गावगाड्याच्या नोंदी ठेवणारा हेळवी

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्दावरून रण पेटत असतानाच कुणबी असल्याच्या नोंदींना विशेष महत्त्व आले आहे.
helvi with bullock
helvi with bullocksakal

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्दावरून रण पेटत असतानाच कुणबी असल्याच्या नोंदींना विशेष महत्त्व आले आहे. पूर्वापार पद्धतीने गावोगावी फिरून हेळवी अशा नोंदी संकलित करायचे. त्यांच्याकडील नोंदींवरून एखाद्या कुटुंबाची संपूर्ण वंशावळ स्पष्ट होते. त्यामुळेच आता या नोंदी विशेष महत्त्वाच्या ठरू लागल्या आहेत.

गाव आठवलं की, आजही डोळ्यासमोर उभा राहतो हेळवी. मोठ्या शिंगाचा बैल, त्याच्या पाठीवरील झूल. त्या बैलावर कधी बसून, तर कधी त्याचा कासरा हातात घेऊन प्रत्येक घरासमोर जाणारा. गावकऱ्यांच्या घोळक्यात राहणारा. प्रत्येक कुटुंबाची खडान् खडा माहिती घेणारा.

नवीन जन्माला आलेल्या मुलामुलींची वहीत नोंदी करणारा हेळवी. हेळवी दोन-तीन वर्षांनी गावात येतो. टाडा गोळा करतो. अर्थात प्रत्येक गावाची वंशावळ त्याच्या खास अशा वहीत असते. पिढ्यान् पिढ्या हेळवी हे काम करीत आले आहेत, कोणत्याही सरकारी मोबदल्याशिवाय.

वंशावळी राजेमहाराजांच्याच असतात असे नाही; तर सामान्य कष्टकरी, शेतकरी कुटुंबातील एखाद्याला आपल्या दहापिढीची वंशावळ समजून घ्यायची असेल तर हेळवी तातडीने वहीत पाहून सांगतो. त्याच्या खापरपंजोबाचा खापरपंजोबा कोण होता, अशी पूर्वजांची माहिती सांगतो.

बालपणी जेव्हा केव्हा हेळवी गावात यायचा तेव्हा त्याच्याविषयी कुतुहूल वाटायचे, ते त्यांच्या बैलाकडे पाहून. हेळव्याच्या डोक्यावरील पटका, जाकेट, धोतर, जाड पायतण, पिळदार मिशा असे त्याचे व्यक्तिमत्त्व. हा हेळवी लोकांच्या कुटुंबाची इत्यंभूत माहिती आपल्याकडे ठेवतो.

त्याच्या नोंदी कधी तरी कोणत्याही (भटके सोडून) समाजाला उपयोगी पडतील, असे स्वप्नातही कोणाला पाच-पन्नास वर्षांपूर्वी वाटले नसेल. खरंतर हेळव्यांकडील नोंदी कधीही खोट्या निघाल्या नाहीत किंवा त्याने कधी चुकीचे नोंदवले नाही. त्याचा परिणाम एखाद्या समाजाला भोगावा लागला, असे कधी घडल्याचे ऐकिवातही नाही.

गावगाड्यात तंटेबखेडे असतात. वाटणीवरून घरदार आणि शेतीची प्रकरणे न्यायालयात जातात. कधी प्रांत किंवा तहसिलदारांच्या दरबारातही जातात. सुनावणी होते. अशावेळी हेळव्याकडील नोंदींना महत्त्व असते. या नोंदीचा उपयोग न्यायदानासाठी झाल्याचे अनेक प्रकरणात दिसते. हेळव्यांकडील नोंदी न्यायालयात ग्राह्य मानल्या जातात, असा दावा अप्पा हेळवी करतात.

कुणबी वंशावळीचे महत्त्व

मराठा समाजाला आरक्षण देण्यावरून गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील वातावरण तापले आहे. ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत किंवा तसा पुरावा असेल अशांना कुणबी दाखले देण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. मराठा समाज हा कुणबी असल्याच्या नोंदीही आढळत आहेत. सांगली, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यात विशेषत: कुणबी नोंदी तुलनेने कमी आढळल्या आहेत.

