या जगण्यावर...: हरवलेले रंगीत-संगीत मित्र

कुंपणापलीकडे दुसऱ्या सोसायटीच्या तीन मजली उंचीच्या पाच-सहा इमारती होत्या. तिथल्या लोकांचा पुनर्विकासाचा निर्णय झाला.
या जगण्यावर...: हरवलेले रंगीत-संगीत मित्र
या जगण्यावर...: हरवलेले रंगीत-संगीत मित्रsakal

-शिरीष चिंधडे

सुमारे वीस वर्षांपूर्वी या नवीन इमारतीत राहायला आलो तेव्हा सज्जाभोवती वीस फुटांच्या अंतरावर दणकट, डेरेदार, उंच झाडे होती. थोडे पलीकडे पेरू आणि जांभळाचे झाडही होते. कुंपणापलीकडे दुसऱ्या सोसायटीच्या तीन मजली उंचीच्या पाच-सहा इमारती होत्या. तिथल्या लोकांचा पुनर्विकासाचा निर्णय झाला. सत्वर जुन्या इमारतींवर हातोडे आदळू लागले, जेसीबी आले. जुन्या इमारतीचा राडारोडा हलविला. अडथळा वाटणारी दोन-तीन झाडे कापून टाकली. सज्जाजवळची दोन झाडे गायब झाली. पेरूचे झाड अशक्त होते, ते यथाकाल मरून गेले. असे हिरवे मित्र नष्ट झाले. धूळ, सिमेंट, आरडाओरडा, यंत्रे, मजुरांची वर्दळ असे सर्व सुरू झाले. ते दहा वर्षे चालले! नव्या इमारती होत्याच तशा गगनचुंबी. पूर्वीपेक्षा किती अधिक माणसे, किती वाहने, किती गर्दी आता या रस्त्यावर होणार, रस्त्याला हे सर्व पेलवणार का, या विचाराने जीव गुदमरायचा.

आता हळूहळू परिस्थितीची सवय झाली आहे. तीन झाडे होती, हेही विसरायला झाले. क्वचित सज्जात उभे राहून कधीमधी काढलेल्या जुन्या फोटोंमध्ये ती दिसतात आणि मन हळहळून जाते. कोरोनाची महासाथ अवतरली. सगळे घरोघरी कैद झाले. आता दीर्घकाळ सज्जात जाऊ लागला. नवनवीन जाणीवा जाग्या होऊ लागल्या. शेजारचा शिरीष वृक्ष पानगळ सुरू झाली की लाखो पिकली पाने खाली टाकू लागला. ते आवरणे हे कामच होऊन बसले. वसंतात त्याची शुभ्र-गुलाबी नाजूक तुरेदार फुले परिसरभर दिसू लागली. पलीकडे तग धरून उभे असलेला जांभूळ यंदा ‘निष्फळ’ झालाय.

जांभळांसाठी येणारेही दिसेनासे झाले होते. ध्यानात आलं की आपण काय काय गमावतो आहे. जांभूळ आणि इतर झाडे यांच्या आश्रयाला कितीतरी पक्षी येत, ते दिसेनासे झाले. कावळे न बोलावता येतात, मात्र चिमण्या पूर्वीच अदृश्य झाल्या होत्या. राखाडी रंगाच्या धनेशाची जोडी नेहेमी यायची; ती दिसेनाशी झाली. त्यांच्याकडून शिकावी नात्यातली निष्ठा. काही वेळा आपले लाल, निळे सौंदर्य मिरवत खंड्या येऊन विसावायचा. इकडे तिकडे मान वेळावून बघायचा आणि भुर्रकन जायचा. काळ्या आणि ठिपकेदार कोकिळा तर सतत पंचम लावूनच असत. “अवेळ तरीही बोल, कोकिळे” ही गोविंदाग्रजांची कविता वाचायला छान आहे, “ऐकव तव मधुबोल, कोकिळे” किंवा “उपवनी गात कोकिळा” हे गानकोकिळा हिराबाईंचे गीत मधुर आहे. पण या बायांच्या प्रत्यक्ष ओरड्याने कान किटायचे! कधीमधी आपला ढोल बडवत भारद्वाज येई आणि मग नर-मादीची साद-प्रतिसादाची जुगलबंदी सुरू होई.

खरे तर हा काककुलोत्पन्न. काळे अंग, विटकरी पंख, गांजेकस लाल डोळे आणि शेवदार शेपूट. डौलदार चाल. त्यांच्या दर्शनाने दिवस शुभशकुनी होई. साळुंक्या संसाराच्या चार गोष्टी करून निघून जात. एखादा बुलबुल स्वयंपाकघराच्या खिडकीत डोकावून आज काय भाजी आहे, ते विचारून जाई. कबुतरे मात्र घुसखोरच. हाकलले तरी पुन्हा उपस्थित. मान या ना मान, मैं तेरा महेमान, ही त्यांची तऱ्हा. दूरच्या झाडावर घारीचं घरटं होतं. कसा कोण जाणे पण एकदा एक मोरदेखील उडत जाताना दिसला! कोठून कुठे आलास खगा, केलेस मनोहर कूजन रे! या ओळी आठवल्या.

सज्जात बसल्या बसल्या हे विकासामागील भकासपण आता मनाला चाटून जातं. आता नित्य भेटणारे, मनोरंजन करणारे रंगीत-संगीत मित्र हरवल्याची खंत तेवढी उरली आहे. निसर्गाच्या साथीतील झाडाचं बहरणं, फुलं, फळं येणं आणि त्यांची होणारी पानगळ, पक्ष्यांचं कुजन, त्यांचं सहजीवन हे सगळं पाहताना आपण स्वतःला कुठंतरी शोधत होतो. त्यांच्याशी स्वतःला जोडत होतो. आता इमारती गगनचुंबी झाल्यातरी त्यापलीकडचं हे अस्तित्व अधिक बहारदार, डौलदार आणि त्याही पलीकडच्या उंची आणि समाधानाचं होतं, असंच प्रत्ययाला येत होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com