सारे शांत- शांत होण्यापूर्वी...

प्रकाश बुरटे
बुधवार, 24 जानेवारी 2018

अणुयुद्धाची शक्‍यता सांगून सावध करणाऱ्या व्यक्तींची ‘अलार्मिस्ट’ अशी हेटाळणी करण्यापूर्वी त्यातील तथ्य तपासून घेतले पाहिजे.

अणुयुद्धाची शक्‍यता सांगून सावध करणाऱ्या व्यक्तींची ‘अलार्मिस्ट’ अशी हेटाळणी करण्यापूर्वी त्यातील तथ्य तपासून घेतले पाहिजे.

अ र्ध्या दशकापूर्वी जागतिक संकटाच्या यादीत भारत-पाकिस्तान तणाव क्रमांक एकवर होता, तर अमेरिका-उत्तर कोरिया तणाव क्रमांक दोनवर होता. गेल्या वर्षात अमेरिका-उत्तर कोरिया यांच्यातील तणावाने पहिला क्रमांक पटकावला आहे. जग फक्त काळ्या-पांढऱ्या रंगांत पाहणारे जॉर्ज बुश २००१ ते २००८ या काळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांनी २००२ मध्ये उत्तर कोरिया, इराण आणि इराक ही राष्ट्रे महाविध्वंसक अस्त्रांची निर्मिती करत असल्याचा ‘शोध’ लावला आणि या राष्ट्रांचा उल्लेख ‘सैतानांची युती’ असा केला. त्यांनी इराकविरुद्ध युद्ध पुकारले. दीर्घ काळाने अमेरिकेने इराकवर विजय मिळविला आणि मानवी अधिकारांची पायमल्ली केल्याच्या आरोपावरून सद्दाम हुसेन यांना डिसेंबर २००६मध्ये फाशी दिले. या काळात उत्तर कोरियाने अण्वस्त्र कार्यक्रमाबाबत उलट-सुलट भूमिका घेतल्या. शेवटी मात्र उत्तर कोरियाने अण्वस्त्रप्रसारबंदी कराराचे सभासदत्व २००३मध्ये मागे घेतले आणि खुलेआम अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्र निर्मितीचे कार्यक्रम हाती घेतले. बुश यांनी सुरू केलेली इराक व अफगाणिस्तानमधील युद्धे त्यांच्यानंतर बराक ओबामांच्या आठ वर्षे कारकिर्दीलाही पुरून उरली. अमेरिकेत राष्ट्रपतिपदासाठी डिसेंबर २०१६मध्ये पुन्हा निवडणुका झाल्या. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प निवडणूक प्रचाराच्या दरम्यान अनेक क्षेत्रांशी संबंधित बेताल विधाने करत सुटले होते. तरीही सगळ्यांचे अंदाज चुकवत ट्रम्प विजयी झाले आणि त्यांनी जानेवारी २०१७मध्ये राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. दरम्यान, इराणचाही अण्वस्त्र कार्यक्रम गुंडाळला गेल्यात जमा होता. ‘तीन सैतानां’पैकी आता फक्त उत्तर कोरिया उरला.

उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा राष्ट्राध्यक्ष म्हणून किम जोंग-उन २०११मध्ये सत्तारूढ झाले. त्यांनी २०१३ ते २०१६या काळात अण्वस्त्रांच्या चार चाचण्या केल्या. त्यात एक चाचणी अणुबाँबपेक्षा कित्येक पट शक्तिशाली हायड्रोजन बाँबची होती. उत्तर कोरियाकडे सध्या मोजक्‍या हैड्रोजन बाँबसह एकूण ३० ते ६०च्या दरम्यान अण्वस्त्रे असावीत, असा आंतरराष्ट्रीय कयास आहे. शिवाय, दक्षिण अमेरिका आणि अंटार्क्‍टिका हे खंड सोडून जगात कुठेही अण्वस्त्रांचा अचूक मारा करणारी क्षेपणास्त्र व्यवस्था तयार आहे. यामुळे ट्रम्प यांचा भडका उडाला. ‘जगाने आजवर न पाहिलेला अग्निसंहार आणि क्रोधप्रलय दाखवू’, असा त्यांनी उत्तर कोरियाला दम भरला. परिणामी, जगाची सुरक्षेबाबतची स्थिती पार बदलून गेली. जगातील एकमेव अण्वस्त्र हल्ल्याची तप्त मुद्रा भाळी गोंदवून घेतलेल्या अमेरिकेला पुन्हा एकदा पहिल्या अण्वस्त्र-हल्ल्याची भाषा करावी लागली. ते जबाबदार महासत्तेला मुळीच भूषणावह नाही. उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा तर इरेला पडले आहेत. अणुयुद्ध झालेच तर उत्तर कोरियाचा दारुण पराभव ठरलेला आहे. मात्र स्वतःच्या भूमीवर कसलेही युद्ध न पाहिलेल्या अमेरिकेला काही शहरांच्या होळीची आहुती द्यावी लागेल. ते झेपणारे नाही. सैनिकी डावपेचाचा भाग म्हणून कोरियाचे महत्त्व चीन, जपान आणि रशिया या तिन्ही महासत्ता जाणतात. परिणामी, अमेरिका-उत्तर कोरिया यांच्यामध्ये अणुयुद्ध झालेच तर ते या दोन देशांपुरते मर्यादित राहील का? या तिन्ही देशांची अण्वस्त्रे युद्धात उतरतील. होय, जपान सरकारदेखील नागरिकांच्या इच्छेविरुद्ध अण्वस्त्रनिर्मितीत गुंतले असल्याचा अंदाज आहे.

