

हंगेरीमध्ये 'हुकूमशाही'ला सुरुंग! १६ वर्षांच्या अखंड सत्तेचा अंत; पीटर माग्यार यांच्या 'तिसा' पक्षाचा ऐतिहासिक विजय
Sakal
प्रज्ञा शिदोरे
डॅन्यूबच्या काठावर थंड वाऱ्यात, फडफडणाऱ्या झेंड्यांच्या पार्श्वभूमीवर एकच शब्द हवेत घुमत होता ‘आत्ता’! (NOW!). हे केवळ घोषवाक्य नाही; तर ते एका थकलेल्या लोकशाहीला पुन्हा गवसलेला श्वास होता. १६ वर्षांच्या अखंड सत्तेनंतर व्हिक्टर ओर्बान यांची राजवट कोसळली, आणि पीटर माग्यार यांच्या नेतृत्वाखाली हंगेरीने एक अनपेक्षित वळण घेतले. माग्यार यांचा तिसा पक्ष १९९ पैकी १३८ जागा जिंकला. पण ही केवळ निवडणुकीची कथा नाही; ही त्या समाजाची कहाणी आहे, ज्याने भीती आणि दडपशाहीच्या पलीकडे जाऊन स्वतःचा आवाज पुन्हा शोधला. हंगेरीच्या राजकारणात २०२६ ची निवडणूक ही फक्त सत्तांतराची घटना नाही; ती एका दीर्घकाळ उभ्या राहिलेल्या व्यवस्थेला दिलेला सामाजिक प्रतिसाद आहे.