आता मराठीचे 'गणित' सोडवू!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जुलै 2019

"बालभारती'च्या दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी संख्यावाचनाची नवी पद्धत "बालभारती'ने आणल्यावरून मोठा वाद उसळला. तो तेवढ्यापुरता न राहता मराठी भाषेची महाराष्ट्रातच उपेक्षा होत असल्याचा मुद्दाच प्रकर्षाने समोर आला.

"बालभारती'च्या दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी संख्यावाचनाची नवी पद्धत "बालभारती'ने आणल्यावरून मोठा वाद उसळला. तो तेवढ्यापुरता न राहता मराठी भाषेची महाराष्ट्रातच उपेक्षा होत असल्याचा मुद्दाच प्रकर्षाने समोर आला. मूळ विषयाबरोबरच "मराठी'चे हे दुखणे मांडणारी, त्यावर उपाय सुचविणारी पत्रे अभ्यासक, भाषाप्रेमी व सर्वसामान्य वाचकांनीही "सकाळ'कडे मोठ्या प्रमाणावर पाठवली. त्यातील काही निवडक येथे प्रसिद्ध करीत आहोत. 

मराठीचा आग्रह धरण्यात चूक काय? 
नीलेश गायकवाड 
मुलांना अवघड जाते म्हणून भाषेचे वळण बदलण्याचा निर्णय योग्य ठरतो का, हा प्रश्‍न आहे. मुद्दा केवळ भाषाभिमानाचा नसून व्यावहारिकसुद्धा आहे. 

"पंचवीस' न म्हणता "वीस पाच' म्हणायचे, हा "बालभारती'चा संख्यावाचनासंबंधीचा निर्णय थेट पाठ्यपुस्तकात उतरल्याने धक्का बसणे स्वाभाविक होते. बदलाची कारणे पुरेशी आहेत का? अंकवाचनाच्या रूढ पद्धतीत जोडाक्षरे जास्त आहेत, असा "फीडबॅक' अनेक दिवसांपासून म्हणजे नेमक्‍या किती दिवसांपासून येत आहे, हे स्पष्ट व्हायला हवे. इंग्रजीत त्रेपन्न लिहिताना पन्नास आधी आणि तीन नंतर येतात. मराठीत मात्र तीन आधी आणि पन्नास नंतर येतात. त्यामुळे मुले 53 हा आकडा 35 असा लिहितात, असेही कारण सांगितले गेले. अशा मुलांचे एकूण मुलांशी असलेले प्रमाण किती? त्यावर शाब्दिक संख्यालेखनाची पद्धत बदलणे, हाच एकमेव उपाय नव्हे.

अनेक भारतीय भाषांचे आणि मराठीचे व्याकरण यात फरक आहे. त्यामुळे अन्य भाषांशी मराठीची तुलना करणे गैर आहे. "बालभारती'कडून मुलांचा गोंधळ कमी करणे, हे उद्दिष्ट असल्याचे सांगितले जाते. परंतु, मंडळाने जी संदिग्धता ठेवली आहे, त्याचे काय? पुस्तकात दोन्ही अंकलेखन पद्धती दिल्या असून, त्यापैकी सोपी वाटणारी पद्धत मुलांनीच निवडायची आहे. दुसरीच्या मुलांनी ही निवड करायची? याचाच अर्थ घेतलेला निर्णय ठामपणे घेतलेला नाही. पन्नासपैकी पंचवीस मुलांनी मूळ पद्धत स्वीकारली आणि उरलेल्या मुलांनी दुसरी पद्धत निवडली, तर काय करणार? 

मराठी भाषा अभिजात आहे, असा दावा आपण सरकारदरबारी केला आहे. एकीकडे मराठीच्या प्राचीनतेचे पुरावे जमा करून अभिजात दर्जा देण्याची मागणी करायची आणि केवळ काही जणांना इतर विषयांसाठी अवघड जाते म्हणून मराठीचे पूर्वापार चालत आलेले वळण बदलू पाहायचे, हे विसंगत नाही का? अनेक प्रांतांमध्ये विशेषतः दाक्षिणात्य राज्यांमध्ये भाषा जितक्‍या कडवेपणाने जपल्या जातात; तो बाणा मराठीभाषकांनी कधीच दाखविला नाही.

मराठी ही अनेक प्रवाहांना सामावून घेणारी भाषा आहे. गणित, विज्ञान आदी विषय महत्त्वाचे आहेत, याविषयी दुमत नाही. परंतु, भाषाही तितक्‍याच आत्मीयतेने शिकायला हवी. जरूर तर अध्यापनशैली बदलायला हवी. परंतु, अशा पर्यायांवर काम होताना दिसत नाही. एकदा भाषेला बदल स्वीकारण्याची सवय लागली, तर ते वारंवार घडत राहतील; म्हणूनच भाषेसाठी आग्रही राहायलाच हवे. 

