परिमळ : खासगी आणि सरकारी

विश्‍वास सहस्रबुद्धे
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

खासगी म्हणजे प्रायव्हेट आणि सरकारी म्हणजे गव्हर्न्मेंट. पण हे वाच्यार्थ झाले. साधारणपणे खासगी म्हणजे चांगले आणि सरकारी म्हणजे "असेतसे' असे भावार्थ या शब्दांना चिकटले आहेत. आपल्या प्रिय व्यक्तीला वैद्यकीय उपचारांची गरज असेल, तर सरकारी दवाखान्यात बाय चॉइस कोण जाते? ज्याला खासगी इस्पितळाचे दर परवडत नाहीत, असेच लोक सरकारी दवाखान्यात जातात. सरकारी शाळांबद्दल हेच म्हणता येईल. सरकारी खात्यांबद्दल, "सरकारी काम आणि दोन महिने थांब' अशीच भावना दिसून येते. असे का होत असेल बरे? अखेर सरकारी यंत्रणेमध्ये काम करणारी माणसे तुमच्या-माझ्यासारखीच असतात, नव्हे काय?

खासगी म्हणजे प्रायव्हेट आणि सरकारी म्हणजे गव्हर्न्मेंट. पण हे वाच्यार्थ झाले. साधारणपणे खासगी म्हणजे चांगले आणि सरकारी म्हणजे "असेतसे' असे भावार्थ या शब्दांना चिकटले आहेत. आपल्या प्रिय व्यक्तीला वैद्यकीय उपचारांची गरज असेल, तर सरकारी दवाखान्यात बाय चॉइस कोण जाते? ज्याला खासगी इस्पितळाचे दर परवडत नाहीत, असेच लोक सरकारी दवाखान्यात जातात. सरकारी शाळांबद्दल हेच म्हणता येईल. सरकारी खात्यांबद्दल, "सरकारी काम आणि दोन महिने थांब' अशीच भावना दिसून येते. असे का होत असेल बरे? अखेर सरकारी यंत्रणेमध्ये काम करणारी माणसे तुमच्या-माझ्यासारखीच असतात, नव्हे काय? ती काही मुळातच "बघतोच तुमचे काम कसे होते ते!' अशा मानसिकतेची नसतात.

माझा सरकारी यंत्रणांचा अनुभव खूप चांगला आहे. सगळे सरकारी यंत्रणेला नावे ठेवतात, म्हणून आपण मुद्दाम वेगळाच सूर लावायचा म्हणून मी म्हणत नाही. आपण एक माणूस म्हणून त्या यंत्रणेशी संवाद साधला, तर ती आपल्याला तितक्‍याच चांगल्या भावनेने प्रतिसाद देतात, असा माझा अनुभव आहे. आता अडवणूक करणारी माणसे सगळ्याच क्षेत्रांत असतात. त्यात सरकारी यंत्रणांचे विशेष ते काय? सरकारी यंत्रणांकडे बघण्याचा आपला ग्रहच पूर्वग्रहदूषित असतो. कदाचित एकेकाळी तशी परिस्थिती असेलही. पण आज खूप बदल होतो आहे. सरकारी कार्यालये आज कशी चकाचक असतात. केबिन, संगणक, सौजन्यशील वागणूक... एकदा मी असाच एका सरकारी कार्यालयात गेलो होतो. माझे काम झटपट झाले. न राहवून मी त्या साहेबांना म्हटले, "सर, तुमचे ऑफिस खूप एफिशियंट आहे हो!' खरंच सांगतो, मध्यमवयीन साहेब चक्क लाजले आणि त्यांच्या चेहऱ्यावर एखाद्या लहान मुलासारखे हसू फुटले.

एसटी हा माझ्यासाठी आजही नवलाचा विषय आहे. अगदी एखाद्या आडगावाला जाणारी एसटी रोज, तिच्या अमूक नंबरच्या फलाटावर वेळेवर बरोबर हजर असते आणि एसटी बसही तशा तंदुरुस्त असतात. म्हणजे आसने किंवा खिडक्‍या कधीकधी बरोबर नसतात, पण त्या तुम्हाला इच्छित स्थळी नक्की पोचवतात. मग गाडी फुल असो का दोनच प्रवासी असोत. काही प्रॉब्लेम आला तर मागून येणाऱ्या एसटीतून तुम्हाला हक्काने जाता येते. तीच गोष्ट रेल्वेची. आजकाल रेल्वेने प्रवास करणे खूपच सुखावह झाले आहे, हे कोणीही मान्य करेल.
तुम्हाला वाटेल की सरकारी सेवांची फारच तरफदारी करतो आहे. खासगी क्षेत्र सरकारी क्षेत्राच्या तुलनेत ग्राहकाभिमुख व कार्यक्षम असते हे मान्य केले पाहिजे. पण हा विषय खूप मोठा आहे. कुठल्या गोष्टी सरकारी क्षेत्राने कराव्यात आणि कुठल्या खासगी क्षेत्राने, यावर प्रतिपादन करण्याची माझी प्राज्ञा नाही. पण गाव करील ते राव काय करील, हे तर खरे आहे ना?

Web Title: parimal : private and government