भाष्य : पुतीनशाहीचा बेलगाम वारू 

निखिल श्रावगे
Friday, 22 January 2021

आपल्या सत्तेला कोणत्याही प्रकारचा विरोध रशियाचे अध्यक्ष पुतीन यांना सहन होत नाही, हे पुन्हा दिसून आले. अत्यंत महत्त्वाकांंक्षी असलेले पुतीन रशियात सर्वंकष पकड निर्माण करीत आहेतच; पण अमेरिकेला आव्हान देत आंतरराष्ट्रीय पातळीवरही दबदबा वाढविण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसते.

आपल्या सत्तेला कोणत्याही प्रकारचा विरोध रशियाचे अध्यक्ष पुतीन यांना सहन होत नाही, हे पुन्हा दिसून आले. अत्यंत महत्त्वाकांंक्षी असलेले पुतीन रशियात सर्वंकष पकड निर्माण करीत आहेतच; पण अमेरिकेला आव्हान देत आंतरराष्ट्रीय पातळीवरही दबदबा वाढविण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसते.

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे विरोधक अलेक्‍सी नवाल्नी यांना मॉस्को विमानतळावर नाट्यमयरीत्या अटक करण्यात आली. पुतीन यांचे जे काही तुरळक विरोधक हयात आहेत, त्यातील नवाल्नी हे आजच्या घडीतील सर्वात प्रभावशाली नेते. त्यांच्यावर गेल्या वर्षी झालेला विषप्रयोग आणि आता झालेली अटक याची कारणमीमांसा करणे गरजेचे आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बोरिस येल्त्सीन या रशियाच्या माजी अध्यक्षांकडून १९९९मध्ये पुतीन यांनी सत्ता हस्तगत करीत आपल्या पर्वाची सुरुवात केली. एककल्ली कारभाराकडे ओढा असणाऱ्या पुतीन यांनी आपल्या एक-एक टीकाकाराला आणि राजकीय विरोधकाला रशियात वा थेट रशियाबाहेर अगदी नेम धरून मारले आहे. दोन दशकांहून अधिक काळ सत्तेच्या गाभाऱ्यात असणारे पुतीन इतर कोणास आत शिरू देत नाहीत, हे एव्हाना जगजाहीर आहे. तरीही संविधानाच्या शरीरात क्षीण झालेल्या लोकशाहीच्या आत्म्यास फुंकर घालण्याचे काम नवाल्नी गेली काही वर्षे करीत आहेत. अर्थातच पुतीन यांना ते रुचत नाही. निवडणुकीत अपात्र ठरवले जाण्यापासून ते खोटे खटले भरण्यापर्यंत आणि आंदोलन दडपण्यापासून ते विष घालण्यापर्यंत आपल्या भात्यातील प्रत्येक बाण पुतीन यांनी नवाल्नींविरोधात वापरले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विषप्रयोगानंतर जर्मनीमधील रुग्णालयात उपचारानंतर मायदेशी परतणाऱ्या नवाल्नींना अशाच क्षुल्लक प्रकरणात अटक करून कोठडीत डांबले आहे. त्यांना अटक करताना दाखवलेली शिताफी पुतीन यांची रशियाच्या व्यवस्थेवरची पकड दाखवून देते. पुढील महिन्याच्या १५तारखेपर्यंत तुरुंगवास भोगू पाहणाऱ्या नवाल्नींचा काटा काढणे ही पुतीन यांच्यासाठी किरकोळ गोष्ट आहे. जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन, अमेरिका या देशांच्या नेत्यांनी याबाबत प्रश्न विचारले असता, ‘हा रशियाचा अंतर्गत मामला आहे. तुम्ही आपल्या देशांतील अडचणींकडे बघा,’ असा शेरा पुतीन यांच्या सहकाऱ्यांनी मारला आहे. इतके असतानाही नवाल्नी समर्थकांनी आपला रेटा लावत पुतीन यांच्या कथित राजप्रासादाचे तपशील जाहीर करीत एकच हाहाकार माजवला आहे.

जगातले पर्यायी सत्ताकेंद्र
संपूर्ण व्यवस्थेचे मूठभर लोकांमधले केंद्रीकरण हा पुतीन यांच्या कार्यशैलीचा गाभा आहे. निरंकुशपणे सत्ता एकवटवायची, तीस राष्ट्रवादाचा मुलामा देत बहुतांशी लोकांना गुंगीत ठेवायचे आणि छुप्या कारभाराद्वारे मोजक्‍यांचे हित साधायचे, असे त्यांचे सोपे गणित आहे. यात प्रश्न विचारणे, विरोध करणे बसत नाही. कोरोना बाधितांचे आकडे असूदे वा आचके देणाऱ्या अर्थव्यवस्थेचा आलेख सगळे आकडे फसवेच दाखवायचे. याचा अंदाज घेऊन पाश्‍चात्य देशांनी वेळोवेळी आवाज उठवला, नाराजी व्यक्त करीत पुतीन यांना विरोध दर्शवला. आर्थिक नाकेबंदीद्वारे त्यांची अडचण करू पाहिली. मात्र, ते सगळ्यांना पुरून उरलेले दिसतात. बराक ओबामांच्या अध्यक्षीय कार्यकालात अमेरिका-रशिया संबंध कमालीचे ताणले गेले. पुतीन यांना हे जड जाईल असे वाटत असतानाच त्यांनी उत्तर कोरिया, चीन, इराण हे नवे मित्र जोडले. सीरियात मध्यस्थी करून पश्‍चिम आशियात आपले हातपाय पसरत अमेरिकेची पोकळी भरून काढली. आज तेलाची दरवाढ असो वा पश्‍चिम आशियातील राष्ट्रांमधील वाद, तेथील सर्व घटक क्रेमलिनचे दरवाजे ठोठावतात.

