भक्तीतून सामाजिक शक्‍ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pandurang-shastri-athavale

योगेश्वर कृषी, मत्स्यगंधा, वृक्षमंदिर यांसारखे अनेक प्रयोग शेकडो गावांमध्ये आज डौलाने उभे आहेत. त्यामागे पांडुरंगशास्त्री आठवले यांनी मांडलेला भक्तीतून सामाजिक शक्ती हा विचार आहे. त्यावर टाकलेला दृष्टिक्षेप पांडुरंगशास्त्रींच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त.

भक्तीतून सामाजिक शक्‍ती

उद्या १९ ऑक्‍टोबर. हा दिवस म्हणजे कृतिशील तत्त्वचिंतक पांडुरंगशास्त्री आठवले (दादा) यांचा जन्मदिवस. १९ ऑक्‍टोबर १९२० रोजी रायगड जिल्ह्यातील रोहा येथे जन्मलेल्या दादांचा हा जन्मदिवस वैश्विक स्वाध्याय परिवार ‘मनुष्य गौरव दिन’ या सार्थ नावाने साजरा करतो. हे पांडुरंगशास्त्रींचे जन्मशताब्दी वर्ष आहे व त्यांचा अखिल वैश्विक स्वाध्याय परिवार काही विशिष्ट संकल्प घेऊन एका वेगळ्या निश्‍चयाने साजरा करणार आहे.

आपल्या देशात अनेकानेक प्रज्वलंत चरित्रे होऊन गेली, इथे अनेक प्रज्ञावान व्यक्तिमत्त्वे प्रसवली. पांडुरंगशास्त्री हे अशाच रचनात्मक कार्य करणाऱ्या दुर्मीळ व्यक्तींपैकी एक अग्रगण्य नाव. अर्थात दादांची विचारपद्धती, कार्यपद्धती, तसेच संघटना पद्धतीही अत्यंत भिन्न आहे. स्वतः मूलगामी व एक वेगळीच वाट चोखाळणाऱ्या दादांनी कधीही ‘मी काहीतरी वेगळे या देशात उभे करतो आहे’ हा अभिनिवेश आणला नाही. जपान येथे जागतिक तत्त्वचिंतकांच्या परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करताना भक्ती ही सामाजिक शक्ती आहे,’ असा केलेला उद्‌घोष निश्‍चितच निराळा होता. असे उद्‌घोष करणारे खूप असतातही; पण त्या आधारे रचनात्मक कार्य सिद्ध करणारे विरळा असतात. अर्थातच, भक्ती ही सामाजिक शक्ती आहे, असे म्हणताना दादांना कर्मकांडी भक्ती खचितच अभिप्रेत नव्हती. ते म्हणत, की भक्ती म्हणजे केवळ कर्मकांड नव्हे, तर भक्ती म्हणजे मी त्या भगवंतापासून विभक्त नाही ही पक्की समजूत. त्याच्या हृदयस्थ असल्यामुळे माझे अस्तित्व आहे, ही भावपूर्ण समजूत भक्तीत नसेल तर केवळ फुले, हार, सजावट, प्रसाद हे सर्व कर्मकांड निष्फळ आहे. दादांनी केवळ भक्ती व तत्त्वज्ञान यावर प्रवचने केली नाहीत, तर लाखों माणसांना ही समज नकळतपणे दिली, की माझं अस्तित्व कोणामुळे तरी आहे, याच उदात्त भावनेतून ‘कृतज्ञता’ येते. ईश्वराच्या माझ्यातील अस्तित्वाच्या समजुतीमुळे माझा हलकेपणा नष्ट होतो, ‘अस्मिता’ येते, माझ्यातील लाचारीची भावना हळूहळू कमी होते, ‘तेजस्विता’ येते. चराचर विश्व चालवणारा माझ्यात व दुसऱ्यात येऊन बसला आहे या विचारामुळे माणसात ‘भावमयता’ येते. ईश्वराने जसे माझ्यावर निःस्वार्थ, निरपेक्ष प्रेम केले, तसे करण्याचा छोटासा प्रयत्न मी केला पाहिजे, अशी ‘कृतिप्रवण’ करणारी एक निश्‍चित विचारधारा लाखो लोकांमध्ये निर्माण करण्यामध्ये पांडुरंगशास्त्री यशस्वी झाले. 

बुद्धिगम्य भक्तीच्या बैठकीवर निर्माण होणारे परस्पर भावनिक ऐक्‍य, तसेच व्यक्तीमधील भाव-जागृती व अस्मिता जागृती हेच रचनात्मक कार्य आहे. अशा विचारधारेवर जगणारा, दैवी भ्रातृभाव जपणारा, गावात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणणारा एक वैकल्पिक समाज पांडुरंगशास्त्री उभा करू शकले. युवा-युवतींचा स्वाध्याय कार्यातील सहभाग लक्षणीय आहे. शेकडो गावांत दादांचे योगेश्वर कृषी, मत्स्यगंधा, वृक्षमंदिर, श्रीदर्शनम्‌ यांसारखे अनेक प्रयोग डौलाने उभे आहेत. ब्रिटन, अमेरिका, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, आखाती देश अशा अनेक विदेशांतही विस्तारलेले आहे. दादांनी कोळी, आगरी, आदिवासी यांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन आणले. समाजातील सुशिक्षित बुद्धिमान डॉक्‍टर, इंजिनिअर यांच्यातही परिवर्तन आणले. सर्वांना आपली निपुणता अर्पण करूनही भक्ती होऊ शकते, हे सांगून त्यांना कृतिप्रवण केले. दादांची जन्मशताब्दी स्वाध्याय परिवाराच्या प्रमुख धनश्री तळवलकर (दीदी) यांच्या मार्गदर्शनाखाली भावमयतेने व कृतिपूर्णतेने स्वाध्याय परिवार साजरी करेल. आजच्या या मनुष्य गौरवदिनी पांडुरंगशास्त्री आठवले या कृतिशूर तत्त्वचिंतकाला भावपूर्ण वंदन!!