गांधीलमाशीचे विज्ञानजगतातील योगदान

प्रदीपकुमार माने
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

राघवेंद्र गडगकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या संशोधनातून गांधीलमाशीच्या जीवनात सामाजिकता कशी विकसित होते, यावर प्रकाश पडला आहे.

राघवेंद्र गडगकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या संशोधनातून गांधीलमाशीच्या जीवनात सामाजिकता कशी विकसित होते, यावर प्रकाश पडला आहे.

ज र्मन भाषेत एक म्हण आहे, ‘ईश्‍वराने मधमाशी निर्मिली, तर सैतानाने गांधीलमाशी.’ मधमाशी आणि गांधीलमाशी म्हणायचा अवकाश अन्‌ आपल्या डोळ्यांसमोर वेगवेगळ्या प्रतिमा उभ्या राहतात. मधमाशी सतत कष्ट करणारी जीव वाटते, तर गांधीलमाशी म्हणजे चावून हैराण करणारा जीव वाटतो. गांधीलमाशीचा चावा नको वाटत असल्यामुळे ती दिसताक्षणीच आपण तिच्यापासून पळ काढतो. पण या जगात काही लोक असे आहेत, की ते तिच्यापासून पळायचे तर दूरच, पण तेच तिच्याच मागे पळतात. राघवेंद्र गडगकर हे त्यातले एक नाव. बंगळूरच्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’मध्ये काम करणारे हे प्राध्यापक जगातील गांधीलमाशीविषयक तज्ज्ञांपैकी एक आहेत. अलीकडेच त्यांनी केलेले महत्त्वपूर्ण संशोधन ‘प्रोसिडिंग्ज ऑफ नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्सेस’ या पत्रिकेत प्रसिद्ध झाले आहे. गडगकर आणि त्यांचे विद्यार्थी सौविक मांडल आणि अनिंदिता ब्रह्मा यांनी हे संशोधन केले आहे. त्यांच्या या संशोधनाने गांधीलमाशीच्या, विशेषतः सामाजिक कीटकांच्या जीवनावर प्रकाश पडला आहे. ‘रोपलिया मार्जिनाटा’ या कागदी घरे बनविणाऱ्या गांधीलमाशीच्या जीवनावरील हे संशोधन आहे. गांधीलमाशीच्या जीवनात सामाजिकता कशी विकसित होते, हे या महत्त्वपूर्ण अभ्यासामुळे विज्ञानजगताला समजू शकले आहे. या प्रयोगाच्या साह्याने आजपर्यंत माहीत असलेल्या सैद्धांतिक निष्कर्षास प्रायोगिक पातळीवरील यश मिळाले आहे.

गांधीलमाशी ही मधमाशी आणि मुंग्याप्रमाणे सामाजिक कीटकांच्या गटात मोडते असे असले, तरी तिचा जगभरात मुंगी किंवा मधमाशीइतका अभ्यास झालेला नाही. सामाजिक कीटकांचाच विचार केला, तर गांधीलमाशी हे सामाजिक कीटकांचा उत्क्रांतीचा प्रवास शोधण्यासाठी महत्त्वपूर्ण साधन आहे. याचे कारण म्हणजे गांधीलमाशांमध्ये एकट्या राहणाऱ्या आणि सामाजिक जीवन व्यतीत करणाऱ्याही गांधीलमाशा आढळतात. त्यामुळे त्यांचा तुलनात्मक अभ्यास करून सामाजिकतेच्या उक्रांतीविषयीचे निष्कर्ष काढणे शक्‍य होते. ‘रोपालिया मार्जिनाटा’ या गांधीलमाशीच्या अभ्यासाने या संशोधकत्रयीने हेच करण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी त्यांनी अनोखे प्रयोग केले. या प्रयोगात त्यांनी अनुक्रमे एक, दोन आणि तीन गांधीलमाशा घेऊन त्यांच्यामध्ये सामाजिकता कशी व कधी उगम पावते, हे शोधण्याचा प्रयत्न केला. गांधीलमाशी एकच असते, तेव्हा अंडी घालायची, कागदी घरे बांधायची, अन्न गोळा करायची कामे ती एकटीच करते. अंड्यामधून पुढची पिढी निर्माण होत नाही तोपर्यंत ती ही कामे करत राहते. पुढची पिढी आल्यानंतर कामाची विभागणी होते आणि काही गांधीलमाशा घर सांभाळतात, तर काही अन्न शोधण्याचे काम करू लागतात. एकच गांधीलमाशी असते तेव्हा कुणी अंडी घालायची हा प्रश्‍नच उद्‌भवत नाही; पण दोन गांधीलमाशा एकत्र असतात, तेव्हा दोघीपैकी कुणी अंडी घालायची हा प्रश्‍न निर्माण होतो. या वेळी गडगकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दिसून आले, की या दोन्हींमधील जी माशी जास्त प्रभावशाली आहे, तिलाच ही संधी मिळते. या दोन माशांमध्ये एकमेकांना चावणे, ढकलणे, पाठलाग करणे यांद्वारे शक्तिप्रदर्शन होते आणि यात जी यशस्वी ठरते ती राणी बनून अंडी घालण्यास सुरवात करते. हरलेली माशी प्रजोत्पादनाव्यतिरिक्त इतर कामे करू लागते. दोन गांधीलमाशा असतात तेव्हा राणी कोण होणार, यावरून संघर्ष होतो; पण तीन गांधीलमाशा एकत्र असतात तेव्हा सामाजिक कीटकांत असणारी खरी सामाजिकता दिसू लागते. यामध्ये कुणी काय करायचे, याचीही विभागणी होऊ लागते. जास्त प्रभावशाली गांधीलमाशी राणी बनते. आता राहिलेल्या दोन गांधीलमाश्‍यांत कुणी काय काम करायचे हे कसे ठरणार? याबाबतीतही राहिलेल्या दोन गांधीलमाश्‍यांत संघर्ष होऊन त्यातली प्रभावशाली माशी कागदाचे पोळे बांधणे आणि अंड्यांची देखभाल, अशी कामे करायला लागते, तर सर्वांत कमी प्रभावशाली बाहेरची कामे म्हणजेच अन्नपाणी शोधणे आणि घर बांधण्यासाठी आवश्‍यक असे साहित्य (लाकडातील सेल्युलोज) आणायचे काम करू लागते.

