World Sparrow Day : या चिमण्यांनो, परत फिरा रे...  

निकिता पाटील  
शुक्रवार, 20 मार्च 2020

चिमणीचं अस्तित्व संपून केवळ संग्रहालयात तिची प्रतिकृती पाहण्याची वेळ भावी पिढ्यांवर येऊ नये, यासाठी तिच्या संवर्धनाकडं वेळीच लक्ष दिलं पाहिजे. आजच्या जागतिक चिमणी दिवसानिमित्त...

पूर्वी आई बाळाला घास भरवायची, तेव्हा तिचा एक हात खरीखुरी चिमणी दाखवत असायचा. आता मोबाईलमधल्या ‘टिकटॉक’मध्ये बंदिस्त झालेल्या चिवचिवाटाला ती सर येणार कुठून? पण असो. लहान मुलंही सरसावली आहेत. आता निसर्गाच्या कृत्रिम आस्वादाला. ‘जागतिक चिमणी दिवसा’च्या निमित्तानं अचानक लक्षात आलं, की अजूनही चिऊताई दिवसरात्र असतेच की आपल्यासोबत! सकाळी अलार्म बऱ्याचदा चिवचिवाटाचा असतो. डोअरबेलचा आवाजही बऱ्याचदा तसाच. घरात लव्हबर्डस असतातच जोडीला. चिमणीची सर येत नसली त्यांना, तरी समाधान मानावं लागतं. वर छताला घरटे टांगलेले असते टोटली हॅंडमेड. त्यात शोभेची चिमणी, चिमणा आणि त्यांची एक - दोन अंडी... चिऊताईचा हा भास-आभास तिच्या आवाजात, तिच्या हॅंडमेड घरट्यात बंदिस्त करून टाकलाय आम्ही.

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

२०१० मध्ये ‘जागतिक चिमणी दिवसा’ची सुरुवात करण्यात ज्यांचा मोठा हातभार आहे, ते ‘नेचर फॉरेस्ट सोसायटी फॉर इंडिया’चे मोहंमद दिलावर म्हणतात, ‘‘पक्ष्यांशी असलेलं भावनिक नातं हरवत चाललं आहे, हेच पक्ष्यांची संख्या कमी होण्याचं सर्वांत महत्त्वाचं कारण आहे.’’ मुळात भावना आहेत आणि भावनिक नातंसुद्धा अजूनही आहे. पण भावनांमधली संवेदना हरवली आहे हे निश्‍चित. दुसरं महत्त्वाचं म्हणजे भावनांना स्वार्थीपणाची किनारही लागली आहे. कारण कबुतरांना दाणे टाकले, तर घरातली संपत्ती वृद्धिंगत होते असा समज आहे. त्यासाठी कबुतरखाने उभारलेत कित्येकांनी आणि कबुतरांच्या वाढत्या संख्येने श्‍वसनाचे आणि त्वचेचे विकार होतात तरी चालतं आम्हाला. चिऊताई तर किती निरुपद्रवी. पण मनोरंजनाव्यतिरिक्त भौतिक फायदा नाही तिचा, म्हणून आमच्या जीवनातून हळूहळू हद्दपार होत गेलेली चिऊताई नकळत अदृश्‍य कधी होत गेली कळलंच नाही.

उंच इमारती उभ्या राहिल्या, झाडांची कत्तल झाली, तसं चिऊताईचं घरटं दिसेनासं झालं. विजेच्या तारांचं जाळं उभं राहिलं तसं चिऊताईच्या चिवचिवाटाची कंपनं ऐकू येईनाशी झाली. पिकांसाठी भरमसाट रसायनांची फवारणी होते आणि मग माणसांबरोबरच निरागस पक्ष्यांचाही बळी जातो. माणसांच्या घरांची दाटीवाटी झाली नि घराच्या जागेचा एरियाच जिथे कमी होत गेला तिथे चिऊताईच्या घरट्यासाठी जागा कुठे आणि कशी मिळणार? अचानक आलेल्या महापुरानं जिथं माणसांचीही भरभक्कम घर राहिली नाहीत, तिथं चिऊताईचं मेणाचं घर तरी कसं वाचणार? पूर्वी प्रवास करताना पळणारी झाडं दिसायची. पळणारे मोबाइल टॉवर दिसतात आता जिकडेतिकडे आणि मग आठवतं भुर्रकन उडून गेलेली चिमणी. ती इतकी दूर निघून गेली ते थेट ब्रिटनमधल्या एका संघटनेनं तिचा ‘लाल यादी’त समावेश केला. वाचून वाईट वाटलं व चांगलंही. चांगलं यासाठी की चिऊताई आज कुठं दिसत नाही हे जाणवण्याइतपत संवेदनशीलता अजून तरी आहे शिल्लक. 

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीनं २००५ ते २०१० च्या दरम्यान एक सर्वेक्षण केलं होतं. त्यांच्या निरीक्षणानुसार काही क्षेत्रातून चिऊताई कायमची उडून गेली आहे. शहरी भागांत तर चिऊताईची ६५ टक्के घरटी नामशेष झाली आहेत. २०१० नंतरच्या काळात तर एखादा दिवस साजरा करण्यापलीकडे तिच्या संवर्धनासाठी फारशी पावलं उचलली गेल्याचं ऐकिवात नाही. तिचं नामशेष होत जाणं जैवविविधतेसाठी किती घातक, पर्यावरणासाठी किती मारक आहे हा अभ्यासाचा विषय. पण केवळ संग्रहालयात तिची प्रतिकृती पाहण्याची वेळ भावी पिढ्यांवर येऊ नये एवढीच अपेक्षा. अन्यथा, ‘कोणे एके काळी एक चिमणी नावाचा पक्षी होता’ एवढेच शब्द कालौघात रुळत जाईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nikita patil article World Sparrow Day

टॅग्स