‘संवाद’कुशल ‘कोको’ची कहाणी

प्रदीपकुमार माने
शनिवार, 30 जून 2018

माणसांशी ‘संवाद’ साधलेल्या ‘कोको’ या सेलिब्रिटी गोरिलाचा नुकताच मृत्यू झाला. ‘कोको’च्या संवादक्षमतेमुळं गोरिलांच्या आंतरिक विश्‍वात डोकावणं विज्ञानजगताला शक्‍य झालं. ‘कोको’मध्ये मानवासारखं व्यक्तिमत्त्व दडलं होतं काय, यावर वाद असला तरी तिच्यावरचं संशोधन महत्त्वपूर्ण आहे.

माणसांशी ‘संवाद’ साधलेल्या ‘कोको’ या सेलिब्रिटी गोरिलाचा नुकताच मृत्यू झाला. ‘कोको’च्या संवादक्षमतेमुळं गोरिलांच्या आंतरिक विश्‍वात डोकावणं विज्ञानजगताला शक्‍य झालं. ‘कोको’मध्ये मानवासारखं व्यक्तिमत्त्व दडलं होतं काय, यावर वाद असला तरी तिच्यावरचं संशोधन महत्त्वपूर्ण आहे.

अ लीकडेच ‘कोको’ नावाच्या गोरिलाचा मृत्यू झाला. ‘कोको’ ही काही साधासुधी गोरिला नव्हती. ती पृथ्वीवरची अशी पहिली गोरिला होती, जिनं मानवाशी ‘संवाद’ साधला होता अन्‌ हा संवादही थोडा थोडका नाही तर ३६ वर्षांचा होता. ‘कोको’चा हा संवाद इतका महत्त्वपूर्ण होता, की त्यामुळं प्राण्यांच्या मनात डोकावून त्यांचं आंतरिक विश्‍व समजून घेण्यास मोठी मदत झाली. त्यामुळेच ती गेल्यानंतर जगभरातल्या नावाजलेल्या वृत्तपत्रांनी आणि नियतकालिकांनी तिच्यावर लेख लिहिले.

फ्रान्सिस पॅटरसन या संशोधिकेच्या अथक प्रयत्नांमुळे ‘कोको’चं आंतरिक विश्‍व समजू शकलं. ‘कोको’ एक वर्षांची असल्यापासून पॅटरसन तिला बोलतं करण्याचा प्रयत्न करीत होत्या. या दोघींच्या ‘संवादा’तून जगाला जे काही कळालं ते महत्त्वपूर्ण ठरलं. पॅटरसनच्या संशोधनातून सिद्ध झालं, की गोरिला हे चिम्पांझीइतकेच बुद्धिमान असतात. ते फक्त भावनिक जीव नाहीत, तर ते चांगल्या पद्धतीनं विचारही करू शकतात. पटणार नाही; पण ‘कोको’ला इंग्रजीतले दोन हजार शब्द कळायचे आणि एक हजार वेगवेगळ्या संकेतांद्वारे ती ते व्यक्त करू शकत होती. सांकेतिक भाषेद्वारे आपले विचार व्यक्त करण्याच्या तिच्या कौशल्यामुळे समजलं, की ती विचारच करते, असं नाही तर ती खोटंही बोलू शकते, भावना व्यक्त करू शकते आणि प्रश्‍नही विचारू शकते. एवढंच नव्हे तर तिनं अनेकदा ‘यू-ट्यूब’वर लोकांशी विविध विषयांवर ‘संवाद’ साधला. या सर्व गोष्टींमुळं ती इतकी प्रसिद्ध झाली, की ‘नॅशनल जिऑग्राफिक’सारख्या मासिकाच्या मुखपृष्ठावर ती झळकली. विविध आंतरराष्ट्रीय वाहिन्यांनी तिच्यावर माहितीपट बनविले. मायकल क्रिच्टन या प्रसिद्ध विज्ञान कादंबरीकाराने लिहिलेली ‘कांगो’ ही कादंबरी तिच्यावरूनच प्रेरित आहे. एवढेच नव्हे तर रॉबिन विल्यम्स, लिओनार्दो डिक्रॅप्रिओसारख्या अभिनेत्यांनी तिला भेटून तिच्याशी ‘संवाद’ साधला आहे. एकंदरीत पाहता ‘कोको’चा मृत्यू हा प्राण्यांतील एका सेलिब्रिटीचा मृत्यू आहे.

