बहुभाषिकतेने बालकांचा सर्वांगीण विकास

प्रदीपकुमार माने
शुक्रवार, 20 ऑक्टोबर 2017

एकापेक्षा जास्त भाषांतून शिकविल्यामुळं बालकांचा सर्वच पातळ्यांवर विकास झालेला दिसून येतो. फक्त बौद्धिक पातळीवरच नव्हे, तर भावनिक, सामाजिक पातळीवरही. जगभरातील संशोधनातून ही बाब समोर आली आहे

कुठल्याही शाळेत जा. प्रत्येक ठिकाणी लहान मुलांच्या शाळेत "ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार', "जॉनी जॉनी येस पापा' किंवा "लकडी की काठी' यासारखी बडबडगीते ऐकायला मिळतात. मराठी भाषक असलेली लहान मुलंही मराठी बडबडगीतांबरोबरच इंग्रजी, हिंदी बडबडगीते म्हणत मोठी होत असतात. लहान मुलं शिशुगटात असतात तोपर्यंत मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही भाषांमधून आनंदानं बडबडगीते म्हणत असतात. पण ती जशीजशी मोठी होऊ लागतात, तसा आपल्यासमोर एक गंभीर प्रश्‍न निर्माण होऊ लागतो. या लहानग्यांना कुठल्या भाषेच्या माध्यमाच्या शाळेत घालायचं? मराठी माध्यमाच्या, इंग्रजी माध्यमाच्या की निममराठी इंग्रजी माध्यमात? या प्रश्‍नाचं उत्तर देणं वरवर सोपं वाटत असलं, तरी तसं ते नाही. भारत हा बहुभाषिक देश असल्यामुळं तर या प्रश्‍नाचं उत्तर अजूनच गुंतागुंतीचं बनतं. आर्थिक स्थिती, सांस्कृतिक अस्मिता इथपासून ते फॅशन यापर्यंत विविध गोष्टी बालकाचं भाषेचं माध्यम ठरवायला कारणीभूत ठरतात. पण जसजसा काळ पुढं जाऊ लागलाय, तसतसं आपल्या लक्षात येतंय की भाषा ही बालकांच्या संवादाचं माध्यमच नव्हे, तर त्याहीपुढं जाऊन बरंच काही आहे. भाषेचं माध्यम लहानग्यांसाठी फक्त संवादाचाच दर्जा ठरवत नाही, तर ते त्यांच्या वैचारिक विश्‍वाला समृद्ध करणारं एक साधन आहे. भावनिक विश्‍वाचं पोषण करणारी ती एक अभिव्यक्ती असते. त्यामुळे त्याविषयीचं शास्त्रीय विश्‍वात असणारं आकलन आणि त्याआधारे आवश्‍यक कृती एक महत्त्वपूर्ण गोष्ट बनत आहे. सध्या होणारं संशोधनही दिशादर्शक आहे. बहुभाषिकतेच्या बालकांच्या विश्‍वातील संशोधनाची ओळख या लेखात करून दिली आहे.

