्हेची माणसे आणि इतर जीव राहतात. त्यांच्यात अद्वैत कसे साधायचे? त्यासाठी त्यांनी ज्ञानाने असे उत्तर दिले आहे. ज्ञानानेच अद्वैताची अनुभूति येते. म्हणजे अद्वैत ही आपल्या मनाची सर्वोच्च, भेदाभेदरहीत अशी अवस्था आहे. ‘तू’ ‘मी’तील मीपणा दूर झाला की, मी ब्रह्म आहे, या वैश्विक जाणिवेचे भान आपल्या ठिकाणी होते. मी कोण आहे? या प्रश्नाचे उत्तर ‘अहम् ब्रह्मास्मि’, मी ब्रह्म आहे, असे मिळते. तात्पर्य ‘हे विश्वचि माझे घर। ऐसी मती जयाची स्थीर।।’ अशी अवस्था प्राप्त होते. मग संघर्ष का आणि कोणाशी? हेच अद्वैताचे प्रयोजन आहे.