भाष्य : आखाती स्पर्धेचा असाही रेटा

संयुक्त अरब अमिरातीचे युवराज मोहम्मद बिन झाएद यांनी पश्चिम आशियातील प्रस्थापित परराष्ट्रीय धोरणाला छेद देत इराण, इस्राईल या एकेकाळच्या शत्रू राष्ट्रांसोबत संवाद सुरू केला आहे.
mohammed bin salman and mohammed bin zayed
mohammed bin salman and mohammed bin zayedSakal

राजकारण हितसंबंधांच्या दृष्टिकोनातून चालते हे ध्यानी ठेवत सौदीचे युवराज बिन सलमान आखाती देशांच्या वार्षिक परिषदेआधी आपल्या पश्चिम आशियातील नेतृत्वाला झळाळी देण्याच्या प्रयत्नात आहेत. संयुक्त अरब आमिरातीशी त्यांची सुप्त स्पर्धा आहे. त्यातून काही वेगळे धोरणात्मक बदलही दिसताहेत.

संयुक्त अरब अमिरातीचे युवराज मोहम्मद बिन झाएद यांनी पश्चिम आशियातील प्रस्थापित परराष्ट्रीय धोरणाला छेद देत इराण, इस्राईल या एकेकाळच्या शत्रू राष्ट्रांसोबत संवाद सुरू केला आहे. त्यांनी इतर देशांशी चर्चेत आघाडी घेतल्यामुळे त्या प्रदेशातील सुन्नी देशांचे अलिखित नेतृत्व करत असलेल्या सौदी अरेबियाच्या पोटात गोळा आला आहे. सौदीचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांनीदेखील लगोलग कतार, बहारीन, कुवेत, ओमान या धर्मबांधवांची भेट घेत आपला खुंटा बळकट करायचे प्रयत्न सुरू केले आहेत. कायम वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या या जगातील सर्वांत अस्थिर आणि चंचल प्रदेशातील या दोन युवराजांमधील सुप्त स्पर्धा समजून घेणे त्यामुळेच आवश्यक आहे.

गेल्या चार-पाच वर्षांत पश्चिम आशियातील बऱ्याच विषयांत एकवाक्यता राखलेले बिन झाएद आणि बिन सलमान हे दोन नेते आहेत.

सौदीच्या दक्षिणेस असलेल्या येमेनमध्ये इराणपुरस्कृत फौजांविरोधात उघडलेली संयुक्त लष्करी आघाडी असेल अथवा इराणशी जवळीक साधली म्हणून कतार या लहानशा देशाचा केलेला कोंडमारा; या दोघांनी आपली वाट सुकर करण्यासाठी आजवर एकोपा दाखवला. मात्र, सौदी बंडखोर पत्रकार जमाल खाशोगी यांच्या हत्येनंतर राजकीय अडचणीत सापडलेल्या बिन सलमान यांचा हात सोडत बिन झाएद यांनी वेगळी वाट चोखाळली आहे. त्यांनी आपण बिन सलमान यांच्यापेक्षा चार ‘उन्हाळे’ जास्त पाहिल्याचे दाखवून दिले आहे. गेल्या वर्षभरात येमेन युद्धातून माघार, हाडवैरी असणाऱ्या इस्राईल आणि इराणशी चर्चेला सुरुवात करून त्यांनी आपल्या परराष्ट्रीय धोरणाची कात टाकायला सुरुवात केली आहे. त्यांच्याकडे तेलाचे साठे, बक्कळ पैशांसोबतच मुक्त अर्थव्यवस्था आणि धार्मिक कट्टरवादाला बगल देत जोपासलेले आधुनिकीकरण आहे. पैसे आणि तेलसाठे तोडीसतोड असणाऱ्या सौदीत मात्र राजेशाही, सनातन विचारसरणी आणि धर्मांधता विकासाच्या आडवी येते. याचा काय तो बोध घेत बिन सलमान यांनी युवराजपद पदरात पाडून घेतल्यापासून सौदीवरची रूढीप्रिय पकड ढिली करायला सुरुवात केली आहे. महिलांना गाडी चालवायची मुभा, त्यांचा प्रशासनात समावेश, जाहीर संगीत कार्यक्रमांना मुभा असे बदल आज तेथे होत आहेत. तेलावरची मदार कमी करत पर्यायी रोजगाराचे लक्ष्य २०३०पर्यंत गाठायचे त्यांनी ठरवले आहे. जमाल खाशोगी यांच्या हत्येचा विषय पुढे करत अमेरिकी अध्यक्ष ज्यो बायडेन हे बिन सलमान यांच्याशी फटकून वागतात.

ट्रम्प यांच्या कार्यकाळात दिसलेला अमेरिकी सौदी दोस्ताना आता नाही. याचा वचपा काढायचा म्हणून ‘आवळलेले तेलाचे नळ उघडून दर कमी करा’ या अमेरिकेच्या दबावाकडे बिन सलमान साफ दुर्लक्ष करीत आहेत. ट्रम्प सरकारमध्ये वॉशिंग्टनची मिळालेली जवळीक आणि राजमान्यता बिन सलमान यांना आता बायडेन देत नाहीत. तेलाच्या नळाचा ताबा आपल्या हाती ठेवत उलट बिन सलमान बायडेन यांच्यावर दबाव ठेवत आहेत. घरच्या आघाडीवर लोकप्रियतेचे आणि समन्वयाचे बारा वाजले असताना बायडेन प्रशासनाने पश्चिम आशियातील जाळे आवरते घेतले आहे. बायडेन आणि कमला हॅरिस यांच्या लोकप्रियतेच्या फुग्यातील हवा हळुहळू कमी होत चाललेली दिसते. हे हेरून बिन सलमान यांनी गेले काही महिने रशियासोबतचा घरोबा वाढवत तेलोत्पादनापुरती तरी पुतीन यांच्याशी युती केली आहे. त्यांची जवळीक बायडेन यांच्या अडचण वाढवणार असली त्यास बायडेनदेखील तितकेच जबाबदार आहेत. तेलाच्या बाबतीत स्वयंपूर्णता गाठायचा अमेरिकेचा उद्देश बाजूला सारून बायडेन यांनी तेलोत्खननावर बंदी घातली आहे. अमेरिकी जनतेला छळणारी महागाई आटोक्यात येत नाही आणि सौदी ऐकत नाही अशा कात्रीत सापडलेले बायडेन तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाताना दिसतात.

