सौदी अरेबियाचा ‘येमेन राग’

nikhil shrawge
nikhil shrawge

इराण व सौदी अरेबिया हे देश आपल्या पारंपरिक संघर्षाचा ताजा प्रयोग आता येमेनमध्ये रंगवत आहेत. सौदी अरेबियाने हा संघर्ष प्रतिष्ठेचा केल्याने येमेनी जनतेला असंख्य हालअपेष्टांना तोंड द्यावे लागत आहे. सौदी अरेबियाची पाठराखण करणारी अमेरिकाही या सगळ्याला तितकीच जबाबदार आहे.

सौ दी अरेबियाच्या पुढाकाराने सुरू असलेल्या येमेनमधील लढाईची रसद थांबविण्याचा ठराव अमेरिकी काँग्रेसच्या दोन्ही सभागृहांत मंजूर झाला. अमेरिकी संसदेकडून तो अमेरिकी अध्यक्षांच्या मंजुरीसाठी गेला असताना गेल्या आठवड्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षीय अधिकार वापरून हा ठराव फेटाळून लावला. युद्धनीतीची तमा न बाळगता सौदी अरेबियाकडून बेदरकारपणे सुरू असलेल्या या लढाईला वेसण घालण्याची संधी ट्रम्प यांनी हा ठराव फेटाळत नाकारली. त्यांच्या या निर्णयाचे काय पडसाद उमटतील, हे पाहणे गरजेचे आहे.

भूगोलाचा विचार करता येमेन हा सौदीच्या पायाशी असलेला देश. येमेनचे अंतर्गत राजकारण आपल्या वळचणीला ठेवून येमेनच्या जवळून होणारी आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलवाहतूक ताब्यात ठेवायची, हा सौदीचा गेल्या कित्येक वर्षांचा डाव. २०११ पासून बेरोजगारी, गरिबी आणि बोकाळलेल्या भ्रष्टाचाराविरोधात येमेनमध्ये निदर्शने सुरू होती. त्या आंदोलनाला हिंसक वळण लागून आता सुमारे चार वर्षे लोटली आहेत. इराणपुरस्कृत ‘हौती’ गट आणि सौदीपुरस्कृत कुडमुडे सरकार यांच्यात थेट चकमकी सुरू आहेत. पश्‍चिम आशियात इराण आणि सौदी अरेबिया यांचे वैर नवनवी युद्धक्षेत्रे शोधत असताना हे उभय देश आपल्या पारंपरिक संघर्षाचा ताजा प्रयोग आता येमेनमध्ये रंगवत आहेत. बंडखोर ‘हौती’ गटाला इराण अर्थसाह्य आणि ‘हेजबोल्लाह’ युद्धतंत्र पुरवत आहे. दुसऱ्या बाजूला सौदीने बहारीन, संयुक्त अरब अमिराती अशा समस्त अरब देशांची मोट बांधत येमेनमध्ये इराणला चेपण्याचे प्रयत्न चालविले आहेत. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्सकडून सौदीला तांत्रिक मदत आणि अत्याधुनिक शस्त्रांचा पुरवठा होत आहे. इतके असूनसुद्धा रणनीतीच्या द्वंदात निर्भेळ यश मिळत नसल्याचा राग धरून सौदीचे युवराज मोहंमद बिन सलमान यांनी संपूर्ण येमेनवरून वरवंटा फिरवायचा चंग बांधल्याचे दिसत आहे. हा संघर्ष अत्यंत प्रतिष्ठेचा करीत बिन सलमान यांनी सुमारे एक कोटी येमेनी जनतेची उपासमार केली आहे. गेल्या चार वर्षांत तेथे लाखोंची कत्तल झाली आहे. तसेच, सांप्रत काळातील सर्वांत मोठ्या प्रमाणात कॉलऱ्याचा उद्रेक येमेनमध्ये झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने नमूद केले आहे. अमेरिकेच्या मदतीशिवाय बिन सलमान इतका मोठा घास घेऊच शकणार नाहीत. सौदीचा हा ‘येमेन राग’ ट्रम्प यांच्या सुरावटीवर चालला आहे. चोहोबाजूने टीका होत असताना नैतिकता दाखवत, येमेन युद्धात वापरली जाणारी सौदीची ही रसद तोडण्याची नामी संधी ट्रम्प यांनी नकाराधिकार वापरून घालवली. बंडखोर पत्रकार जमाल खशोगी यांच्या रक्ताने बिन सलमान यांचे हात माखले आहेत. या हत्येसाठी अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणा बिन सलमान यांना दोषी ठरवत असताना ट्रम्प यांनी बिन सलमान यांची पाठराखण केली आहे. इराणच्या अणुकराराला दाखविलेली केराची टोपली, पॅलेस्टिनी शिष्टमंडळाचे वॉशिंग्टनमधील कार्यालय बंद पाडणे, इस्राईलमधील अमेरिकेचा दूतावास वादग्रस्त जेरुसलेम शहरात हलविणे, गोलन टापू प्रदेशाला इस्राईलचा अविभाज्य भाग म्हणून घोषित करणे, इराणच्या लष्करी गटाला जागतिक दहशतवादी गट ठरविणे, असे निर्णय ट्रम्प यांनी घेतले आहेत. हे सर्व निर्णय सौदी, इस्राईल आणि इराणविरोधी गटाची भलावण करतात. इराणला ठेचण्याच्या दृष्टीने एक अभद्र युती ट्रम्प यांनी जन्माला घातली आहे. ती टिकविण्यासाठी त्यांना बेंजामीन नेतान्याहू आणि बिन सलमान यांसारखे शिलेदार त्यांच्या त्यांच्या देशात सत्तेवर हवे आहेत. म्हणून हा सगळा प्रपंच. नेतान्याहू अडचणीत असताना राष्ट्रवादाचे मुद्दे पुरवत ट्रम्प यांनी नेतान्याहू परत निवडून येतील, याची ‘काळजी’ घेतली. तसेच, नेतान्याहू २०२२ मध्ये याची परतफेड करीत आपल्याला निवडून आणण्यात मदत करतील, अशी अपेक्षा ठेवत त्यांनी आपली सोय पाहिली आहे.
येमेनचा ‘सीरिया’ होत असताना निर्वासितांचे तांडे युरोपमध्ये जाऊन तेथील त्रास वाढवत आहेत. संपूर्ण प्रदेश गेली दोन दशके युद्धप्रवण असल्याने त्याचे परिणाम गंभीर होत आहेत. येमेनसारखा देश हा पश्‍चिम आशियातील सर्वांत गरीब देश समजला जातो. पार ‘अल्‌ कायदा’च्या सुरवातीच्या काळापासून येमेनमधील बेरोजगारी व अशिक्षित तरुण, यामुळे ‘जिहाद’ची फौज उभी राहिल्याचे इतिहास सांगतो. १९९३ मध्ये सोमालियात केलेली अमेरिकी सैनिकांची हत्या, ऑक्‍टोबर २००० मध्ये ‘यूएसएस कोल’ या अमेरिकी जहाजावरील हल्ला, २००२ मधील केनियातील ज्यूंच्या मालमत्तेवरील हल्ला, २००३ मधील सौदीतील हल्ले, अशा सर्व घटनांचे कट येमेनमध्ये शिजले. त्यामुळे आपण सारासार विचार न करता फक्त राजकीय आणि वैयक्तिक स्वार्थ बघून विरोधी गटाच्या असंतोषाला बळ देत आहोत, याचे भान ट्रम्प, नेतान्याहू आणि बिन सलमान यांना आहे, असे वाटत नाही. ही खेळी अंगलट येणार नाही, याची अजिबात शाश्वती नाही. उलटपक्षी ती येईलच, अशी शक्‍यता जास्त आहे. सर्व बाजूने गळचेपी होत असताना इराण कट्टरवादाची कास धरणार, हे उघड आहे. नेतान्याहू, बिन सलमान यांसारखे कडवे राष्ट्रवादी नेते ट्रम्प यांच्या समर्थनाच्या बळावर स्वतःचा मूळ रंग आपापल्या देशात दाखवत आहेत. पॅलेस्टिनींची जमीन हडपण्याच्या नेतान्याहू यांच्या वृत्तीत वाढ होणार, हे आता उघड आहे. जमाल खशोगी हत्येनंतर जागतिक पातळीवर उसळलेला आगडोंब पचवत बिन सलमान आपल्या टीकाकारांना शांत करीत आहेत. येत्या काळात हे सर्व जण एकत्र येऊन पश्‍चिम आशियात नव्याने थैमान घालतील, असे स्पष्टपणे दिसते.

