ऑस्कर अन् खट्यॅक!

Oscar movie Koda great film is made only if camera has eye of poet
Oscar movie Koda great film is made only if camera has eye of poetsakal

कॅमेऱ्याला एखाद्या कवीचा डोळा लाभला असेल तरच उत्तम चित्रपट निर्माण होतो.

- ऑर्सन वेल्स, लेखक, दिग्दर्शक

पर्जन्यकाळ सरता सरता उगाचच रेंगाळलेले तुरळक मेघ घाईघाईने निघून गेले की मग सारे तारांगण आपले चमचमणारे अस्तित्व घेऊन प्रकट होते. पृथ्वीवरले मर्त्य मानव अनिमिष नेत्रांनी ते आभाळलावण्य पाहात राहातात. दोन वर्षाच्या कोरोनाच्या सावटानंतर यंदा प्रथमच रविवारी लॉस एंजलिसच्या सुप्रसिद्ध डॉल्बी सभागारात ऑस्कर सोहळ्याची रात्र पार पडली, तेव्हा सारे तारांगण जणू असेच तिथे एकवटले होते, आणि जगभरातील कोट्यवधी चित्ररसिक टीव्हीवरुन तो सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ पाहात होते.

तिथल्या कुणाच्याही प्रसिद्ध मुद्रांवर ना मुखवटे होते, ना मास्क. सामाजिक अंतराचे सोवळे-ओवळे विसरुन हस्तांदोलने, आलिंगने, चुंबने यांची विनाअडथळा देवाणघेवाण होत होती. जणू मध्यंतरात दोन वर्षांची काळरात्र गेलीच नाही. यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात दोन गोष्टी नजरेत भरण्याजोग्या होत्या. एक म्हणजे पुरस्कारांच्या नामावळीत स्त्री कलावंत आणि त्याचबरोबर तंत्रज्ञांचा दबदबा स्पष्टपणे दिसून आला आणि चित्रनिर्मितीत उतरलेली नवी पिढी किती नवनवे, अनोखे विषय हाताळू पाहात आहे, याचीही चुणूक दिसली. विषयांचे आणि आशयाचे हे वैविध्य, चित्रसृष्टी बदलते आहे, याचे ढळढळीत उदाहरण मानावे लागेल. एरवी ठरावीक चौकटीतले हॉलिवुडी चित्रपट आणि त्यातले तेच जागतिक कीर्तीचे महासितारे यांची ऑस्कर सोहळ्यात चलती असे. यंदा चित्र फार वेगळे दिसले.

‘ कोडा’ हा चित्रपट यंदा सर्वोत्कृष्ट ठरला, हा सुखद धक्का मानायला हवा. संपूर्ण कुटुंब मूकबधिरांचे असताना त्यातली एकच मुलगी नाकी-डोळी-कानी नीटस असते. तिची ही नितांतसुंदर कहाणी आहे. मूकबधिर आईवडील आणि भावाला साथ करत असतानाच तिला तिचीही स्वप्ने पूर्ण करण्याची ऊर्मी अस्वस्थ करत असते, त्या ऊर्मींची ही अर्थगर्भ गोष्ट आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातील सर्व मुख्य भूमिका साकारणारे अभिनेते खरोखरीचे मूकबधिर आहेत. श्यान हेडर या तरुण दिग्दर्शिकेनं मूळ फ्रेंच चित्रपटावरुन हा वेगळा इंग्रजी चित्रपट बेतला, तेव्हा त्यातला भूगोल आणि सांस्कृतिक तपशील पूर्णत: बदलून टाकला. सीओडीए…‘कोडा’ म्हणजे ‘चाइल्ड ऑफ डेफ अॅडल्टस’.

