प्रयोग गैरभाजप सरकारचा 

मृणालिनी नानिवडेकर
Saturday, 30 November 2019

अजेय ही मोदी आणि शहा यांची ही प्रतिमा जनमानसातून पुसून काढण्यासाठी महाराष्ट्रात शिवसेनेच्या बंडाला काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने साथ दिली. शिवसेनेचे मंत्रालयावर भगवा फडकावण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले, याचे कारण हा मोदीविरोध आहे.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कच्या मैदानावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मनोहर जोशी यांनी १९९५मध्ये शपथ घेतली, तेव्हा हिंदुत्ववादी भारतीय जनता पक्ष शिवसेनेसमवेत होता. उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली, ती मात्र राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसला सोबत घेऊन. हिंदुत्ववादी शिवसेनेने धर्मनिरपेक्षतेचा जो अंगीकार केला आहे, तो त्यांच्या मतदारांना मान्य आहे काय, याचे उत्तर कालांतराने मिळेल. मात्र या निमित्ताने सुरू झालेल्या नव्या प्रयोगाची चर्चा भारतभर होणार. अशा प्रयोगाची आवर्तने सर्वत्र घडावीत, हा या शपथविधीमागचा काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसचा अंतस्थ हेतू असणार. अजेय ही मोदी आणि शहा यांची ही प्रतिमा जनमानसातून पुसून काढण्यासाठी महाराष्ट्रात शिवसेनेच्या बंडाला काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेसने साथ दिली. शिवसेनेचे मंत्रालयावर भगवा फडकावण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले, याचे कारण हा मोदीविरोध आहे. गुजरातेतून दिल्ली जिंकण्यासाठी बाहेर पडलेल्या अन्‌ काँग्रेसमुक्‍तीद्वारे भारताला भाजपाई करायला निघालेल्या नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना रोखण्यासाठी ही आघाडी तयार झाली आहे. दिवस बदलल्याने सत्तेबाहेर फेकल्या गेलेल्या या दोन्ही पक्षांनी स्वत:साठी मंत्रिपदे तर मिळवलीच; पण त्याचबरोबर भाजपविरोधाचा एक मंच तयार केला. पूर्वी गैरकाँग्रेसवादाची चर्चा व्हायची, आता ती जागा गैरभाजपा राजकारणाने घेतली आहे.  

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

निवडणूकपूर्व युती किंवा आघाडी निकालांनंतर बदलता येते. बिहारमध्ये नितीशकुमार यांनी लालूप्रसाद यांच्यासमवेत निवडणूक लढवली. मात्र नंतर ते अचानक भारतीय जनता पक्षासमवेत गेले. शिवसेनेने महाराष्ट्रात तोच कित्ता गिरवला. त्यामुळे भाजपवर अन्याय झाला असला, तरी त्याबद्दल रोष, शोक व्यक्‍त करण्याचा नैतिक अधिकार ते गमावून बसले आहेत. बरे शिवसेना अशी वागलीच का, असा प्रश्‍न केला, तर भाजपनेही काही तास का होईना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तत्कालीन विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांच्यासमवेत जाऊन आपणही याच माळेचे मणी असल्याचे दाखवून दिले आहे. पाच वर्षे स्वत:ची प्रतिमा निष्कलंक ठेवणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी न साकारलेल्या बंडाला प्रोत्साहन देऊन काय मिळवले? नंतर ते याविषयी बोलणार आहेत, असे सांगण्यात आले. 