‘अमेरिका फर्स्ट’ म्हणत अध्यक्ष असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे अंग सगळीकडून काढून घेतले. तसेच, पुतीन यांच्याबाबत अत्यंत मवाळ धोरण स्वीकारले. गेल्या चार-पाच वर्षांचा हिशेब पाहता पुतीन यांनी बहुतांशी जागतिक प्रश्नांबाबत अमेरिकेस दूर सारीत पर्यायी सत्ताकेंद्र उभे केले. २००१मध्ये नवख्या पुतीन यांचे ‘अंतर्मन आपण जाणतो’ असे जाहीररीत्या बोलून अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश चुकले आणि त्यानंतर पुतीन यांचा वारू सुटला तो सुटलाच. त्याला रोखताना अमेरिकेचे नूतन अध्यक्ष बायडेन प्रशासनाचा कस लागेल, असे दिसते. 

उपद््व्यापी राजकारणी
या प्रकरणातील नवाल्नी समर्थकांची धुगधुगी पाहता हे लवकर कसे आटोपले जाईल, याची चिंता पुतीन यांना असावी. कारण येत्या सप्टेंबरमध्ये रशियाच्या संसदेच्या कनिष्ठ सभागृहाची निवडणूक आहे. लांबचा विचार करता, २०२४मधील अध्यक्षीय निवडणूक बिनविरोध होण्यासाठी पुतीन यांचा खटाटोप चाललाय. घटनेत दुरुस्ती करून आपण २०३६पर्यंत सत्तेत राहू याची तजवीज त्यांनी आधीच केलेली आहे. त्यात, रशियातील निवडणूक आणि त्यातील गैरप्रकार हे दोन मुद्दे वेगळे करताच येत नाहीत. त्यामुळे एखादा विरोधक वातावरण तापवू जरी लागला तरी निवडणूक खिशात कशी टाकायची यात पुतीन पटाईत झाले आहेत. दुसऱ्या देशात तिसऱ्या राष्ट्राविरोधात छुपा संघर्ष चालवून हिंसाचार घडवणे, विरोधी राष्ट्राची सायबर सुरक्षा भेदत प्रमुख संस्थांवर थेट हल्ला चढवणे, इतर देशातील निवडणुकीत हस्तक्षेप, हेरगिरी, बनावट आणि खोट्या बातम्या पेरत एखाद्या नेत्याची वा देशाची बदनामी हे पुतीन यांच्या आवडीचे विषय आहेत. सांप्रत काळातील या बदललेल्या युद्धनीतीचे पुतीन जनक आणि पुरस्कर्ते समजले जातात. सध्या, अनेक देशात एककल्ली नेते सर्वोच्च स्थानी आहेत. यात ट्रम्पदेखील मोडतात. काय वाट्टेल ते करून सत्ता राखणे हेच ध्येय त्यांचे होते. गेल्या पंधरवड्यात अमेरिकेच्या संसदेवर ट्रम्प समर्थक चालून गेले, तो याचाच भाग. या लोकशाहीवादी देशांमध्ये अशा घटना घडणे गंभीर असले तरी तेथील लोकशाहीचे रक्षण करणाऱ्या इतर संस्था जागरूक दिसल्या. रशियात तशी सोय नाही; हाच तुलनात्मक फरक पुतीन यांना अधिक धोकादायक राजकारणी ठरवतो आहे. 

जगभरातील उजव्या विचारसरणीच्या नेत्यांचे ट्रम्प प्रतिनिधित्व करत होते, असा समाजातील एका गटाचा ठाम समज आहे. ट्रम्प यांच्या पराभवानंतर या राष्ट्रवादी विचारसरणीच्या पुढाऱ्यांच्या उतरणीला वेग येईल, असे जाणकारांचे मत असले तरी सद्यस्थितीत चीन आणि रशियाकडे बघून त्यांच्यावर तसे दिवस येतील असे आत्ता तरी वाटत नाही. जो बायडेन सोडून अमेरिकेचे तीन अध्यक्ष पुतीन यांनी पचवले आहेत. सारासार विचार करता, पुतीन सोडून इतर कोणत्याही प्रमुख देशांचे समकालीन नेते सत्तेच्या इतक्‍या जवळ सलग सुमारे २०वर्षे राहिलेले नाहीत. पुतीन मात्र अजूनही निर्दयी आणि निर्विवाद सत्तेचे सर्व प्रयत्न करताना दिसतात. 

वर्तमानाचा आढावा घेता रशियात आज ’सबकुछ’ पुतीन अशी परिस्थिती आहे. नवाल्नी प्रकरणात त्यांनी हे सिद्ध केलेच आहे. नवाल्नी यांना त्यांच्या समर्थकांच्या उद्रेकाच्या भीतीपोटी पुतीन राजवटीने कधी तुरुंगात डांबले नव्हते. मात्र, या सगळ्याचा अंदाज जोखत आणि त्याकडे दुर्लक्ष करीत आता नवाल्नींना कोठडीत ठेवले आहे. संकुचित राष्ट्रवादाचा आधार घेत आपल्या एकाधिकारशाहीला अधिमान्यता मिळविण्याची खटपट पुतीन करीत असतात. ही बाब रशियाच्याच नव्हे तर जगाच्या दृष्टीने गंभीर आहे.  येत्या काही दिवसांत पाश्‍चात्य राष्ट्रे पुतीन यांच्या एकाधिकारशाहीची धार बोथट करतील अशी खात्री नाही. कारण गेल्या दोन दशकांत पुतीन त्यांनी स्वतःस भक्कमपणे प्रस्थापित केले .

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nikhil Shravage Writes About vladimir putin