भाष्य : महती अक्षय ऊर्जास्रोतांची

एकविसाव्या शतकात विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात नाट्यमय बदल झाले. या वेगवान प्रगतीने मानवी जीवनशैली बदलून गेली. जीवनमान उंचावले.
Akshay Urja Diwas
Akshay Urja DiwasSakal

दरवर्षी भारतात २० ऑगस्ट रोजी नवीकरणीय ऊर्जाक्षेत्रातील घडामोडींविषयी जागरुकता वाढवण्यासाठी ‘अक्षय ऊर्जा दिवस’ साजरा केला जातो. या ऊर्जेचे महत्त्व विशद करणारा लेख.

एकविसाव्या शतकात विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात नाट्यमय बदल झाले. या वेगवान प्रगतीने मानवी जीवनशैली बदलून गेली. जीवनमान उंचावले. मात्र त्याचवेळी याची काही एक किंमतही माणसाला मोजावी लागत आहे. याचे ठळक उदाहरण म्हणजे हवामान बदलाचे परिणाम. लाखो लोकांना जीवित व वित्तहानीस सामोरे जावे लागत आहे. विशेषतः पूर, चक्रीवादळ या आपत्तींनी घडविलेला विनाश आपण अनुभवतो आहोत.

हवामान बदलांतर्गत प्रतिसादाच्या प्रतिक्रियेत, शमन आणि अनुकूलन हे दोन आधारस्तंभ आहेत. अक्षय ऊर्जेचे महत्त्व त्यामुळेच वाढत आहे. हवामान बदल हा जागतिक किंवा प्रादेशिक हवामान संरचनेमधे होणारा दीर्घकालीन बदल होय. एकूण मानवी व्यवहार; विशेषतः उद्योगांचा वाढता व्याप, वाहनांचे मोठे प्रमाण आणि विकासचक्र गतीने चालू ठेवण्यासाठी जीवाश्म इंधन वापरले जाते. हे इंधन जळण्याच्या प्रक्रियेमुळे, पृथ्वीच्या वातावरणात हरितगृह वायू बंदिस्त होतात ज्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागाचे सरासरी तापमान वाढते. 

जागतिक तापमानवाढीचा सामना करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या हवामान बदलाच्या (UNFCCC) नियमन चौकटीत गेल्या शतकाच्या अखेरीपासून क्योटो प्रोटोकॉल आणि पॅरिस करारासारखे आंतरराष्ट्रीय करार साकारले गेले आहेत. पूर्व-औद्योगिक पातळीपेक्षा सरासरी जागतिक तापमानात वाढ २ अंश सेल्सियसपेक्षा कमी ठेवणे आणि शक्यतो १.५ अंश सेल्सियसपर्यंत वाढ मर्यादित करणे, हे उद्दिष्ट आहे. यामुळे हवामान बदलाच्या परिणामांमधे लक्षणीयरीत्या, शाश्वत अशी घट शक्य होईल. २१ व्या शतकाच्या उत्तरार्धात, उत्सर्जन निव्वळ-शून्यावर पोहोचणे आत्यंतिक गरजेचे आहे. अशा प्रकारे नवीकरणीय ऊर्जा(अक्षय ऊर्जा) स्त्रोतांच्या भूमिकेस वेगाने महत्त्व प्राप्त झाले आहे.

