भाजपचे ध्येय अंत्योदयाचे

भारतीय जनसंघाच्या स्थापनेला ७१ वर्षे पूर्ण झाली; भारतीय जनता पक्ष या नव्या स्वरूपालाही आता ४२ वर्षे झाली.
BJP
BJPSakal
Summary

भारतीय जनसंघाच्या स्थापनेला ७१ वर्षे पूर्ण झाली; भारतीय जनता पक्ष या नव्या स्वरूपालाही आता ४२ वर्षे झाली.

‘भारतीय जनता पक्षाने आपली सरकारे केवळ जनहित डोळ्यांसमोर ठेवून चालवली आणि अंत्योदय हा त्याचा गाभा आहे’, अशी मांडणी करणारा लेख. भारतीय जनता पक्षाच्या आजच्या (ता. ६ एप्रिल) स्थापनादिनानिमित्त...

भारतीय जनसंघाच्या स्थापनेला ७१ वर्षे पूर्ण झाली; भारतीय जनता पक्ष या नव्या स्वरूपालाही आता ४२ वर्षे झाली. साठच्या दशकात पाच टक्के मते मिळविणारा पक्ष ऐंशीच्या दशकात आठ टक्क्यांवर, नव्वदच्या दशकात २० ते २५ आणि सध्या ३८ टक्के मताधार मिळविणारा भाजप देशातील सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. लोकसभेत ३०१ आणि राज्यसभेत १०० खासदार असलेला १९९० नंतरचा पहिलाच पक्ष. देशभरात १३८० आमदार असून, संसदेमध्ये सर्वांत जास्त दलित, आदिवासी, ओबीसी व महिला खासदार भाजपचेच आहेत. सध्या १३ राज्यांत भाजपचे मुख्यमंत्री आहेत. चार राज्यांत भाजपच्या सहभागाचे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) सरकार आहे. हा विस्तार स्तिमित करणारा असला तरी आपोआप झालेला नाही.

अमित शहा भाजपचे अध्यक्ष असताना त्यांनी सदस्यत्वासाठी ‘मिस्ड कॉल कॅम्पेन’ सुरू केले. ही योजना कितपत यशस्वी होईल, याची शंका होती. पण जनतेने अभूतपूर्व प्रतिसाद दिला. आता या माध्यमातून १५ कोटी सदस्य झाले आहेत. त्यांच्या तपशीलावरून वार्डनिहाय याद्या देशभर देण्यात आल्या. मी पुणे शहरातील सुतारदरा या झोपडपट्टीत सदस्य झालेल्या दीडशे महिलांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेलो. त्यांना तंत्रज्ञान माहित होते, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास होता. भाजप देशासाठी चांगला, याची खात्री होती. त्यामुळे त्या स्वतःहून पक्षसदस्य झाल्या. हीच भाजपची ताकद आहे.

यशाची त्रिसूत्री

भाजपच्या या यशाचे श्रेय त्रिसुत्री धोरणाला आहे. देश प्रथम हे धोरण, प्रखर राष्ट्रवाद ही ओळख आणि घराणेशाहीमुक्त पक्ष. देश प्रथम या धोरणाचा पहिला अाविष्कार पहिले पक्षाध्यक्ष श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी ३७० कलमाविरुद्ध केलेल्या आंदोलनात दिसले. आणीबाणीविरोधातही जनसंघाचे हजारो कार्यकर्ते तुरुंगात गेले. भाजपची एक ओळख हिंदुत्ववादी पक्ष म्हणून आहे. हे हिंदुत्व धार्मिक नसून सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे भारतीय जीवनाची ती शैली आहे.

दिल्लीत सर्व माजी पंतप्रधानांच्या कार्याचे दर्शन घडविणारे संग्रहालय १४ एप्रिलपासून सुरू होत आहे. आजवरच्या पंतप्रधानांच्या कार्याचा परिचय त्यांच्यावरील स्वतंत्र दालनाद्वारे करून दिला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून आणि संसदेतही अनेकदा या सर्व पंतप्रधानांचा व सरकारांचा देशाच्या विकासात वाटा आहे, हे सांगितले आहे. पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी पुलवामा आणि पठाणकोट येथे सैनिकांवर हल्ला केला. सरकारने लगेचच सर्जिकल स्ट्राईक आणि बालाकोट एअर स्ट्राईक करून पाकला अद्दल घडविली. आज जगामध्ये भारताचे स्थान खूप वरचे आहे. त्याचे दर्शन रशिया-युक्रेन संघर्षातही घडले. या युद्धात मोदी यांनी मध्यस्थी करावी, अशी विनंती अनेक देशांनी केली आहे.