‘कोको’ ही प्राणिजगतातील सेलिब्रिटी कशी झाली, हे जाणून घेणं मनोरंजक आहे. तिची ही कहाणी तिला उजेडात आणणाऱ्या फ्रान्सिस पॅटरसनबरोबर जोडली गेलेली आहे. पॅटरसन या शिकत असताना त्यांना १९७१ मध्ये बिटाईस गार्डनर यांचं ‘वाशू’ नावाच्या चिम्पांझीला भाषा शिकविण्याच्या प्रयत्नांविषयीचं व्याख्यान ऐकायला मिळालं आणि त्यांचं जीवन बदलून गेलं. चिम्पांझीसारख्या जिवाला मानवी भाषा शिकविण्याचे प्रयत्न निष्फळ आहेत, हे तोपर्यंत समजलं होतं. गार्डनर, प्रिमॅक आणि रामबाग या शास्त्रज्ञत्रयीमुळे अशा संशोधनाला योग्य दिशा मिळू लागली होती. चिम्पांझीला मानवी बोलीभाषा न शिकविता मूकबधिरांना शिकवितात तशी ‘साइन लॅंग्वेज’ शिकविली, तर त्यांच्याशी आपण चांगल्या प्रकारे ‘संवाद’ साधू शकतो, हे गार्डनर यांनी ‘वाशू’ चिम्पांझीच्या प्रयत्नांतून सिद्ध करून दाखविलं होतं. भाषा आणि बुद्धिमत्ता यांचं समीकरण चिम्पांझीसारख्या जिवाला मानवाप्रमाणे लागू करणं चुकीचं ठरलं होतं. याचं कारण चिम्पांझीच्या गळ्याची रचना माणसासारखी बोलण्यासाठी झालेली नाही. असं असेल तर त्यांना आपल्यासारखं बोलायला लावण्यात काहीही अर्थ नव्हता. गार्डनर यांचा हाच धागा पकडून पॅटरसन यांनी चिम्पांझीवर संशोधन करायचं ठरविलं. पण योगायोगानं एकदा त्यांना सॅनफ्रान्सिस्को प्राणिसंग्रहालयात ‘कोको’ दिसली. ‘कोको’च्या आधी कुठल्याच गोरिलावर असं संशोधन झालं नव्हतं. त्या वेळी गोरिला हे चिम्पांझीपेक्षा मंद समजले जायचे. त्यांच्या भव्य आकारमानामुळे ते भीतिदायकही समजले जात. तरीही एक वर्षाच्या ‘कोको’ला त्यांनी अमेरिकेत मूक-बधिरांना शिकविली जाणारी ‘अमेरिकन साइन लॅंग्वेज’ शिकवायला सुरवात केली. सुरवातीला ‘कोको’ची ‘साईन लॅंग्वेज’ शिकण्याची गती महिन्याला एकच ‘साईन’ इतकीच होती. चौथ्या वर्षांपर्यंत ती ९५ ‘साईन्स’ शिकली. असे करत ती एक हजार ‘साईन्स’पर्यंत पोचली. याव्यतिरिक्त ती दोन हजार इंग्रजी शब्द शिकली. हे शब्द तिला बोलता येत नसले, तरी ते तिला समजत होते. एका अर्थानं ती ‘संवाद’कुशल होत गेली.