जागतिक ऊर्जा मागणीही वेगाने बदलत आहे. आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या(IEA) मते, जागतिक ऊर्जा मिश्रणातील नवीकरणीय ऊर्जेचा अंश २०४०पर्यंत ११ टक्क्यांवरून २०टक्क्यांपर्यंत झपाट्याने वाढेल. कोविड १९ महासाथीने जागतिक स्तरावर याचा वेग अधिक वाढवला आहे. शाश्वततेवर लक्ष केंद्रित करून, जग नवीकरणीय ऊर्जा तंत्रज्ञानाच्या दिशेने जागतिक ऊर्जा खर्चात लक्षणीय बदल करत आहे. जगभरातील तेल कंपन्या, सौर व पवन ऊर्जा आणि भू -औष्णिक वीजनिर्मितीमध्ये आता या दिशेने काम करीत आहेत. त्यानुसार त्यांच्या पोर्टफोलिओची पुनर्रचनाही करीत आहेत. नवीकरणीय ऊर्जास्त्रोतांमध्ये कार्बनमुक्त स्त्रोत जसे सौर ऊर्जा, वारा, भरती, लाटा आणि भू-तापीय उष्णता यांचा समावेश आहे. जीवाश्म इंधनासारख्या पारंपारिक ऊर्जास्त्रोतांपेक्षा ते जास्त उपयोगी ठरतील. ग्लोबल वार्मिंग, वायू प्रदूषण इत्यादींसारख्या समस्या निर्माण होणे त्यामुळे टळेल.

अक्षय ऊर्जास्त्रोत अत्यंत कमी किंवा शून्य प्रमाणात कार्बन उत्सर्जित करतात. अनेक विकसनशील देशांमध्ये वायू प्रदूषण एक गंभीर समस्या आहे, जेथे २.९ अब्जांहून अधिक लोक आजही स्वयंपाक व उष्णतेसाठी लाकूड, कोळसा यावर अवलंबून आहेत. वायू आणि जल प्रदूषणामुळे आरोग्यावर होणारे सर्वाधिक नकारात्मक परिणाम उद्भवतात. हे सगळे धोके आणि जोखीम टळते ती अक्षय ऊर्जा तंत्रज्ञानामुळे. भारताचे अक्षय ऊर्जा क्षेत्र गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढले आहे. पवन ऊर्जेमध्ये भारत पाचव्या क्रमांकावर, सौर ऊर्जेमध्येही पाचवा आणि अक्षय ऊर्जा स्थापित क्षमतेमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. २०३०च्या लक्ष्यित तारखेपूर्वी ऊर्जाकार्यक्षम माध्यमांचा अवलंब करून पॅरिस कराराचे लक्ष्य साध्य करण्यात भारत आघाडीवर आहे.

महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे

‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या मते, भारत नूतनीकरणीय ऊर्जा तंत्रज्ञानाचा स्वीकार करून २०२१ ते २०३० दरम्यान आयातीत ९० अब्ज डॉलरची बचत करू शकतो. भारत स्वतःची ऊर्जामागणी आत्मनिर्भर राहून पूर्ण करू पाहत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात, नवीकरणीय ऊर्जा अधिक महत्त्वाची भूमिका बजावणार आहे, याचे कारण ही मागणी २०४०पर्यंत १५८२० टेरॅवॅट अवर (TWh) पर्यंत पोहोचणे अपेक्षित आहे. अनुकूल धोरणात्मक वातावरण, भांडवल आणि नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान यांद्वारे भारत सरकारने २०२२पर्यंत २२७ गिगावॅट अक्षय ऊर्जा क्षमता (११४ गिगावॅट सौरक्षमता आणि ६७ गिगावॅट पवन ऊर्जाक्षमता) साध्य करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. हे उद्दिष्ट पॅरिस हवामान करारातील १७५ गिगावॅटच्या प्रस्थापित लक्ष्यापेक्षा अधिक आहे, ही ध्यानात घेण्याजोगी बाब आहे. याशिवाय २०३० पर्यंत ५२३ गिगावॅट अक्षय ऊर्जाक्षमता स्थापित करण्याची सरकारची योजना आहे. भारताने आपण प्रदूषण व हवामान बदलाचे कारण नसल्याचे स्पष्ट करत, स्वेच्छेने हरितगृह वायू उत्सर्जनाची तीव्रता कमी करण्यासाठी वचनबद्धता दर्शवली आहे.