या तीन माशांच्या समाजात सामाजिक कीटकात असणारी कार्यविभागणी दिसून येते आणि साहिजकच आहे की त्यामुळे या गांधीलमाशीचा समाज यशस्वी समाज बनू लागतो. या प्रयोगात संशोधकांना दिसून आले, की गांधीलमाशींचा समाज जितका मोठा होत जाईल तसतसा प्रजोत्पादनाचा वेग आणि सामाजिक गुंतागुंतही वाढत जाते. गडगकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेले संशोधन सामाजिक कीटकांच्या आणि गांधीलमाशीच्या वर्तणुकीच्या अभ्यासात महत्त्वपूर्ण भर घालते. या संशोधनामागे गडगकर यांनी केलेल्या संशोधनाची पार्श्‍वभूमी आहे. पस्तीस वर्षांपेक्षा जास्त काळ ते ‘रोपालिया मार्जिनाटा’ या गांधीलमाशीच्या प्रजातीवर संशोधन करताहेत. एखाद्या प्रजातीच्या अभ्यासासाठी इतका वेळ व्यतीत करणाऱ्या संशोधकांची उदाहरणे जगभरात खूपच कमी आहेत. त्यामुळेच तर त्यांना ‘द क्रॉस ऑफ ऑर्डर ऑफ मेरीट’ हा जर्मनीतर्फे दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार मिळाला आहे.
गांधीलमाशीच्या संशोधनातील कितीतरी नावीन्यपूर्ण संशोधन त्यांच्या नावावर आहे. ‘रोपालिया मार्जिनाटा’ या प्रजातीवर लिहिलेले अभ्यासपूर्ण संशोधनात्मक पुस्तक महत्त्वपूर्ण समजले जाते. कागदी गांधीलमाशी एका ठिकाणावरून दुसरीकडे कशी स्थानांतर करते, राणीमाशीच्या मृत्यूनंतर तिच्याजागी इतर राण्या कशा जागा घेतात यावरील त्यांचे संशोधन जगन्मान्य झालेले आहे. प्रत्येक गांधीलमाशी जिवंत असेपर्यंत आपल्या पोळ्यात प्रत्येक तेवीस मिनिटाला आपल्या अस्तित्वाचा गंध (फेरोमेन) सोडत असते अन्‌ आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे सलग तीस मिनिटे हा गंध आला नाही, तर तिच्या पोळ्यातली दुसरी राणी माशी जन्म घेते अन्‌ दोन-तीन दिवसांतच पोळ्याचा ताबा घेते. ती गेल्यानंतर तिसरी, त्यानंतर चौथी. हे सगळे कसे काय होत असते, हे समजून घेण्यात गडगकर आणि त्यांचे सहकारी गढून गेले आहेत.

Web Title: pradipkumar mane write article in editorial