पहाटपावलं : पाहुण्यांचा महिना

मृणालिनी चितळे
मंगळवार, 21 मे 2019

पूर्वी मे महिना म्हणजे पाहुण्यांचा महिना असायचा. घराघरांत आते, मामे, मावस, चुलत अशी पंचवीसेक नातेमंडळी एकत्र रहायला यायची. सर्वांना सामावून घेऊ शकतील इतपत घरं मोठी असायची.
 

पूर्वी मे महिना म्हणजे पाहुण्यांचा महिना असायचा. घराघरांत आते, मामे, मावस, चुलत अशी पंचवीसेक नातेमंडळी एकत्र रहायला यायची. सर्वांना सामावून घेऊ शकतील इतपत घरं मोठी असायची.

संडास आणि बाथरूम मात्र एक किंवा दोन. तरीही कुणाला काही अडचण जाणवायची नाही; तक्रार तर दूरच. मुलांचा धुडगूस, मोठ्यांच्या गप्पा, हसणं, खिदळणं, रागावणं, रुसणं. घरी केलेलं पॉटचं आईस्क्रीम, भेळपार्टी, आमरसपुरी, दिवसभराची ट्रीप, सर्कस, चित्रपट, नाटक म्हणजे चैनीची परिसीमा. त्यात एक महिना भर्रकन निघून जायचा. अशा घरांतील यजमानपद आजी-आजोबा, थोरले काका-काकू, मामा-मामी यांनी कधी खुशीनं स्वीकारलेलं असायचं, कधी गळ्यात पडलेलं असायचं, परंतु त्यामुळे येणाऱ्या पाहुण्यांना फरक पडायचा नाही. काही पाहुणे समंजस असायचे, तर काही घुसखोर. अनाहूत. डोईजड ठरणारे. पाहुणे कसेही असले तरी पाहुण्यांनी वाजती-गाजती ठेवलेली घरं कमी नसायची. 

हळूहळू शहरं मोठी झाली. घरं लहान झाली. घरांबरोबर मनातील अंतरं वाढली. स्वास्थ्याच्या कल्पना बदलल्या. अपेक्षांच्या कक्षा रुंदावल्या. कुणाकडेही महिना-पंधरा दिवस जाऊन मुक्काम ठोकण्याची प्रथा इतिहासजमा झाली. काही जणांकडे पाहुणचार करण्याइतके पैसे असले, 
तरी वेळ नाही. काहींच्या मनात आपण केलेला पाहुणचार पाहुण्यांना रुचेल काय, याबद्दल साशंकता आहे तर, पाहुण्यांच्या मनात संकोच. व. पु. काळे यांनी एके ठिकाणी म्हटलं आहे, की "पाहुणा आणि मासळी कितीही चांगली असली तरी तिसऱ्या दिवशी वास मारू लागते.' कटू वाटलं तरी ही 
वस्तुस्थिती आहे आणि त्याच वेळी नेहमीच्या दिनक्रमातून 8/ 15 दिवस तरी बाहेर पडावसं वाटणं ही आपली मानसिक गरज झाली आहे. मग त्यासाठी कुणी एखादी यात्रा कंपनी गाठतं, कुणी परदेशवारी करतं, परंतु सगळ्यांना हे कसं जमणार? 

या पार्श्वभूमीवर पुण्यातील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत अनेक वर्षे "सुटीतील पाहुणे योजना' हा एक वेगळा उपक्रम राबवला जात आहे. तेथील शाळेच्या वसतिगृहातील मुली सुटीत घरी जात असल्यामुळे त्यांच्या खोल्या रिकाम्या असतात. या खोल्या पाहुण्यांना 8 /15 दिवसांसाठी भाड्यानं दिल्या जातात. काही खोल्या तर एकावेळी पंधरा जणांनासुद्धा सामावून घेऊ शकतील इतक्‍या ऐसपैस आहेत. पूर्वी आंब्याची आढी घातल्यागत सर्वजण झोपायचे त्याची आठवण व्हावी अशा. संस्थेचा भरपूर झाडी असलेला परिसर, मोकळी पटांगणं, स्वादिष्ट भोजन यामुळे पुण्यातून आणि पुण्याबाहेरहून अनेक जण "पाहुणे योजने'चा लाभ घेत आहेत. एवढंच नाही तर पाहुण्यांचे मित्र, नातेवाईक पाहुण्यांचे पाहुणे म्हणून इथं येऊन राहतात. गतस्मृतींना उजाळा देतात. खरंच, परिस्थितीच्या गतीनं आपली मानसिकता बदलता आली नाही, तरी वेगवेगळे पर्याय शोधण्याची किमया मात्र घडविता येते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pahatpawala article in sakal On Summer Holiday