अमली पदार्थांचा विळखा सुटण्यासाठी... 

ओंकार वहीकर 
Wednesday, 26 June 2019

कधी थ्रिल म्हणून, कधी मित्रांमुळे, तर कधी ताण, नैराश्‍याच्या नावाखाली अमली पदार्थांचे सेवन केले जाते आणि मग त्याचे व्यसन कधी लागते हे समजतही नाही. आजच्या जागतिक अमली पदार्थविरोधी दिनानिमित्त या समस्येचा घेतलेला वेध. 

आपल्या देशातील सुमारे 25 टक्के तरुण अमली पदार्थांच्या आहारी गेल्याचे एका सर्वेक्षणात आढळले आहे. ब्राऊन शुगर, गांजा, अफू, भुलीचे इंजेक्‍शन, गुंगी आणि मेंदूला झिंग आणणाऱ्या गोळ्या, तसेच सिगारेट, दारू, तंबाखू, गुटखा यांच्या आहारी जाऊन आपले आणि आपल्या कुटुंबाचे आयुष्य उद्‌ध्वस्त करणारे हे व्यसन आहे. पण आपल्या घरातील व्यक्ती अमली पदार्थांचे सेवन करते, हे घरच्यांना लवकर कळत नाही आणि याचा गैरफायदा त्याचे सेवन करणारे घेतात. यात केवळ मुलेच नाहीत, तर मुलींचीही संख्या मन सुन्न करणारी आहे. 

अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या व्यक्तीच्या विचारांमध्ये बदल जाणवू लागतो, तेव्हा हे व्यसन डोके वर काढते, पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते. हे व्यसन इतके घातक आहे की यासाठी मनोविकारतज्ज्ञांची मदत घ्यावी लागते किंवा प्रसंगी संबंधिताची रवानगी मनोरुग्णांच्या इस्पितळात करावी लागते. नव्वदच्या दशकात श्रीमंतांचे किंवा पैसेवाल्यांचे व्यसन म्हणून याकडे पाहिले जायचे, पण आता मध्यमवर्गीयांच्या घरात हा व्यसनाचा राक्षस शिरू पाहतो आहे.

दहावी झालेला मध्यमवर्गीय हुशार मुलगा मित्रांसमवेत पार्टीला जातो काय, मजा म्हणून अमली पदार्थांचे सेवन करतो काय आणि दोनच वर्षांत मनोरुग्णांच्या इस्पितळात भरती होतो काय...हा त्याचा विनाशी प्रवास जवळून पाहिला की अंगावर काटा येतो. असे अनेक हुशार तरुण थ्रिल म्हणून किंवा एकदा अमली पदार्थ "ट्राय' करून पाहतो म्हणून हा मार्ग निवडणारे अनेक जण आज मनोविकारतज्ज्ञ, व्यसनमुक्ती केंद्रात जातात आणि शेवटची पायरी म्हणजे मनोरुग्णांच्या इस्पितळात दाखल होत आहेत. 

आभासी विचारात गुंतणे हे प्रमुख लक्षण 

कंपन्यांच्या, व्यवसायाच्या पार्ट्यांमध्ये आज अमली पदार्थांचे सेवन मोठ्या प्रमाणात होताना दिसते. हा अमली पदार्थांचा राक्षस दबक्‍या पावलाने मध्यमवर्गीय कुटुंबे व झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांवर झडप घालू पाहतो आहे. अमली पदार्थांमुळे मनातला ताण दूर होतो, धाडस येते व नैराश्‍यावर मात करता येते, असा गैरसमज तरुण पिढीमध्ये निर्माण होत आहे.

"मी समाजापेक्षा वेगळा आहे, माझ्यात वेगळ्या प्रकारची शक्ती आहे, मी दुसऱ्या ग्रहांवरच्या लोकांशी संपर्कात आहे. दिवंगत नातेवाइक माझ्याशी बोलतात' अशा अनेक प्रकारच्या आभासी विचारात गुंतणे हे या व्यसनाचे प्रमुख लक्षण. बंद खोलीत कोंडून घेणे, सतत शून्यात बघणे आणि स्वतःशी नकारात्मक संवाद करणे, अशी प्राथमिक लक्षणे जाणवली की पालकांनी लगेच मनोविकारतज्ज्ञांची मदत घ्यावी. 

आमच्याकडे आलेल्या एका पेशंटच्या पालकांनी सांगितले, की त्याचे असे म्हणणे आहे की देशाचे पंतप्रधान त्याला रोज रात्री बारा वाजता फोन करतात व देशातील "इंटेलिजन्स ब्युरो'ला काय सूचना द्यायच्या हे विचारतात. त्याच्याशी झालेल्या समुपदेशनाच्या दोन-तीन सेशनमध्ये असे लक्षात आले, की "उरी' हा चित्रपट पाहताना त्याने अमली पदार्थांचे सेवन केले होते आणि त्यानंतर त्याच्या अमलाखाली त्याने "उरी' चित्रपट तब्बल 72 वेळा पाहिला होता. "देशाचे पंतप्रधान माझ्याशी बोलत असतात,' असे ठासून सांगण्यात तो कुठेही कमी पडत नव्हता. त्याच्यावर ट्रिटमेंट चालू आहे, आता तो स्थिर आहे. 

पालकांचे लक्ष असणे महत्त्वाचे

या सगळ्यांमध्ये पालकांनी मुलांवर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे. आपल्या मुलाचे मित्र कोण आहेत किंवा पॉकेटमनीच्या नावाखाली मुलगा पाच-दहा हजार रुपये का मागतोय हे तपासणे गरजेचे आहे. ताणतणाव, नैराश्‍य यावर मात करण्यासाठी अमली पदार्थांचा उपयोग होतो हा गैरसमज दूर होणे गरजेचे आहे. चित्रपटांमध्ये अमली पदार्थांचे सेवन करतानाचे प्रसंग दाखविलेले असतात. त्याचा खोलवर परिणाम तरुण पिढीवर होतो, हे निदर्शनास आले आहे. 

आनंदी राहण्यासाठी मन आणि बुद्धी यांचा संगम घडवून नैराश्‍य, ताण यावर मात करता येते. स्वामी विवेकानंद म्हणतात की जग एक सुंदर व्यायामशाळा आहे. येथे प्रत्येक जण स्वतःला सकारात्मक विचारांनी ताकदवान बनवू शकतो आणि स्वतः आनंदी राहून दुसऱ्यांना आनंद देऊ शकतो, हे सर्वांनीच लक्षात घेतले पाहिजे. 

(लेखक आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र, पुणे येथे समुपदेशक आहेत.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Omkar Vihikar writes about Drugs Addict Conditions