Parimal_Sahastrabuddhe
Parimal_Sahastrabuddhe

ढाई अक्षर प्रेम के... (परिमळ)

प्रेम... खरे म्हणजे या विषयावर इतक्‍या जणांनी इतके भरभरून लिहिले आहे, मी अजून काय लिहिणार? पण असे वाटले की प्रेम याविषयी आपणही काही लिहावे. प्रेमाचा वर्षाव आणि द्वेषाचा वणवा हे दोन्ही अनुभव मी घेतले आहेत. प्रेम या संकल्पनेवर माझे अतिशय प्रेम आहे. प्रेमाविना आयुष्य ही कल्पनाच असह्य आहे. प्रेम ही भावना शब्दांमध्ये बद्ध करणे किंवा त्याची व्याख्या करणे फार अवघड आहे. प्रेम म्हणजे माया, ममता, आपुलकी, आकर्षण, कळकळ, मैत्रभाव, भक्ती, आवडणे, दया, लैंगिक इच्छा, प्रिय असणे, वात्सल्य, ध्यास, निष्ठा... अजून डझनभर शब्द शोधता येतील. ज्या गोष्टीची व्याख्या करणे अवघड असते, तिच्या बाबतीत एक उपाय असतो. त्या गोष्टीच्या विरुद्ध गोष्टीचा अभाव - अशी व्याख्या करायची. म्हणजे द्वेषाचा अभाव म्हणजे प्रेम अशी प्रेमाची व्याख्या करायची. पण व्याख्या करण्याची एवढी धडपड करायचीच कशाला? ज्या प्रमाणे सुगंध लपत नाही, तसाच प्रेमाची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही.


प्रेम आणि वेड किंवा भ्रम - या संकल्पना अनेकदा जोडीने येतात. खरे म्हणजे वेड या शब्दाला निश्‍चितपणे वेगळा अर्थ आहे. पण मग कुणा प्रेमिकाने, "जे वेड मज लागले, तुजलाही ते लागेल का?' अशी पृच्छा का बरे केली असती? "ए री मैं तो प्रेमदिवानी, मेरा दर्द ना जाणे कोय...' असे आर्त उद्गार मीरेच्या ओठांवर का आले असते? जसे प्रेम आणि वेड यांचे जवळचे नाते आहे, तसेच प्रेम आणि दर्द - वेदना यांचेही. असे तर नसेल, की प्रेमाची पराकाष्ठा प्रेयसाच्या - (प्रेयसी नव्हे, प्रेयस म्हणजे प्रिय वस्तू) प्राप्तीत झाली नाही, तर वेडाचा आणि वेदनेचा जन्म होतो. हा विरोधाभास म्हणायचा की अजून काही? कसेही असले तरी आयुष्यातून प्रेम ही गोष्ट वजा व्हावी, असे कोणीही म्हणणार नाही. प्रेमाविना जीवन अर्थविहीन असते. ते प्रेयसाच्या ध्यासामुळे अर्थपूर्ण होते.
प्रेम करणे हा प्रेयसाच्या प्राप्तीसाठी केलेला प्रवास असतो. हा प्रवास संघर्षपूर्ण आणि म्हणूनच रोचक असतो. प्रेयसाच्या प्राप्तीबरोबरच हा संघर्ष संपतो आणि आत्मसंतुष्टतेची अवस्था येते. अस्वस्थ करणारी असोशी लुप्त होते. इथे प्रेम ही संकल्पना केवळ स्त्री-पुरुष नातेसंबंध इतक्‍या मर्यादित अर्थाने नव्हे, तर व्यापक अर्थाने अभिप्रेत आहे. प्रेयसाची प्राप्ती हे आव्हान असते. अशा आव्हानांचा सामना पुन्हा पुन्हा केल्याने आयुष्य रोचक होते. म्हणूनच सिंदबाद पुन्हा पुन्हा सागरसफरीवर जातो. भ्रम आणि ज्ञान, दर्द आणि खुशी ही ऊन-पावसासारखी एकामागून एक अशी येतात आणि जातात. जगण्याचे गाणे होऊन जाते. म्हणूनच की काय कबीरासारख्या तत्त्वज्ञानेही "ढाई अक्षर प्रेम के, पढा वो पंडित होय...' असे म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com