संधी मिळताच पाहावा, असा हा चित्रपट आहे. डेनिस व्हेलनवचा ‘ड्यून’ भाव खाऊन जाणार असे वाटत होते. या विज्ञान काल्पनिकेने छायाचित्रण, ध्वनिलेखन, संकलन, निर्मिती संकल्पन, विशेष ग्राफिक दृश्ये, उत्तम परकीय पटकथा अशा एकूण सहा गटांमध्ये सर्वोत्कृष्टतेची मोहोर उमटवली. या चित्रपटाची ग्राफिक दृश्ये सांभाळणारी कंपनी नमित मल्होत्रा या भारतीयाची आहे, याची नोंद आवर्जून करावी लागेल. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा ऑस्कर पुरस्कार मात्र ‘द पॉवर ऑफ द डॉग’ या वेस्टर्नपटाची दिग्दर्शक जेन कॅम्पियन यांना मिळाला. स्टिवन स्पिलबर्गचा ‘वेस्ट साइड स्टोरी’ देखील शर्यतीत होता. ‘द आइज ऑफ टॅमी फाये’ या चित्रपटातील प्रमुख भूमिका साकारणारी जेसिका चेस्टेन ही सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली. ओसामा बिन लादेनचा ठावठिकाणा शोधण्याच्या मोहिमेवर आधारित ‘झीरो डार्क थर्टी’मधली तिची भूमिका रसिकांच्या स्मरणात अजूनही असेल. ज्या चित्रपटातील प्रमुख भूमिकेसाठी विल स्मिथला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला, तो ‘किंग रिचर्ड’ अमेरिकेत खूपच चर्चेत होता.

व्हिनस आणि सेरेना विल्यम्स या टेनिसपटू भगिनींचे वडील रिचर्ड विल्यम्स यांचा हा वेगळ्या धाटणीचा चरित्रपट आहे. ते महत्त्वाकांक्षी प्रशिक्षक आणि व्यवस्थापक म्हणून ओळखले जात. विल्यम्स भगिनींनीच या चित्रपटाची निर्मिती केली आहे. परंतु, यंदाचा ऑस्कर पुरस्कार विल स्मिथच्या पुरस्कारामुळे लक्षात राहण्यापेक्षा, त्याने भर सभागारात केलेल्या कृत्यामुळे अधिक लक्षात राहील, असे दिसते. विल स्मिथची पत्नी जाडा हिच्या केशभूषेबाबत सूत्रधार क्रिस रॉक याने काहीतरी आचरट कॉमेंट भर रंगमंचावरुन केली. एकमेकांची फिरकी घेणे, टोमणे मारणे हे असल्या रंगमंचावर नित्याचेच असते.

आपल्याकडील पुरस्कार सोहळ्यांमध्येही हीच प्रथा पडली आहे. तथापि, क्रिस रॉक याचा शेरा ऐकून विल स्मिथ शांतपणे खुर्चीतून उठला आणि रंगमंचावर जाऊन त्याने सूत्रधाराच्या सणसणीत कानाखाली लगावली. हे सगळे ‘ठरवून’ घडवलेले नाट्य असावे, असेच सुरवातीला प्रेक्षकांना वाटले. खरी परिस्थिती कळल्यावर समाज माध्यमांवर प्रतिक्रियांचा धबधबा सुरु झाला. अर्थात झाल्या प्रकाराबद्दल विल स्मिथने नंतर उपस्थितांची माफीदेखील मागितली. ऑस्कर समितीच्या आचारसंहितेनुसार विल स्मिथला पुरस्कार परत मागितला जाऊ शकतो. परंतु, क्रिस रॉक याने पोलिसात तक्रार न गुदरण्याचे जाहीर केल्यामुळे प्रकरण येथेच शमेल, असे तूर्त मानले जात आहे. काहीही असले तरी या प्रकारामुळे ऑस्कर सोहळ्याला गालबोट लागले, हे तर खरेच. युक्रेनमधल्या युद्धसंहाराबद्दल बिरादरभाव व्यक्त करणारे भावपूर्ण गाणेही रंगमंचावरुन सादर करण्यात आले. आपले महानायक दिलीपकुमार आणि स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनाही या सोहळ्यात श्रध्दांजली वाहिली गेली असती तर भारतीय मनाला थोडे बरे वाटले असते इतकेच. याच महिन्याच्या प्रारंभी झालेल्या ब्रिटिश अकादमीच्या (बाफ्टा) पुरस्कार सोहळ्यात या दोघांनाही श्रद्धांजली वाहण्याचे औचित्य दाखवण्यात आले होते. रत्नखचित तारांगणात लतादीदी नावाचा तो ध्रुवतारा नसेल, तर त्या आकाशाशी आपले नाते तरी काय सांगायचे?

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com