esakal | लोकशाहीच्या इतिहासातले दुर्मीळ व्यक्तिमत्त्व
sakal

बोलून बातमी शोधा

Narendra Modi

लोकशाहीच्या इतिहासातले दुर्मीळ व्यक्तिमत्त्व

sakal_logo
By
प्रकाश जावडेकर

गरीब, शेतकरी, मध्यमवर्गीयांचे सक्षमीकरण आणि देशाची जलद प्रगती सुनिश्चित करणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ध्येय आहे. त्यांची याच दिशेने गेली दोन दशके आधी गुजरातचे मुख्यमंत्री आणि नंतर देशाचे पंतप्रधान म्हणून वाटचाल सुरू आहे. त्यांच्या एकाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त लेख...

नरेंद्र मोदी येत्या काही दिवसांत एक विक्रम घडवतील. त्यांची गुजरात राज्यातील व केंद्रातील कारकीर्द लक्षात घेता लोकनियुक्त सरकारच्या नेतृत्वाची सलग दोन दशके ते पूर्ण करीत आहेत. ते १३ वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारताचे सात वर्षे पंतप्रधान आहेत. जनादेशाद्वारे अखंडपणे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान म्हणून सरकारचा प्रमुख बनण्याचा हा एक अनोखा विक्रम आहे. हे नशिबामुळे घडलेले नाही, तर वेगळ्या प्रकारे विचार करणाऱ्या आणि वेगळ्या पद्धतीने काम करणाऱ्या दूरदर्शी नेत्यावरील जनतेच्या विश्वासाचे हे प्रतिबिंब आहे.

अशा प्रकारे सत्ता लोक एखाद्या नेत्याच्या हाती सोपवतात, की ज्याच्याबद्दल त्यांना विश्वास वाटतो. हा नेता देशाच्या समस्या सोडवू शकेल, असा विश्वास. कुटुंबाने,घराण्याने चालवलेले सरकार लोकांनी पाहिले आहे. आता असा पंतप्रधान लाभला आहे, की जो देशाला कुटुंब मानतो. मोदी देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी अथक परिश्रम करतात. स्वार्थासाठी सत्ता राबविणाऱ्यांचा अनुभव त्यापूर्वी देशाने घेतला होता. या पार्श्वभूमीवर मोदींचे वेगळेपण उठून दिसते. त्यांचा प्रामाणिकपणा व नीतिमत्ता वाखाणण्याजोगी आहे. त्यांनी भ्रष्टाचारमुक्त सरकारचे नेतृत्व केले आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पारदर्शकता आणली. या गुणांमुळेच भारतीय नागरिकांनी त्यांना इतरांपेक्षा अधिक पसंती दिली आहे.

कोणत्याही लोकशाही नेत्यासाठी ‘जनमत’ हे सर्वांत महत्त्वाचे. जागतिक नेत्यांच्या लोकप्रियतेसंबंधी मतदान आणि सर्वेक्षणांमध्ये त्यांना नेहमीच सर्वोच्च मानांकन मिळाले आहे. मोदींकडे लोक कसे पाहतात, याचा मला वेगवेगळ्या राज्यांमध्ये प्रत्यक्ष अनुभव आला आहे. राजस्थानच्या बारमेर जिल्ह्यातील एका युवकाने मला सांगितले की, ‘आम्ही आमच्या सैनिकांचे पाकिस्तानने पाठवलेले मृतदेह पाहिले आहेत. आम्ही पहिल्यांदा पंतप्रधानांना पाहत आहोत, ज्यांनी कैदेतील वैमानिकाची ४८ तासांच्या आत मायदेशी सुरक्षित सुटका सुनिश्चित केली.’’ एका महिला शेतमजुराने मला सांगितले की, ‘‘मोदी सर्वसामान्य कुटुंबातून आले आहेत आणि गरिबी काय असते हे ते जाणतात.’ अन्न सुरक्षा कार्यक्रमाचा विस्तार केल्यामुळे मणिपूरचे मतदार खूश होते, याचे कारण तीन रुपये प्रतिकिलो दराने तांदूळ त्यांना मिळाला.

शांतता, समृद्धीची कास

मध्यमवर्गाला नेहमीच शांतता आणि समृद्धी हवी असते. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात, दिल्ली, मुंबई, अमृतसर, वाराणसी, अहमदाबाद सारख्या विविध शहरांमध्ये दहशतवाद्यांकडून बॉम्बस्फोट घडवले जात होते, गेल्या सात वर्षांपासून सुरक्षेच्या बाबतीत आमूलाग्र बदल झाला आहे. दहशतवाद आणि नक्षलवादाविरोधात कठोर कारवाई केल्यामुळे शांतता प्रस्थापित झाली आहे. उरी हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राइक आणि पुलवामा हल्ल्यानंतर बालाकोट दहशतवादी छावणीवर हवाई हल्ल्याला परवानगी देण्याच्या त्यांच्या निर्णयाने भारताविषयीची धारणा बदलली आहे. त्यांनी जगाला दाखवून दिले आहे की, ते देशहितासाठी कठोर निर्णय घेऊ शकतात. जम्मू -काश्मीरमध्ये ‘कलम ३७०’ आणि ‘३५ अ’ रद्द करण्यासाठी त्यांनी ऐतिहासिक निर्णयही घेतले आहेत. राम मंदिराबाबत शांततापूर्ण तोडगा निघेल याकडेही त्यांनी लक्ष दिले. तिहेरी तलाक प्रथा मोडीत काढण्याच्या त्यांच्या निर्णयाचे मुस्लिम महिलांनी स्वागत केले होते.

