मनाचे दुःख (पहाटपावलं)

विनय पत्राळे
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

जोपर्यंत परिणामकारक उपाय केला जात नाही तोपर्यंत शरीर ओरडणे थांबवत नाही, शांत झोपू देत नाही.

स्वस्थ शरीराची व्याख्या काय आहे.. तर शरीर आहे हे कळू नये.. म्हणजे स्वस्थ शरीर! शरीर इतके निरोगी, स्वस्थ, हलके, लवचिक आहे आहे की अंथरुणावर पडल्या पडल्या ते होत्याचे नव्हते होते. ते जाणवतसुद्धा नाही आणि अज्ञानाच्या गुहेत सरकून जाते. त्याचे अवधान राहत नाही आणि ते निद्राधीन होते.. ते स्वस्थ शरीर!

त्याच शरीरात एखादी जखम असेल तर.. नख उखडले असेल तर... डोके दुखत असेल तर... दाढ ठणकत असेल तर... डोळ्यांत कण गेला असेल तर... तर दुसरे काही सुचत नाही. जोपर्यंत परिणामकारक उपाय केला जात नाही तोपर्यंत शरीर ओरडणे थांबवत नाही, शांत झोपू देत नाही.
पण उपाय केला; दुखणे निवळले, शरीर बरे झाले की मग तो घाव इतिहासजमा होतो. तो पुन्हा त्रास देत नाही. उदाहरणार्थ- तुमचा दात किडला, हिरड्यांना सूज आली, रुट कॅनॉल करावे लागले, डॉक्‍टर बरोबर चार-पाच वेळा सिटिंग झाले, प्रत्येक वेळी अंगावर शहारे आणणारी कळ उठली, "केव्हा संपेल एकदाचे' असे वाटले. शेवटी संपले... दात निर्जीव झाला. आता चिंता मिटली. आता दुखणे नाही.. सहा महिने झाले.. आता ती ट्रीटमेंट आठवते, पण त्या आठवणीने अंगावर शहारा येत नाही. स्मृती आहे, पण त्याचा आता त्रास होत नाही.. ती बौद्धिक स्तरावरची आठवण म्हणून आहे. तिचा त्याशिवाय जास्त संबंध नाही.

पण चारचौघांत तुमचा कुणी अपमान केला, तर मनाला लागेल असे फाडफाड बोलले तर... तुम्ही काहीही केले नसताना चोरीचा आळ घेतला तर.. मग ती जखम मनाला होते. ती भरून निघता निघत नाही. तिला दुरुस्त करण्याचा उपायही सापडत नाही. तुम्ही फार तर थोडी झाकून ठेवाल; पण ती सदैव ओली राहते. कोणत्याही घटनेने त्याची स्मृती जागृत झाली, तर प्रत्येक वेळी ती तितकेच अस्वस्थ करते. अशी एखादी व्यक्ती अचानक अनपेक्षित समोर आली, तर प्रतिरोधाची लाट मनाच्या किनाऱ्यावर लगेच थडकते. तो प्रसंग कालपरवाच झाल्यासारखी ती ताजी होते. सैरभैर करते. संधी मिळताच प्रतिशोध घेण्यासाठी मनुष्याला उद्युक्त करते.
सुरुचीने केलेला ध्रुव बाळाचा अपमान दुःशासनाने केलेला द्रौपदीचा अपमान आणि धनानंदाने केलेला विष्णुगुप्त चाणक्‍याचा अपमान... या घटनांनी भारताच्या इतिहासावर दीर्घकाळ परिणाम गाजवलेला आहे. मनाचे दुखणे असे असते. आपले माप वसूल केल्याशिवाय त्याची तडफड थांबत नाही.

पण कित्येकदा तत्कालीन कुरबुरीपेक्षा जास्त महत्त्व नसलेल्या गोष्टी मनात घर करून बसतात. चक्रवाढ व्याजासारख्या आपले वजन वाढवत राहतात. ओझे घेऊन चालणारा मनुष्य जसा लवकर दमतो, तसे या कुरबुरींचा कचरा मनात बाळगणारा मनुष्य लवकर हताश होतो. "हे माझ्याच बाबतीत घडते,' अशी एक अनावश्‍यक बेडी तयार करतो. ही बेडी त्याचा उत्साह, त्याची ऊर्जा, त्याचे हसणे, त्याचे खळखळून वाहणे.. या सर्वांना झाकाळून टाकते.
जुन्या काळी घरात अडगळीची खोली असायची. कोणतीही अनावश्‍यक गोष्ट अजून फेकण्यासाठी मन तयार नसेल, तर अडगळीच्या खोलीत ठेवली जायची. बाकी घर लख्ख असायचे व अडगळीची खोली भरत जायची. मग दिवाळीला साफसफाई सुरू झाली, की अडगळीची खोली उघडायची. अनावश्‍यक गोष्टी फेकून द्यायच्या, अशी पद्धत होती.
आमच्या डोक्‍यातही अशी एक अडगळीची खोली असू दे.. दर वर्षी दिवाळीत ती साफ होऊ दे.. जुना कचरा बाहेर निघू दे... मगच नव्या फराळाचा आनंदाने आस्वाद घेता येईल. नाही काय?

Web Title: pahat pavale by vijay patrale