ती वापरत असलेल्या ‘साईन्स’ पाहिल्यावर तिच्या ‘संवाद’क्षमतेचा अंदाज येतो. विविध वस्तूंना किंवा कृतींना ती ‘अमेरिकन साईन लॅंग्वेज’मधले शब्द वापरत असे. नंतर ती ३ ते ६ ‘साईन्स’चे मिळून वाक्‍यही बनवायला शिकली. झेब्रयाला ती ‘व्हाइट टायगर’, तर आइस्क्रीमला ‘माय कोल्ड कप’ म्हणत असे. तिच्या या वाढत जाणाऱ्या ‘संवाद’क्षमतेमुळं ‘नॅशनल जिऑग्राफिक’ने ‘गोरिलाशी संवाद’ हा विशेष लेख प्रसिद्ध केला आणि मुखपृष्ठावर ती कॅमेऱ्यानं स्वतःचा फोटो काढतेय असा फोटो छापला. यामुळं ती जगभरात प्रसिद्धीस आली. तिला कपाटात ठेवलेले पदार्थ खायचे असले तर ती ‘यू की देअर मी कुफी’ अशा अर्थाच्या ‘साईन्स’ वापरी. तिची भाषा व्याकरणदृष्ट्या चुकीची असली, तरी त्यातून तिला काय पाहिजे ते समजत असे. तिला पॅटरसननं ‘तुला कुठली गोष्ट सर्वांत मजेशीर वाटते,’ असा प्रश्‍न विचारल्यावर तिनं ‘माझं नाक’ असं उत्तर दिलं होतं. एकदा ‘कोको’ला ॲलिगेटर या मगरीसारख्या प्राण्याला स्क्रीनवर दाखवून ती ‘साईन’ शिकविली होती. तिला ॲलिगेटरचे चित्र दाखविल्यावर ती ‘साईन’ करून दाखवी. ‘भीती’ या शब्दालाही कधी कधी ती ॲलिगेटरचे ‘साईन’ दाखवी. एकदा तर तिने गंमतच केली. पॅटरसनची सहायक सिंडी ब्रेकफास्ट तयार असतानाही तिला द्यायला उशीर करत होती. ‘कोको’ला तर भूक लागली होती. तिनं सिंडीला ‘साईन्स’ करून दाखविलं, की ‘लवकर आवर आणि ब्रेकफ्रास्ट दे, नाहीतर ॲलिगेटर येऊन आपल्याला खाईल.’ सुरवातीला सिंडीला समजलं नाही, पण तिला समजलं तेव्हा तिला हसू फुटलं आणि ‘कोको’च्या बुद्धीचं आश्‍चर्य वाटलं. ‘कोको’च्या या संवादक्षमतेमुळं गोरिलाच्या आंतरिक विश्‍वामध्ये डोकावणे शास्त्रीयजगतास शक्‍य झाले. गोरिला हे चिम्पांझीइतकेच बुद्धिमान असतात, ही गोष्ट त्यामुळे कळाली. आरशामधलं प्रतिबिंब दाखवून प्राण्यांमधली स्वजाणीव तपासणारी ‘मिरर टेस्ट’ ती उत्तीर्ण झाली. इतकंच नव्हे तर गोरिला कसा विचार करतो, त्याचं भावनिक विश्‍व कसं असतं या गोष्टींही त्यामुळे समजू शकल्या. त्यांना भूतकाळ, भविष्यकाळाची जाणीव असते, हेही समजू शकले. ‘कोको’च्या या संशोधनाच्या योगदानाचा विचार करता, संशोधक रॉबिन्स बर्लिंग यांनी आपल्या ‘द टॉकिंग एप’ या पुस्तकात मांडलेले विचार पटतात. बर्लिंग म्हणतात, की आपण मानवी भाषेचा जितका अभ्यास करत जाऊ, तसं आपल्या लक्षात येतं, की आपल्यामध्येही चिम्पांझी, गोरिलासारखा बोलणारा कपी (Ape) दडला आहे अन्‌ यातच मानवी उत्क्रांती दडलेली आहे. ‘कोको’मध्ये मानवासारखं व्यक्तिमत्त्व दडलंय काय या उत्तरावर वाद असला तरी तिच्यावरचं संशोधन महत्त्वपूर्ण आहे. ‘कोको’ला एकदा पत्रकारानं प्रश्‍न विचारला होता, ‘‘कोको काय आहे? प्राणी की व्यक्ती?’’ त्यावर ‘कोको’नं उत्तर दिलं होतं, ‘एक सुंदर प्राणी.’

Web Title: pradipkumar mane write article in editorial