उत्तर कोरियाच्या इतिहास-भूगोलात त्याच्या राज्यकर्त्यांच्या सध्याच्या वर्तनाची मुळे आहेत. जवळच्या जपानने  १९१०मध्ये कोरियावर आक्रमण करून कोरियन द्वीपकल्प जिंकले होते. दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या अखेरच्या पर्वात जपानने शरणागती पत्करली. त्या सुमारास सोव्हिएत रशिया आणि अमेरिका यांच्यातील ‘युद्धकालीन मैत्र’ संपले. कोरियावर सोव्हिएत रशियाने उत्तरेकडून, तर अमेरिकी सैन्याने दक्षिणेकडून चाल केली. कोरियाची फाळणी होऊन १९४८मध्ये दोन स्वतंत्र देश अस्तित्वात आले. तथाकथित समाजवादी उत्तर कोरियाची सत्ता देशाच्या घटनेप्रमाणे किम राजघराण्यातील व्यक्तींच्या हाती आहे. या उलट, दक्षिण कोरिया भांडवलशाही देश आहे. उत्तर कोरिया आणि चीनची सरहद्द सामाईक असल्याने उत्तर कोरियाला आपल्या पंखाखाली घेण्याचा प्रयत्न चीनने कोरियाच्या फाळणी काळात केला होता. त्यातून उत्तर आणि दक्षिण कोरिया या दोन देशांत १९५०-५३अशी तीन वर्षे तुंबळ युद्ध चालू राहिले. सोवियेत रशिया आणि अमेरिका यांनी स्वतः युद्धात प्रत्यक्ष भाग न घेता दोन कोरियन देशांना लढवत ठेवणाऱ्या छुप्या युद्धाचे आणि शस्त्रास्त्रस्पर्धेचे तंत्र विकसित केले आणि जगभर वापरले. परंतु १९९१मध्ये सोव्हिएत रशिया ढासळला. त्याचे १५ तुकडे झाले. त्यातून सावरलेला रशिया स्वतःला अजून महासत्ता समजतो. उत्तर आणि दक्षिण कोरियाचे विलीनीकरण करून त्यावर स्वतःची धोरणे लादता आली, तर स्वसंरक्षणासाठी चीनलादेखील सामुद्री निगराणी करणे सोपे होणार आहे. महासत्ता बनू पाहणारी चिनी राजवट या संकटप्रसंगी स्वतःचे महत्त्व वाढवून घेण्याची संधी दवडणार नाही. उत्तर कोरियाला एकेकाळी वसाहत बनविणाऱ्या जपानला आज त्याच्या अण्वस्त्रांचा धोका डोकेदुखी ठरली आहे. परिणामी, अमेरिकेची लहान-सहान चूक उत्तर कोरियाला अण्वस्त्रहल्ल्याला प्रवृत्त करू शकेल आणि तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटेल. अणुयुद्धात जगातील एकूण १५ हजार अण्वस्त्रांपैकी किमान २००च्या आसपास अण्वस्त्रे वापरली जातील. वाढलेले शहरीकरण, दाट वस्ती, अण्वस्त्रांची विकसित स्फोटक्षमता आणि क्षेपणास्त्रांची अचूकता यामुळे किमान दोनशे कोटी माणसे मृत्युमुखी पडतील. सध्या ट्रम्प-कारकिर्दीचा उल्लेख अमेरिकी नागरिक ‘द मॅडमॅन युग’ असा करू लागले आहेत. बेजबाबदार नेत्यांचे युग तिसरे महायुद्ध घेऊन आलेच तर ते युद्ध आणि नंतर पसरणारा आण्विक हिवाळा कदाचित पृथ्वीवरून मानवी अस्तित्व पार पुसूनदेखील टाकू शकेल. अणुयुद्धाची शक्‍यता सांगून सावध करणाऱ्या व्यक्तींना ‘अलार्मिस्ट’ हे हेटाळणीपूर्ण विशेषण लावण्यापूर्वी त्यातील तथ्य तपासून घेतले पाहिजे. कुणी सांगावे कदाचित ‘सावध! ऐका पुढल्या हाका’ या उक्ती-कृतीमुळे विध्वंसाचे येऊ घातलेले प्रसंग टळतीलदेखील. ते टाळले नाहीत तर मात्र ‘असे काही घडले होते’ हे सांगण्यासाठी कोणी माणूस शिल्लक उरणार नाही. सारे कसे शांत शांत असेल!! त्यापूर्वी ... धिटाईने थोडे बोलूया.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: prakash burte write the possibility of nuclear war article in editorial page