वावदूक प्रतिक्रियांचे पेव 

गणिताच्या दुसरी इयत्तेतील मराठी माध्यमाच्या पुस्तकात "बालभारती'ने केलेल्या संख्यावाचनाच्या प्रयोगाबद्दल जी चर्चा सुरू आहे, ती पाहिल्यानंतर समाजातील बऱ्याच जणांना गणित शिक्षणाबद्दल आस्था आहे, असे चित्र निर्माण झाले. पण, ही आस्था आताच का उफाळून आली? डॉ. मंगला नारळीकरांनी स्पष्ट केलेच आहे, की पहिलीच्या पुस्तकातच एक वर्षापूर्वी या संकल्पनेची सुरवात केलेली आहे. तेव्हा या विषयाचा ऊहापोह का झाला नाही? मंगलाताईंचा मुलांना गणित शिकविण्याचा, त्यात गोडी निर्माण करण्याचा ध्यास सर्वश्रुत आहे. अशी व्यक्ती एखादी गोष्ट मनात कुठला तरी सुप्त नि दुष्ट हेतू ठेवून का करेल? एखाद्या गोष्टीवर टीका होऊ लागली, की अनेक जण त्यात हिरीरीने उतरतात. त्यातल्या किती जणांना विषय पूर्ण माहिती असतो? हाही प्रश्‍नच आहे.

चांगल्यासाठी केलेल्या एखाद्या बदलात लोकांना जर काही त्रुटी जाणवत असतील, दर त्या दूर करण्यासाठी योग्य मार्गांचा अवलंब व्हावा. तज्ज्ञांना निराश व खच्ची न करता हे प्रश्‍न हाताळताच येणार नाहीत का? यात नुकसान कुणाचे आहे? गणित शिकणाऱ्या लहान मुलांचे, "बालभारती'चे की मंगलाताईंचे? अशा वेळी समाजासाठी काम करणाऱ्या तज्ज्ञांच्या अभ्यासावर विनोद करणे, खिल्ली उडविणे, चुकीचा "कल्पनाविस्तार' करून दिशाभूल करणे, हे जबाबदार समाजघटकांनी टाळायला हवे. 
- डॉ. वसुधा केसकर, पुणे. 

संख्यासंबोध महत्त्वाचा 

1) गणित या विषयात "संबोध' स्पष्ट होणे महत्त्वाचे असते. दशकाची कल्पना एकदा स्पष्ट झाली, की वीस एक काय अन्‌ नव्वद एक काय, फरक पडत नाही. 
2) इंग्रजी किंवा दाक्षिणात्य भाषांत संख्यावाचनाची अशीच पद्धत आहे. म्हणून आपण त्याचे अंधानुकरण करावे काय? मराठी अस्मिता असायला हवीच. 
3) मुलांचा वयाप्रमाणे क्रमशः विकास अपेक्षित आहे, त्यामुळे त्याला जोडाक्षरे शिकवून प्रगल्भ करू नये काय? 
4) पुढील वर्गात 9765 ही संख्या वाचताना मुले नव्वद सात, साठ पाच अशी वाचतील. कारण, बालपणीचे शिकविलेले दृढ होत असते. "संख्यासंबोध' महत्त्वाचा आहे. 
5) या दशकात जन्माला आलेली पिढी इंटरनेटच्या युगातील आहे. ती मुळातच हुशार व आव्हान पेलण्यास समर्थ आहे. 
- सौ. सुनंदा जोशी 

...तर लाभेल आम्हास भाग्य 
माधव राजगुरू 
बहुभाषक व बहुसांस्कृतिक समाज ही वैशिष्ट्यपूर्ण ओळख अबाधित ठेवून विकास व एकात्मतेचे उद्दिष्ट लक्षात घेऊन भाषावार प्रांतरचना आणि शैक्षणिक धोरणात त्रिभाषा सूत्र स्वीकारण्यात आले. मात्र, अनेक राज्यांनी हे भाषा धोरण स्वीकारले नाही. महाराष्ट्र राज्याने हे सूत्र स्वीकारले. पण, त्याची अंमलबजावणी करताना इंग्रजी आठवीपासून शिकवायचे की पाचवीपासून, याबाबतीत राज्य सरकारने धरसोडपणा केला. इंग्रजांनी अवलंबिलेले भाषाविषयक धोरण मराठी भाषेला मारक राहिले. महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर प्रारंभी मराठीच्या दृष्टीने काही चांगले निर्णय झाले. मराठी भाषेची लिपी व वर्णमालेची निश्‍चिती, विश्‍वकोशनिर्मिती व साहित्य-संस्कृती मंडळाची स्थापना, राजभाषा अधिनियम हे निर्णय चांगले होते. पण, नंतर दुर्लक्ष झाले. स्वभाषेचे संवर्धन करणारे भाषा धोरण राज्याला राबविता आले नाही. एका बाजूने राजभाषा अधिनियम करून मराठीला राजभाषेचा दर्जा देऊ केला आणि दुसऱ्या बाजूने शिक्षणात मराठीऐवजी इंग्रजीला अव्वल स्थान देऊन तिचे महत्त्व कमी केले.

