'राष्ट्रवादी'ला दणका

'राष्ट्रवादी'ला दणका

विधान परिषद निवडणुकीत "राष्ट्रवादी'चा एकमात्र उद्देश कॉंग्रेसचे नाक कापणे, हाच होता आणि त्यासाठी त्यांनी शिवसेना-भाजपशी काही ठिकाणी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हातमिळवणी केली होती. मात्र, ते डावपेच नुसते अयशस्वीच ठरले नाहीत, तर उलट "राष्ट्रवादी'च्या अंगाशी आल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीत चमत्कार आपल्या देशात काही फक्‍त महाराष्ट्रातच घडून येतात, असे बिलकूलच नाही! मात्र, यंदाच्या या निवडणुकीला एक आगळीवेगळी पार्श्‍वभूमी होती आणि ती होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजार-पाचशेच्या नोटा चलनातून बाद करण्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयाची. त्यामुळेच या निवडणुकीत काही चमत्कार घडून येणार की नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली होती. त्यातच राष्ट्रवादी कॉंग्रेसने कॉंग्रेसबरोबर समझोता करण्यास नकार दिला होता. शिवाय, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसशी समझोता करू नये, अशी ठाम भूमिका घेऊन सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची जागा प्रतिष्ठेची केली होती. त्यांची ही खेळी यशस्वी ठरली आणि कॉंग्रेसने ती जागा "राष्ट्रवादी'कडून खेचून घेतली. सहा जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि कॉंग्रेस यांनी प्रत्येकी दोन जागा जिंकल्या, तर "राष्ट्रवादी' आणि शिवसेना यांना प्रत्येकी एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. भाजपची एकच जागा या निवडणुकीत वाढली असली तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी हा मोठाच विजय आहे; कारण "राष्ट्रवादी'चे बडे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या भंडारा-गोंदिया या बालेकिल्ल्यात मिळवलेला हा विजय फडणवीस यांना मोठेच बळ देऊन जाणारा आहे. त्यामुळे दोन जागा गमावणाऱ्या "राष्ट्रवादी'चे या निवडणुकीत नाक कापले गेले, असे म्हणता येते! त्याचे एक कारण म्हणजे "सातारा-सांगलीत हेलिकॉप्टरने नव्या नोटा टाकल्या तरीही "राष्ट्रवादी'चा विजय निश्‍चित आहे,' अशी भाषा करण्यापर्यंत "राष्ट्रवादी'च्या काही बड्या नेत्यांची मजल गेली होती. त्यामुळेच या निवडणुकीत मिळवलेल्या विजयानंतर जळगावात भाजप कार्यकर्त्यांनी चक्‍क दहा आणि वीसच्या नोटा उधळून जल्लोष केला. या उधळपट्टीत हजार-पाचशेच्या नोटा नसल्या तरीही काळा पैसा बाहेर काढण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयास यामुळे हरताळच फासला गेल्याचे दिसते.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासाठी जळगाव, तसेच भंडारा-गोंदिया या दोन्ही ठिकाणच्या विजयास विशेष महत्त्व आहे. खानदेशातील भाजपचे बडे नेते आणि मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतील फडणवीस यांचे "नाराजमान्य नाराजश्री' स्पर्धक एकनाथ खडसे हे या निवडणुकीत काही अपशकून करण्याची शक्‍यता होती. मात्र, त्यांच्यावर मात करण्यात मुख्यमंत्री यशस्वी झाले, तर भंडारा-गोंदिया येथील उमेदवार परिणय फुके यांच्यासाठी त्यांनी आपली सारी प्रतिष्ठा अप्रत्यक्षरीत्या पणास लावली होती. फुके हे खरे तर विविध कारणांनी सध्या बदनामीच्या गर्तेत सापडलेले आहेत आणि जाहीरपणे फडणवीस त्यांना जवळही करत नाहीत. तरीही ते निवडून यावेत, अशीच त्यांची सुप्त इच्छा होती. ती पूर्ण झाली आहे! शिवसेनेच्या पदरात मात्र फक्‍त यवतमाळ-वाशीम येथील एकमात्र जागा पडली. तेथून तानाजी सावंत विधान परिषदेत आले आहेत. त्याचवेळी सातारा-सांगलीत यश मिळवून पृथ्वीराजबाबांनी आपली करामत पूर्णत्वास नेली आहे. या मतदारसंघात माजी अर्थमंत्री आणि "राष्ट्रवादी'चे नेते जयंत पाटील, तसेच रामराजे निंबाळकर यांच्या साऱ्या गमजा फुकाच्या ठरून तेथे कॉंग्रेसचे मोहनराव कदम यशस्वी झाले आहेत. आता काही लोक सातारा-सांगलीतील "राष्ट्रवादी'च्या पराभवास त्यांच्याच पक्षाच्या एका बड्या नेत्याने सुरुंग लावल्याचे सांगत आहेत. मात्र, ही पश्‍चातबुद्धी असून, त्यास काही अर्थ नाही. नांदेडमधून अमर राजुरकर या आपल्या निकटवर्ती कार्यकर्त्यास विधान परिषदेत पाठवण्यात यशस्वी झाल्याने कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपला गड राखला आहे! तेथे अपक्ष उमेदवाराच्या पाठीशी शिवसेना-भाजप-"राष्ट्रवादी' यांनी आपले बळ उभे केले होते. तरीही राजुरकरच विजयी झाले. "राष्ट्रवादी'साठी पुण्यात मिळवलेला मोठा विजय एवढी एकच जमेची बाब ठरली आणि या परिसरातील अजित पवार यांच्या वर्चस्वावर त्यामुळे शिक्‍कामोर्तब झाले. या निवडणुकीत "राष्ट्रवादी'ने केवळ विजयच मिळवला असे नाही, तर कॉंग्रेसची पन्नासच्या आसपास मतेही फोडली! त्यामुळे हातात केवळ 298 मते असताना "राष्ट्रवादी'चे अनिल भोसले हे चक्‍क 440 मते घेऊन पहिल्याच फेरीत विजयी झाले. ही आकडेवारी भोसले यांनी या निवडणुकीत झालेल्या शिवसेना-भाजप युतीचीही काही मते फोडल्याचे दाखवत आहे.


याचा अर्थ बहुतेक सर्वच पक्षांत या सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत पक्षाबाहेर मतदान झाल्याचे दिसते. तरीही "राष्ट्रवादी'ला या निवडणुकीत मिळालेला दणका मोठा आहे. "राष्ट्रवादी'चा या निवडणुकीतील एकमात्र उद्देश कॉंग्रेसचे नाक कापणे, हाच होता आणि त्यासाठी "राष्ट्रवादी'ने शर्थीने व्यूहरचना केली होती. शिवसेना-भाजपशी काही ठिकाणी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हातमिळवणी करण्यापर्यंत त्यांनी पावले उचलली होती. मात्र, ते डावपेच अयशस्वीच ठरले नाहीत, तर अंगाशीही आले. त्यामुळे आता या निवडणुकीपासून काही बोध घेऊन "राष्ट्रवादी' आपली तिरकी चाल बदलेल काय, हाच खरा प्रश्‍न आहे; अन्यथा "राष्ट्रवादी'चे बडे नेते थेट मोदी यांच्यावर करत असलेल्या टीकेला काहीही अर्थ उरणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com