नवीकरणीय ऊर्जा या उद्दिष्टाच्या बाबतीत विविध प्रकारचे उपक्रम आणि प्रकल्प संकल्पित आहेत. बरेच असे उपक्रम सध्या कार्यरत आहेत. त्यातून भारत ऊर्जेच्या बाबतीत अधिक सक्षम आणि सुरक्षित होईल. सराकारच्या प्रयत्न त्या दिशेने आहे. सर्वात अलीकडील आणि महत्वाकांक्षी उदाहरण सांगायचे झाले तर, ते म्हणजे भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनाचे. १५ ऑगस्टचे औचित्य साधून ‘राष्ट्रीय हायड्रोजन मिशन’ ची घोषणा करण्यात आली. ग्रीन हायड्रोजन हे भारताचे सर्वात मोठे उद्दिष्ट आहे आणि जगातील सर्वात मोठे स्वच्छ ऊर्जा अभियान राबवण्यात, भारत अग्रेसर राहण्यासाठी प्रयत्नशील आहे. जगभरात, ग्रीन हायड्रोजन व ग्रीन अमोनियाचा प्रमुख निर्यातदार होण्याचादेखील भारताचा प्रयत्न आहे. इतर उल्लेखनीय उदाहरणे म्हणजे, सौरऊर्जा निर्मितीचे विकेंद्रीकृत मॉडेल, लडाख भू औष्णिक प्रकल्प आणि संकुचित बायोगॅस प्रकल्प. भू-औष्णिक ऊर्जा ही एकमेव नूतनीकरणयोग्य ऊर्जा आहे जी सातत्याने उपलब्ध आहे आणि जिची साठवण आवश्यक नसते. दिवस-रात्र किंवा हंगामी फरकाने त्यावर परिणाम होत नाही.

तेल व नैसर्गिक वायू महामंडळाने भारतीय पेट्रोलियम क्षेत्रात आपले प्रमुख स्थान ओळखून व पेट्रोलियम संसाधने जगभरात कमी होत आहेत याबाबत जागरूकता राखून, भारताची ऊर्जा -उपलब्धता वाढवण्याचा प्रयत्न चालवला आहे. लडाखमधील भू-औष्णिक प्रकल्पाचे नेतृत्व करण्यासाठी काही ठोस पावले उचलली आहेत. जीएसआय (जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया) द्वारे भारतातील भू -औष्णिक संसाधनांची ठिकाणे निश्चित करण्याचे काम केले जाते. नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालया(एमएनआरई) अनुसार या ठिकाणी, १० गीगावॅट इतकी भू-औष्णिक उर्जा क्षमता असू शकेल. देशातील प्रत्येक राज्यात, नवीकरणीय ऊर्जेवर चालणाऱ्या ‘ग्रीन सिटी’ विकसित करण्याचेही भारत सरकारचे आणखी एक महत्त्वकांक्षी उदिष्ट आहे. या हरित शहरांमधील सर्व घरांवरील सौर ऊर्जा रूफटॉप प्रणाली, शहरा बाहेरील सौर उद्याने, कचऱ्यातून ऊर्जा निर्माणप्रकल्प आणि विद्युतसक्षम सार्वजनिक वाहतूक प्रणालीद्वारे पर्यावरणानुकूल ऊर्जा मुख्य प्रवाहात आणली जाईल. स्वच्छ ऊर्जास्त्रोतांचा वापर वाढवण्याबाबत देश प्रतिबद्ध आहे. दरवर्षी भारतात २० ऑगस्ट रोजी नवीकरणीय ऊर्जाक्षेत्रातील घडामोडींविषयी जागरुकता वाढवण्यासाठी ‘अक्षय ऊर्जा दिवस’ साजरा केला जातो. भारतासाठी पुढील मार्ग स्पष्ट आहे, ऊर्जा-सुरक्षित व ऊर्जा-स्वतंत्र होण्याच्या बाबतीत घोडदौड कायम ठेवण्याचा.

- पल्लवी यादव

(लेखिका तेल व नैसर्गिक वायू क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com