भाषा एकूण विकासाच्या मुळाशी असू शकते, ही गोष्टच सरकारने समजून घेतली नाही. जी भाषा शिक्षणाचे माध्यम बनते, त्या भाषेचा निश्‍चित विकास होतो. कारण, शिक्षणामुळे व्यवहारात होणारा त्या भाषेचा वापर, ग्रंथनिर्मिती इ. गोष्टी त्या भाषेला प्रतिष्ठा मिळवून देत असतात. प्रादेशिक भाषा टिकाव्यात, त्यांचे संवर्धन व्हावे, विकास व्हावा, या हेतूने भाषावार प्रांतरचना करण्यात आली, या मूळ उद्देशाचाही शासनाला विसर पडलेला आहे. याचे स्मरण करून देण्यासाठी राज्यातील साहित्यिक, कलावंत, शिक्षक यांना नुकतेच मुंबईत आंदोलन छेडावे लागले. त्यांच्या मागण्या अगदी साध्या आहेत. मराठी शाळा टिकवा, मराठी शिकवा, उच्च शिक्षण मराठीतून शिकण्याची व्यवस्था निर्माण करा, शासनदरबारी, न्यायालयात, व्यवहारात सर्वत्र मराठीचा वापर करा, असे झाले तर मराठीसारखी लोकभाषा ही ज्ञानभाषा म्हणून पुढे येईल, याही भाषेत रोजगार मिळवून देण्याची क्षमता निर्माण होईल. यामुळे मराठीतूनही आपण आपले करिअर घडवू शकतो, हा आत्मविश्‍वास मराठी युवकांच्या मनात येईल. 

शासनाला या गोष्टी कळतच नाहीत, असेही नाही. रशिया, चीन, जपान, जर्मनी या देशांनी इंग्रजीचा आधार न घेता प्रगतीची सर्वोच्च शिखरे गाठली, तसे आपण का करू शकत नाही? अशी इच्छाशक्ती राज्यकर्त्यांच्या मनात निर्माण होऊन ते कामाला लागतील तो दिवस मराठीच्या भाग्याचा ठरेल. 
माधव राजगुरू 

काखेत कळसा आणि गावाला वळसा 
दुसरीतल्या विद्यार्थ्यांना जर "सव्वा, कित्ता, गठ्ठा, हत्ती, मस्ती, एक्का, अन्न, गोष्ट, ब्याद, पत्र्यावर, कैऱ्या, अण्णा' या शब्दांमधली जोडाक्षरे लिहिता-वाचता येत असतील; तर संख्यानामांमध्ये येणारी हीच जोडाक्षरे वाचायला कोणतीच अडचण येण्याचे काहीच कारण नाही. तरीही अडचण येत असेल, तर मग पहिल्या इयत्तेत जोडाक्षर ही संकल्पना तिच्या सर्व अंगांनी नीट शिकवली जात नाही, हे त्या समस्येचे मूळ कारण आहे.

पहिलीच्या पुस्तकातून शिकविले जाणारे जोडाक्षरलेखन पाहिल्यावर हे लक्षात येईलच. शिवाय, 6 नोव्हेंबर 2009 रोजी शासनाच्या भाषा विभागाने काढलेल्या वर्णमाला आदेशात जोडाक्षरांबाबत नमूद केलेल्या गोष्टी पुस्तकात आज नऊ वर्षांनंतरही पाळलेल्या नाहीत, हेही लक्षात येईल. 
संख्यानामांचा उच्चारक्रम आणि त्या संख्यांचा अंकलेखनक्रम यांमध्ये विसंगती आहे, हे मान्य. पण, पहिल्या इयत्तेत 1 ते 100 अंक लिहायला शिकविताना "दोनावर एक एकवीस, तिनावर दोन बत्तीस, चारावर तीन त्रेचाळीस, पाचावर चार चौपन्न, सहावर पाच पासष्ट, सातावर सहा शाहत्तर, आठावर सात सत्त्याऐंशी, नवावर आठ अठ्ठ्याण्णव' अशारीतीने अंकलेखनक्रम आणि पाठोपाठ संख्यानाम हे दोन्ही जोडीने म्हणताम्हणता ती संख्या लिहायची असे शिकवले, तर यांतल्या विसंगतीचा एकमेकांशी सुसंगत संबंध कसा आहे, हे सहज समजते आणि अशारीतीने रोज याप्रमाणे पहिलीच्या वर्गात काही महिने हे पठण-लेखन एकत्रितरीत्या झाल्यानंतर संख्यालेखनाची समस्या राहणारच नाही. हे सोपे आणि पारंपरिक सिद्धमार्ग सोडून जे काही उपाय चालले आहेत, ते म्हणजे "काखेत कळसा आणि गावाला वळसा' असा प्रकार आहे. 
- अरुण फडके


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nilesh Gaikwad and others written about Teaching method of Mathematics in Marathi