लहानग्यांना एका भाषेत शिकवावं की अनेक? हा शिक्षकांप्रमाणेच बालमानसशास्त्रज्ञांना पडलेला महत्त्वाचा प्रश्‍न आहे. सध्याच्या संशोधनाचा विचार करता या प्रश्‍नाचं उत्तर ठामपणं देणं शक्‍य आहे. हा प्रश्‍न विविध पैलूंना स्पर्श करीत असला तरी वैज्ञानिकांचे याविषयीचे निष्कर्ष खूपच बोलके आहेत. हे निष्कर्ष असं सांगतात की एकापेक्षा जास्त भाषेत शिकविणं हे कधीही एका भाषेत शिकविण्यापेक्षा लहानग्यांना जास्त समृद्ध करतं. याचा अर्थ असा नाही की लहानग्यांना त्यांच्या मातृभाषेत किंवा एकाच भाषेत शिकवू नये. मातृभाषेतून शिकविणं त्यांच्या विकासासाठी पोषक असतंच. कारण ती त्यांच्या जवळची भाषा असते. त्यांचे आई-वडील तीच भाषा बोलत असतात. बहुतांश समाजही त्याच भाषेत बोलत असतो. त्यामुळे मातृभाषा बालकांच्या विकासात सर्वात प्रेरक असते यात शंकाच नाही. संशोधकसुद्धा या सर्व गोष्टी नैसर्गिकपणे मान्य करतात. प्रश्‍न मातृभाषेतून का, हा नाही तर मातृभाषेबरोबर इतर भाषा शिकवाव्यात की नाही याचा आहे. जगभरातलं संशोधन हे सांगतं की एकापेक्षा जास्त भाषांतून शिकविल्यामुळं बालकांचा सर्वच पातळ्यांवर विकास झालेला दिसून येतो. फक्त बौद्धिक पातळीवरच नव्हे, तर भावनिक, सामाजिक पातळीवरही. एवढेच नव्हे तर सद्यःस्थितीचं संशोधन असंही सांगतं की व्यक्तिमत्त्व घडविण्यातही भाषेची महत्त्वपूर्ण भूमिका असते. हंगेरीतील सेंट्रल युरोपियन युनिव्हर्सिटीतील ऍग्नेस कोव्हक्‍स आणि इटलीतील इंटरनॅशनल स्कूल ऑफ ऍडव्हान्स स्टडीजमधील जॅक्‍स मेहलर या संशोधकांनी केलेला प्रयोग पाहा. या संशोधकांनी एकभाषिक आणि द्विभाषिक भाषेचा परिचय असलेल्या सात महिन्यांच्या बालकांवर प्रयोग केला. ठराविक आवाज केल्यानंतर संगणकाच्या स्क्रीनवर ठराविक ठिकाणी बाहुली येते या क्रमासाठी त्यांना प्रशिक्षित केले. प्रत्येक वेळी तसा क्रम दाखवून स्क्रीनवर कुठे बाहुली येईल याचा अंदाज त्यांनी बालकांच्या नजरेच्या कटाक्षावरून रेकॉर्ड केला. एकभाषिक आणि द्विभाषिक भाषा समजणाऱ्या बालकांनी या क्रमाला अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद दिला. आता त्यांनी या पारंपरिक क्रम बदलून अनपेक्षित क्रम दाखवायला सुरवात केली. आश्‍चर्य म्हणजे तरीही एकभाषिक बालके ठरलेल्या ठिकाणीच बाहुलीची वाट बघत राहिली, तर द्विभाषिक बालकांनी ठराविक ठिकाणी बाहुली न आल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी पाहायला सुरवात केली. यावरून लक्षात येतं की बहुभाषिकता फक्त दुसरी भाषा ऐकण्याची आणि बोलण्याचीच क्षमता प्रदान करीत नाही, तर आकलनातील लवचिकपणाही वाढविते. इस्राईलमधील बार-ईलान विद्यापीठातील ईस्थर आदी जाफा या संशोधकाच्या गटाने केलेला प्रयोग असे दर्शवितो, की बहुभाषिकत्व वैचारिक आकलनाबरोबर सर्जनक्षमताही वाढवितं. या प्रयोगात त्यांनी एकभाषिक आणि द्विभाषिक बालकांना काल्पनिक फुलं किंवा काल्पनिक घरं काढायला सांगितली. एकभाषिक बालकांपेक्षा द्विभाषिक बालकांनी काढलेली चित्रं जास्त सर्जनात्मक होती. एकभाषिक बालकांनी पाकळ्या नसलेली फुलं काढली होती किंवा साध्या घराच्या रचना बदलल्या होत्या, तर द्विभाषिक बालकांनी आकाशात उडणाऱ्या पतंगासारखं फूल किंवा रोबोट आणि घर यांचा संगम असणारी कृती अशा चित्रकृती काढल्या होत्या. कॅनडातील यॉर्क विद्यापीठातील संशोधिका इलन बायली स्टॉक यांनीही या विषयावर महत्त्वपूर्ण काम केले आहे. त्यांचं संशोधन असं सांगतं की बहुभाषिकतेमुळे मेंदूच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेतील लवचिकपणा वाढतो. त्यामुळे अचानक उद्‌भवणाऱ्या परिस्थितीतही द्विभाषिक बालके एकभाषिक बालकांपेक्षा वरचढ ठरतात. वॉशिंग्टनमधील संशोधिका लॉरा पेटीटो यांना "द्विभाषिकत्व हे मानवी मेंदूचा शोध घेणारी सूक्ष्मदर्शिका आहे,' असं वाटतं. पेटीटो, बायलिस्टॉक, ऍग्नेस कोव्हॅक्‍स आणि जगभरातील कित्येक मानसशास्त्रज्ञांचं आणि मेंदूशास्त्रज्ञांचं संशोधन द्विभाषिकता, बहुभाषिकता यांचा बालमनावर होणारा परिणाम यांचं रहस्य उलगडत आहे. या सर्वांवरून असं म्हणता येतं की लहानग्यांना मातृभाषेत तर शिकवावंच, पण त्याबरोबरच इतर भाषांचीही जोड द्यावी. कारण भाषा फक्त शब्दच घेऊन येत नाही, तर ती नवे विचार, कल्पना आणि नवं विश्‍व घेऊन येत असते.

Web Title: pradeepkumar mane writes about children and languages