बहुसंख्य कुणबी समाज रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे व पालघर तसेच विदर्भ आणि मराठवाड्यात आढळतो. तळकोकणात ९६ कुळी मराठा समाजही मोठ्या संख्येने आहे. रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात कुणबी समाजाची आडनावे पाटील, म्हात्रे, घरत अशी असतात. तेथील गावप्रमुख कुणबीच असायचा. तो सरपंच, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यही असायचा.

शेती कसणारा समाज म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. कुणबींशिवाय आगरी, भंडारी, हेडकरी भंडारी, कोळी, वंजारी, आदिवासी, वाडवळ (त्यामध्ये चौकळशी, पाचकळशी) इत्यादी जाती आढळतात. मुळातच येथील कुणबी इतर मागास समाजात (ओबीसी) वर्षानुवर्षे आहे. त्यामुळे त्याला आरक्षणाचे फायदेही कायमच मिळत आले आहेत.

मात्र ९६ कुळी मराठ्याच्या दाखल्यावर कुणबी नसल्याने तो आरक्षणापासून दूरच आहे. मनोज जरांगे पाटील हे सरसकट मराठ्यांना कुणबी दाखले देण्याची मागणी करीत असले तरी तसे दाखले देता येतील का? हा प्रश्‍न आहे. जरांगे पाटलांनी हा विषय हातात घेतल्यानंतर कुणबींच्या नोंदी सरकारला शोधाव्या लागल्या. तशा नोंदीही आढळत आहेत. आता हेळवीही त्याच्या वह्या पुन्हा पुन्हा पाहत आहेत.

काही ९६ कुळी मराठ्यांना कुणबी व्हायचे नाही. त्यांना कुणबी होणे पसंत नाही, असे नेते अर्थातच कुणबींपेक्षा आपण श्रेष्ठ आहोत, असे समजतात. वंशावळीच्या नोंदींविषयी अप्पा हेळवी यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘हैदराबाद संस्थानामध्ये नोंदी ठेवण्याच्या कामाला खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला.

आज मराठा नोंदींसाठी हेळव्याच्या नोंदी जरी विचारात घेतल्या जात असल्यातरी काही संघटनांचा त्याला विरोध आहे. सरकारी दप्तरीच्या नोंदीचीही त्याला जोड हवी, असे त्यांचे म्हणणे योग्यच आहे. हेळव्याचे काम पिढ्यान् पिढ्या सुरू आहे. आम्ही केवळ मराठा समाजाच्या नव्हे; तर गावातील साळी, माळी, रामोशी, धनगर, सुतार, कुंभार, नाभिक अशा सर्वच जातीच्या नोंदी ठेवल्या आहेत.

कैकाडी, गोसावी, बहुरूपी किंवा पारधी अशा भटक्या समाजाच्या मात्र नोंदी आमच्याकडे नाहीत. कारण ते एका गावात कधी राहातच नसत. आमच्याकडे वंशावळीच्या ज्या नोंदी आहेत त्या ताम्रपटासह मोडी आणि मराठीत आहेत. आजही काही हेळवी मोडीत नावे नोंदवत असतात.

राज्यात पाच हजार हेळवी

अप्पा हेळवी सांगतात की, आमचा हेळवी समाज महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगण आणि कर्नाटक या राज्यांमध्ये पसरलेला आहे. महाराष्ट्रात आज आमच्या समाजाची लोकसंख्या केवळ पाच हजार आहे. राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये हेळव्यांना भाट म्हणतात. अहमदनगरमध्ये नोंदी आढळतात त्या राजस्थानातील भाट समाजाने केल्या आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

ही माहिती सांगत नाही!

अप्पा हेळवी यांनी आणखी एक महत्त्वाची बाब सांगितली. ते म्हणाले, ‘पूर्वी एखाद्या माणसाचा मृत्यू कशाने झाला, याच्याही नोंदी आमच्या वंशावळीमध्ये आहेत. कोणाचा शुगर, बीपीने, ह्दयविकार, पटकी, देवीच्या रोगाने, कुष्ठरोगाने मृत्यू झाला याची नोंद आहे. काही जणांचे खून झाल्याच्यासुद्धा नोंदी आहेत. हा खून शेतीच्या वादातून झाला की, अन्य कोणत्या कारणामुळे याची माहितीही आहे. मात्र, हे आम्ही कधीही सांगत नाही. आमच्या नोंदीच्या आधारे नवा कोणताही वाद जन्माला येऊ नये, याची काळजी आम्ही घेतो.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com