आपण का असतो? (परिमळ)

विश्‍वास सहस्रबुद्धे
बुधवार, 14 डिसेंबर 2016

आपण का असतो? आपण म्हणजे आपले शरीर आणि मन यांचा समुच्चय. विवेचनाच्या सोयीसाठी आपण या समुच्चयासाठी शरीर हीच संज्ञा वापरू. गेल्या लेखांकात आपण असा विचार मांडला, की शरीर हे एक यंत्र आहे. कोठलेही यंत्र बनविण्यामागे उद्देश असतो. पण मग हे यंत्र बनविण्यामागील उद्देश काय असावा याचा विचार करणे क्रमप्राप्त आहे. मात्र आता आपण या यंत्राची परिकल्पना (डिझाइन) किंवा निर्मिती कोणी केली यावर नव्हे, तर केवळ त्यामागील उद्देशावर विचार करणार आहोत.

ही यंत्रे, किंवा क्रमशः त्यांना जन्माला घालणारी यंत्रे कशी बनली हे विज्ञानाच्या मदतीने आपण जाणून घेतले आहे. प्राणिसृष्टीत व वनस्पतिसृष्टीतसुद्धा आपल्यासारखीच यंत्रे आढळून येतात. चार्ल्स डार्विनने मांडलेल्या, "नैसर्गिक निवडीतून उत्क्रांती'च्या सिद्धांतामुळे, पहिल्या एकपेशी जिवापासून आजची जीवसृष्टी कशी उत्क्रांत झाली हे आपल्याला समजले. पहिला एकपेशी जीव, आद्ययंत्र कसे निर्माण झाले असेल याबद्दलही तर्कशुद्ध विचार आज स्थापित झाला आहे. पण मूळ कळीचा प्रश्न शिल्लक राहतोच. या आद्ययंत्राच्या निर्माण होण्यामागील उद्देश काय? यावर विचारवंतांनी अथक उरस्फोड केली, पण त्यावर उत्तर नाही. मग असे वाटते, की हा प्रश्नच अप्रस्तुत तर नव्हे? पाऊस पडण्यामागील कारणमीमांसा तर कळली, पण उद्देश? विश्वातील अनेक घटितांबद्दल हेच म्हणता येते. भूकंप, ग्रहणे, ऋतुचक्र अशी अनेक उदाहरणे सुचविता येतील. भूकंपात जीवितहानी होते, पण भूकंप होण्यामागील उद्देश जीवितहानी हा होय, असे म्हणता येत नाही. जीवितहानी होणे हे आनुषंगिक आहे.

कारण (कॉज) आणि उद्देश (पर्पज) यांची आपण गल्लत करतो. आपण असणे याला उद्देश असा काही असू शकत नाही. त्यामुळे, आपण असण्याचा अर्थ काय?- हा प्रश्नही अर्थविहीन आहे. म्हणजेच, आपले असणे याला काहीही उद्देश व अर्थ नाही- या निष्कर्षाप्रत येणे भाग पडते. "आयुष्य हा सुखाने भरलेला प्याला नसून, ते कर्तव्याने भरावयाचे माप आहे,' अशा संस्कारांमध्ये आपण वाढलेलो असलो, तर हा निष्कर्ष कदाचित आपल्याला भयभीत आणि अवाक करेल. आपण जन्माला येतो तेव्हा कोणी आपल्याला विचारले होते, की तुला जन्माला घालू? पोपटाच्या का पिंपळाच्या? तुझी उंची किती ठेवू? तुझ्या डोळ्यांचा रंग पिंगट चालेल? तुला बुध्दिमान करू का निर्बुध्द? अर्थातच नाही. आपल्या आयुष्याच्या कोठल्यातरी टप्प्यावर, आपल्याला बस्स कळून चुकते, आपण आहोत!
पण आपण या निष्कर्षाने निराश होण्याचे कारण नाही. उलट या निष्कर्षाने आपल्या मनातल्या गाठी सुटण्यास आणि जळमटे स्वच्छ होण्यास मदत होईल. आपली उद्दिष्टे ठरविण्याचे स्वातंत्र्य मिळेल. जीवन अधिक रसपूर्ण आणि आनंदी होईल. शेवटी आयुष्य माझे आहे, नव्हे काय?

Web Title: parimal : existence

टॅग्स