मध्यम वर्गाला पायाभूत सुविधांचा विकास आणि वाढत्या व्यवसाय संधी हव्या आहेत. राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे, अंतर्गत जलमार्ग, ग्रामीण रस्ते, ‘उडान’सारख्या योजना, मोबाईल सुविधा, स्वस्त डेटा, तत्काळ प्राप्तिकर परतावा, जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर, आयबीसी अर्थात नादारी आणि दिवाळखोरी संहिता आणि इतर अनेक व्यवसाय  सुधारणांमुळे ‘व्यवसाय सुलभता’ आली तसेच ‘जगणे सुलभ’ झाले  आहे.

राष्ट्र उभारणीची दृष्टी

राष्ट्र उभारणीची दूरदृष्टी त्यांच्याकडे आहे. ‘स्वच्छ भारत’, ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’, ‘डिजिटल इंडिया’, राष्ट्रीय सिंचन धोरण, ‘स्किल इंडिया’, हॅकेथॉन, अटल टिंकरिंग लॅब्स, टॉयकोथॉन आणि स्ट्रेस ऑन इनोव्हेशन ही काही त्याची उदाहरणे आहेत. आत्मनिर्भर  भारत, स्टार्ट-अप इंडिया, स्टँड-अप इंडिया, मेक इन इंडिया यामागचा त्यांचा विचार अत्यंत महत्वाकांक्षी आणि दूरदर्शी आहे. महात्मा गांधी, सरदार पटेल, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, सुभाषचंद्र बोस आणि सर्व पंतप्रधानांची आकर्षक आणि सर्वोत्तम  स्मारके उभारण्याचे त्यांचे प्रयत्न देशाला  प्रेरणा देण्याबरोबरच  त्यांच्याप्रती कृतज्ञता दर्शवणारे आहेत.

राज्यघटनेला त्यांनी केलेले नमन, देशाचा कारभार चालवण्यासाठी राज्यघटनाच  सर्वोच्च मार्गदर्शक असल्याचे त्यांचे सांगणे, यावरून त्यांचे व्यक्तिमत्त्व कसे आहे, ते समजू शकते. पूर्वीच्या सरकारांनी आणि पंतप्रधानांनी केलेल्या चांगल्या कामाबद्दल त्यांनी अनेक वेळा कृतज्ञता व्यक्त केली आहे. त्यांचे  दोन छोटे निर्णय त्यांची  विचार करण्याची पद्धत दाखवतात.  व्हीआयपी संस्कृती आणि गाड्यांवरील लाल दिवा  यांना छेद देण्याचा निर्णय त्यांनी  घेतला. आणखी एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे  त्यांनी कागदपत्रांच्या स्व-सत्यापनासाठी मंजुरी  दिली.  लोकांवर विश्वास ठेवण्याची भावना यामागे होती.  इंग्रजांना तो विश्वास नव्हता  आणि हीच  परंपरा स्वातंत्र्यानंतरही चालू होती.

मोदी यांना काम करताना प्रत्यक्ष पाहण्याचे भाग्य आम्हाला लाभले. प्रत्येक मंत्रिमंडळाच्या बैठकीत ते मंत्र्यांचे मत विचारत आणि जर त्यांना एखादा मुद्दा खरोखरच पुन्हा विचार करण्यासारखा वाटला तर तो विषय तेव्हा  थांबवून नंतर आवश्यक सुधारणांनंतर ते तो विषय मंत्रिमंडळासमोर आणतात. जागतिक स्तरावरही ते सक्रिय आहेत.हवामान बदलाचा सामना करण्यासाठी पॅरिस करारात ‘हवामान न्याय’ आणि ‘जीवनशैली’ या संकल्पनांचा समावेश करण्यासाठी त्यांनी यशस्वीपणे धरलेला आग्रह आणि तोडगा काढण्यासाठी पॅरिसमध्ये  त्यांनी बजावलेले कुशल नेतृत्व यांचा मी साक्षीदार आहे.  ‘क्षमाशीलता मोठ्या अंतःकरणाचे प्रतीक आहे. एकमेकांबद्दल वाईट भावना न ठेवणे हा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे,’ हे पर्युषण पर्वानिमित्त त्यांनी नुकतेच केलेले ट्विट त्यांच्या व्यकितमत्वाचे दर्शन घडविणारे आहे.

कल्याणकारी धोरणाचे बोलके आकडे

  • दोन कोटी - ‘पंतप्रधान आवास योजने’तील घरे

  • बारा कोटी - शौचालये

  • चार कोटी - वीजजोडण्या

  • ५० कोटी - आयुष्यमान भारत योजनेच्या कक्षेत

  • २४ कोटी - ‘मुद्रा’ व अन्य रोजगाराभिमुख योजनांचे लाभार्थी

loading image
go to top