एका बाजूने युद्धाचा आगडोंब संपवायची भाषा करायची आणि हुकूमशाही करू पाहणाऱ्या नेत्यांच्या शिडात मागच्या दाराने हवा भरायची, असा दुटप्पी उद्योग ट्रम्प करतात. मोहंमद बिन सलमान, मोहंमद बिन झाएद, व्लादिमीर पुतीन, किम जोंग उन, जाईर बोलसोनारो, बेंजामिन नेतान्याहू, अब्देल फतेह एल-सीसी अशी ‘मी म्हणेल ते’ म्हणणाऱ्या नेत्यांची रांग लागली आहे. या वादग्रस्त नेत्यांच्या मूळ प्रवृत्तीला ट्रम्प उघडपणे बळ देताना दिसतात. त्यांच्या या जाहीर पाठिंब्यामुळे या नेत्यांची आपापल्या देशाबाहेरील महत्त्वाकांक्षा तर वाढीस लागत आहेच; त्याचबरोबर देशांतर्गत विरोधकांना चेपण्याचे त्यांचे धाडसही वाढत चालले आहे. अशावेळी जगभर मानवी हक्कांच्या नावाने गळा काढणारी अमेरिका स्वार्थ असेल तिथे या मुद्द्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते, हे पुन्हा एकदा दिसून येत आहे. राजकीय आणि वैयक्तिक स्वार्थासाठी ट्रम्प हे बिन सलमान आणि त्यांच्या पठडीतल्या नेत्यांशी हातमिळवणी करीत आहेत. त्यामुळेच या नेत्यांच्या वामकृत्यांबद्दल ट्रम्प यांनाही तितकेच जबाबदार धरण्याचे कार्य इतिहासाला करावे लागेल. सांप्रत काळाचा विचार करता बिन सलमान आणि सर्व तत्सम पुढाऱ्यांचा पापाचा अंश तर ट्रम्प यांच्यापर्यंत पोचतोच आहे. मात्र, उद्याचा विचार करता या पापापेक्षा त्यांच्या कृत्यांचा त्रास जगाला जास्त होणार आहे. ट्रम्प यांच्या नकाराधिकारामुळे अशाच अवघड उद्याची चाहूल लागली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com