महाराष्ट्रात शिवाजी पार्कवर सुरू झालेला गैरभाजप ऐक्‍याचा प्रयोग देशभर रुजणार काय, हा प्रश्‍न सध्या महत्त्वाचा आहे. खरे तर भाजपच्या राजवटीला आव्हान देणाऱ्या प्रखर प्रादेशिक पक्षाच्या तळपत्या नेत्या म्हणून पश्‍चिम बंगालची वाघीण ममता बॅनर्जी या शपथविधीला हजर राहिल्या असत्या, तर देशभर या घटनेची कंपने उमटली असती. तमिळनाडूतील एम. के. स्टालीन हे नेते हजर झाले, अन्य दक्षिणी नेते भाजपसमवेत आहेत. समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष यांनी या समारंभाला हजेरी का लावली नाही ते माहीत नाही. त्यांच्या अनुपस्थितीत मोदींना आव्हान देण्यासाठी काँग्रेसच्या मुशीतून तयार झालेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या सोहळ्याचा अघोषित यजमान ठरला. या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार गेली कित्येक वर्षे राष्ट्रीय राजकारणात वावरतात. या वेळी मोदींना प्रचंड बहुमत मिळाले नसते आणि लोकसभा त्रिशंकू ठरली असती, तर केवळ ४ ते ५ खासदारांचे बळ असलेल्या पवारसाहेबांचे नाव सर्वमान्यतेच्या बळावर पंतप्रधानपदासाठी चर्चेत आलेही असते. निकालांमुळे तसे घडले नाही. महाराष्ट्रात मात्र निकालांनंतर शिवसेनेच्या भूमिकेमुळे गैरभाजप सरकारचा प्रयोग प्रत्यक्षात आला आहे.  हा प्रयोग यशस्वी करून दाखवण्याची जबाबदारी दोन्ही काँग्रेससह महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आहे. ते युद्धात हरले तरी तहात जिंकणारे नेते. या वेळी भाजपच्या आडमुठ्या भूमिकेमुळे त्यांच्याशी तह तर झाला नाही; पण ते बाजू बदलून थेट मुख्यमंत्री झाले. अत्यंत प्रतिकूल वातावरणात ते पक्ष पुढे नेतात, दुर्लक्ष करीत ते मोठे बंडही शांतपणे मोडून काढतात. या वेळच्या बंडात तर ते राज्याचे प्रमुख झाले आहेत. मुंबईसारख्या जागतिक दर्जाच्या महानगरात वाढलेले उद्धव ठाकरे व्यावसायिकतेचे, अपेक्षित निकाल देण्याचे कॉर्पोरेट क्षेत्रीय महत्त्व ओळखून आहेत. त्यांचा प्रत्येक निर्णय पक्षाच्या वाटचालीसाठी महत्त्वाचा आहे. 

आर्थिक मंदीचे चटके जाणवताहेत, बेरोजगारीत वाढ होते आहे. मोदी यासंदर्भात काय करतात, असा प्रश्‍न उभा राहिला असतानाच महाराष्ट्रासारखे अर्थकारण हाकणारे राज्य प्रयोगासाठी हाती आले आहे. अन्य राज्यात असे घडते, तर त्याची तीव्रता एवढी नसती. हा महाराष्ट्रातला प्रयोग आहे. एवढे महत्त्वाचे राज्य भाजपने हातातून कसे जाऊ दिले, हे जसे अनुत्तरित तसेच नव्या प्रयोगाचे यश उत्कंठावर्धक. शिवसेना सोडून गेलेले, सध्या जामिनावर असलेले नेते या प्रयोगात आहेत; तसेच नेमस्त मवाळ प्रमुखही. गुजरातेत उदयाला आलेली राजकीय महत्त्वाकांक्षा थेट आसामपर्यंत विस्तारण्याची कामगिरी नोंदवणाऱ्या जोडगोळीने ३७० कलम रद्द करणे, नागरिक सूची तयार करण्यासारखी स्वप्नवत वाटणारी आश्‍वासने प्रत्यक्षात आणली आहेत. ‘मोदी है तो मुमकीन है’ या समजाला महाराष्ट्रात पहिले नख तर लागले, पुढे उद्धव ठाकरे काय करतात ते पाहायचे. हे सरकार जेमतेम काही काळ चालेल म्हणणारे विरोधकही त्यांच्याकडे पाहत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Non-BJP government