‘वा परुळेकर वा!’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nanasaheb Parulekar

डॉ. नानासाहेब परुळेकर यांची पत्रकारितेवरील निष्ठा कशा प्रकारची होती. याची डी. डी. रेगे यांनी सांगितलेली आठवण त्यांच्याच शब्दांत देत आहे.

‘वा परुळेकर वा!’

- नीलांबर साठे

जुन्या पिढीतील पोर्ट्रेट आर्स्टिस्ट (कै.) डी. डी. रेगे यांनी सांगितलेली ही नानासाहेब परुळेकर आणि आचार्य अत्रे यांच्याविषयीची आठवण.

डॉ. नानासाहेब परुळेकर यांची पत्रकारितेवरील निष्ठा कशा प्रकारची होती. याची डी. डी. रेगे यांनी सांगितलेली आठवण त्यांच्याच शब्दांत देत आहे.

‘त्या काळात डॉ. परुळेकर विविध क्षेत्रात कुठे काय नवीन चालू आहे, त्याची माहिती घेऊन बातमी मिळवत. मी चित्रकार. माझ्याकडे कोणती पोर्ट्रेट्‌स करायला आली आहेत, माझे कशावर काम चालू आहे याची ते माहिती घेऊन नवीन चित्र तयार झाले असेल तर त्याचा फोटो आणि माहिती त्यासोबत देत असत. मला ‘सकाळ’मध्ये बोलावत असत. आमची पुष्कळ चर्चा चालत असे. दर महिना माझी हजेरी त्यांना अपेक्षित असे.

मधल्या काळात मी असेच दोन महिने ‘सकाळ’मध्ये गेलो नव्हतो. एक दिवस दारूवाला पुलावरून मी आमच्या फ्रेममेकरकडे निघालो होतो. तेवढ्यात माझ्या मागून डॉ. परुळेकरांची गाडी. मी जरा कावराबावरा झालो. ‘सकाळ’मध्ये दोन महिन्यात गेलो नाही म्हणून नानासाहेब विचारणार, असे मनात आले. तसेच झाले. ते म्हणाले, "अहो रेगे दोन महिने झाले तुम्ही आला नाहीत. आजारी वगैरे होतात का?'' त्यावर मी म्हटले, मी बरा आहे, माझ्याकडे पुणे नगर वाचन मंदिरासाठी आचार्य अत्र्यांच्या पोर्ट्रेटचं काम सुरू होतं. पण तुमचे त्यांचे संबंध लक्षात घेऊन मी आलो नाही इतकेच! त्यावर ते म्हणाले, "त्याचा इथे काय संबंध, नवं पोर्ट्रेट ही बातमी आहे. पेंटिंग पूर्ण झालंय का?'' मी म्हणालो, काल रात्रीच पूर्ण झालंय. उद्या त्याचं अत्रेसाहेबांच्या हस्तेच अनावरण शिवाजी मंदिरमध्ये व्हायचंय. मी आमच्या फ्रेममेकरला निरोप द्यायलाच आत्ता निघालो होतो.'

त्यावर ते म्हणाले, "मी आज दुपारी चार वाजता येतो. मला ते पाहायचं आहे.'' झालं दुपारी ४ वाजता आमच्या नागेश्‍वर मंदिराच्या दाराशी नानासाहेबांची गाडी. नानासाहेब आले. पेंटिंग पाहिले. "केवढे उंच गृहस्थ आहेत.'' असेही उद्‌गार काढले. पेंटींग छान झाल्याचेही सांगितले. मग म्हणाले, "याचा एक फोटो मला द्या, उद्या अनावरण आहे म्हणालात ते सगळे लिहून द्या. मी त्यांना फोटो आणि माहिती दिली. तेवढ्यात आमचा फ्रेममेकर आला आणि ते पेंटिंग घेऊन गेला. पाठोपाठ नानासाहेबही बाहेर पडले. दुसऱ्या दिवशी सकाळी ६-६।।च्या दरम्यान, "अरे रेगे, रेगे आहेस का घरात? अशा मोठमोठ्या हाका कोणीतरी मारत आहे, असे वाटून मी मंदिराच्या मुख्य दरवाज्याशी गेलो. बाहेर पहातो तो समोर अत्रेसाहेब. मला म्हणाले, ‘अरे तुझ्या या परुळेकरांनी मला ठार मारलं रे ठार मारलं.'' मला क्षणभर काही कळेना, काय झालं ते. तोवर त्यांनी ‘सकाळ’चा अंक माझ्यापुढे केला. त्यात अत्रे साहेबांच्या पेंटिंगचा फोटो आणि बातमी. मी परुळेकरांकडून असं अपेक्षित केलं नव्हतं रे! संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला त्यांनी द्वैभाषिकचा आग्रह धरला म्हणून मी त्यांच्यावर तुटून पडलो होतो. भरपूर निंदानालस्ती केली होती. पण ते काही मनात न ठेवता त्यांनी ही बातमी दिली. त्यावर मी अत्रेसाहेबांना आदल्या दिवशीची हकीगत सारी सांगितली. त्यावर ते म्हणाले, ‘वा परुळेकर वा!’

रेगे यांची ही आठवण नानासाहेबांची पत्रकारितेवरची निष्ठा किती अढळ होती, याचे दर्शन घडविते.

Web Title: Nilambar Sathe Writes About Nanasaheb Parulekar Birth Anniversary

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..