भाजपने आपली सरकारे जनहितासाठी चालविली. अंत्योदयाचे तत्वज्ञान त्याचा गाभा आहे. जनता पक्षाच्या काळात हिमाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री शांताकुमार यांनी अंत्योदय योजना सुरू केली. गरीबांचे सबलीकरण हा त्याचा गाभा. आज प्रधानमंत्री आवास योजनेतून तीन कोटी घरे, १२ कोटी शौचालये, ३४ कोटी गरीबांची बॅंक खाती, ४ कोटी घरांत पहिल्यांदाच वीज मिळाली. कोट्यवधी गरीबांना १२ रूपये व ३३० रूपये अल्प प्रीमियममध्ये २ लाख रूपयांचा विमा, ५० कोटींना ५ लाखांपर्यंत मोफत उपचाराचा लाभ आयुष्मान भारत योजनेतून झाला. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतून १० कोटी शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रूपये, ५ कोटी घरांमध्ये पहिल्यांदाच नळाने पाणीपुरवठा, ९ कोटी महिलांना मोफत गॅस कनेक्शन, ५ कोटी तरूणांना कौशल्य प्रशिक्षण अशा जनहिताच्या अनेक योजनांचा आधार अंत्योदय तत्वज्ञानास आहे.

माजी पंतप्रधान राजीव गांधी म्हणायचे की, मी दिल्लीहून १०० रूपये पाठवतो, पण गरीबांपर्यंत १५ रूपयेच पोहोचतात. आता बॅंक खाते, आधार कार्ड आणि मोबाईल या जोडणीतून मोदी १०० रूपये पाठवतात आणि गरीबाला शंभरच्या शंभर रूपये मिळतात. मोदींच्या ‘डिजिटल भारत’चा हा प्रभावी आविष्कार आहे. गेल्या चार वर्षांत विविध योजना, अनुदाने, शिष्यवृत्त्या, निवृत्तीवेतन, मजुरी असे तब्बल २१ लाख कोटी रुपये गरीबांच्या खात्यांमध्ये थेट जमा झाले आहेत.

स्वातंत्र्याच्या पंचाहत्तराव्या वर्षाचा मोठा कार्यक्रम सरकारने आखला आहे, तो म्हणजे भारताला विकसित देशांच्या पंक्तीत नेणे. त्यासाठी रस्ते, बंदरे, विमानतळ, मालवाहतुकीचे कॅरिडोर, जलमार्ग, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य अशा सर्व आघाड्यांवर गतिशक्ती योजना आणि जोरदार विकास कार्यक्रम ठरविला आहे. आठ वर्षांत त्याची झपाट्याने अंमलबजावणी होत आहे. २००४ ते २०१४ या काळात मुंबई, दिल्ली, अमृतसर, वाराणसी, अहमदाबाद, पुणे अशा अनेक शहरांत दहशतवादी हल्ले झाले. गेल्या आठ वर्षांत जम्मू-काश्मीर वगळता देशात असे हल्ले झाले नाहीत. सर्व राज्यांशी केंद्राचा उत्तम समन्वय असल्याने नक्षलवादाच्या प्रभावाखालील क्षेत्र कमी झाले.

भाजपची मुख्य ताकद त्याच्या संघटनेत आहे. प्रत्येक बूथवर प्रभावी काम हा त्याचा गाभा. हे संघटन २४ तास कार्यरत राहाते. कोरोना काळातही कॉन्टॅक्ट ट्रेसिंगपासून अन्नछत्र चालविणे, लसीकरणासाठी पाठपुरावा, अडचणीतील जनतेला मदत अशा अनेक बाबतीत भाजप कार्यकर्ते देशभर आघाडीवर राहिले. पंतप्रधानांनी नुकतंच सर्व खासदारांना सांगितलं की तुमच्या मुलांना तिकीटे मिळाली नाहीत, याची जबाबदारी माझी. घराणेशाहीमुळे देशाचा मोठा तोटा झाला आहे. घराणेशाहीविरूद्ध लढा हेच पुढील काळातील भाजपचे सूत्र असेल. भाजपने देशाच्या राजकारणाला स्थिरता दिली. भाजपच देशाला नव्या उंचीवर नेईल, याची भारतीयांना खात्री वाटते.

(लेखक माजी केंद्रीय मंत्री व भाजपचे खासदार आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com