‘तबलिगी जमात’वर बंदी

सौदी आणि संयुक्त अरब अमिरातीमधील स्पर्धेत बायडेन यांना वळसा घालून आपले द्विपक्षीय हित साधत, जमल्यास पश्‍चिम आशियाचे एकत्रित नेतृत्व करायची छुपी योजना असल्याचा वासही काही राजकीय जाणकारांना येत आहे. पण, अमिराती आणि इस्राईल यांची वाढणारी जवळीक साधायची मोकळीक सौदीकडे नाही हे ताडून बिन सलमान यांनी धर्माला धक्का न लावता, कट्टरता छाटणे सुरु केले आहे. जगभर वादग्रस्त ठरलेल्या ‘तबलिगी जमात’ वर सौदी अरेबियाने बंदी घातली असून ही दहशतवादी संघटना असल्याचे जाहीर केले आहे. इस्लामचा उगम आणि दोन मुख्य श्रद्धास्थाने असलेल्या सौदीनेच असे पाऊल उचलल्यामुळे इतर देश सौदीची री ओढतील अशी दाट शक्यता आहे. मात्र, या संघटनेचा सुमारे १५० देशांमध्ये पसरलेला आवाका लक्षात घेता, तिच्या कोट्यवधी सदस्यांना सरसकट दहशतवादी ठरवले जाणे नवा वाद निर्माण करेल असे दिसते. त्यामुळेच, सौदी -इस्राईल या हाडवैऱ्यांच्या पडद्यामागे होणाऱ्या चर्चेला जाहीर मूर्त स्वरूप यायला थोडा वेळ लागेल.

आखाती देश आणि सीरिया, सौदी-इराण, संयुक्त अरब अमिराती-तुर्कस्तान, सौदी-कतार असा स्वप्नवत संवाद पश्चिम आशियात सध्या पाहायला मिळतो आहे. तुर्की अर्थव्यवस्थेने मान टाकली असताना तुर्कस्तानमध्ये संयुक्त अरब अमिराती गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहे. धर्म पोट भरत नाही हे लक्षात आल्यामुळे तुर्कस्तानचे अध्यक्ष एर्दोगन यांनी अरब विरोधी गट आणि मुस्लिम ब्रदरहूड समर्थकांना दाबायला सुरुवात केली आहे. ही सगळी बदलाची नांदी म्हणावी लागेल. जगात इतरत्र लोकशाही चालवायचा ठेका आपणच घेतल्याचे ठसवत एकापाठोपाठ एक देश मातीस मिळवायचे असा अमेरिकेचा आणि पाश्चात्य देशांचा खाक्या राहिला आहे. इराक, सीरिया, लेबेनॉन, लिबिया, अफगाणिस्तानमध्ये लोकशाही स्थापन करायच्या नावाखाली जो उच्छाद मांडला गेला त्यापेक्षा ‘राजेशाही बरी बाबा’ असे सामान्य प्रजेला वाटायला भाग पडेल इतकी ऊर्जा पश्चिम आशियातील या बदलत्या समीकरणांमुळे तयार होऊ पाहते आहे. तेलाच्या वधारलेल्या दरामुळे तयार होणारा जागतिक दबदबा प्रादेशिक मुत्सद्देगिरीत चैतन्य भरताना दिसत आहे.

कोरोना संसर्गाचा फटका बसल्यानंतर आता पुन्हा गबर होणारे देश धार्मिकता आणि कट्टरता यांच्यातील भेद ओळखत धर्मांधतेची जाड पुटं बाजूस सारू लागले आहेत, ही स्वागतार्ह बाब. राजकारण हे मैत्री, शत्रुत्वापेक्षा फायद्याच्या जिवावर जास्त चालते, हे ध्यानी ठेवत बिन सलमान सौदीत होणाऱ्या आखाती देशांच्या वार्षिक बैठकीआधी आपल्या पश्चिम आशियातील नेतृत्वाला मुलामा देत आहेत. राज्यारोहणाची फक्त औपचारिकता बाकी ठेवलेले बिन सलमान दाखवत असलेली ही बदलाची चाहूल त्यांनी व्याप्ती वाढवल्यास त्यांना येणाऱ्या अनेक दशकांसाठी निर्वेधपणे सौदी राजगादीची ऊब देईल. त्यांनी राजकारणातील फायदा साधाताना विकासही महत्त्वाचा आहे, असे जाणल्याची चिन्हे दिसत आहेत. बिन झाएद यांच्या सोबत सुरू आलेल्या मैत्रीपूर्ण स्पर्धेमुळे का होईना बिन सलमान यांची बदललेली कार्यपद्धत येत्या काळात म्हणूनच निर्णायक ठरेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com