सारांश : झळा लागल्या जिवा...

प्रसाद इनामदार 
बुधवार, 12 जून 2019

दुष्काळाच्या झळा सुसह्य करणारा वळीवही यंदा रुसला आहे. कडक उन्हामुळे पश्‍चिम महाराष्ट्रात पाणवठे कोरडे पडलेत, धरणांनी- विहिरींनी तळ गाठला आहे. आता बळिराजाचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. 

दुष्काळाच्या झळा सुसह्य करणारा वळीवही यंदा रुसला आहे. कडक उन्हामुळे पश्‍चिम महाराष्ट्रात पाणवठे कोरडे पडलेत, धरणांनी- विहिरींनी तळ गाठला आहे. आता बळिराजाचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. 

गेल्या वर्षी पावसाला विलंबाने सुरवात झाली; मात्र त्यानंतर त्याने "बॅकलॉग' भरून काढला आणि दुष्काळाचे संकट काही प्रमाणात का होईना टळले. यंदा मात्र कहर झाला. परतीच्या पावसाने पाठ फिरवली. नंतर कडाक्‍याच्या उन्हाळ्यात दिलासा देणारा वळीव अपवाद वगळता पश्‍चिम महाराष्ट्रात बरसलाच नाही. उष्म्याचा पारा सातत्याने 38 ते 42 अंशांच्या घरात राहिल्यामुळे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होऊन अनेक जलसाठे कोरडेठाक पडले, तर अनेक मोठ्या धरणांनी तळ गाठला. कोयना धरणातील साठाही आकुंचन पावल्यामुळे वीजनिर्मिती अंशतः सुरू ठेवून पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागला.

1972 नंतर अशा प्रकारची परिस्थिती उद्‌भवल्याचे जाणकार सांगत आहेत. पाणी नसल्याने पशुधन जगवण्यासाठी कसरत सुरू आहे. अनेक ठिकाणी गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या योजना बंद पडल्या आहेत. त्यामुळे पाण्यासाठी दाहीदिशा भटकण्याची वेळ आली आहे. एकीकडे स्वतःचा जीव जगवायचा आणि दुसरीकडे पशुधन वाचवायचे, असा दुहेरी लढा सुरू आहे. नाही म्हणायला अनेक ठिकाणी टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे; पण त्यालाही मर्यादा आहेत. काही गावांना आठ-आठ दिवस पाणीच नसल्याने अनेकांवर गावे सोडून जाण्याची वेळ आली आहे.

अनेकांनी डाळिंब, द्राक्षाच्या बागा काढून टाकल्या आहेत. सांगली जिल्ह्यातील आठही दुष्काळी तालुके, सातारा जिल्ह्यातील माण, खटाव तालुके, सोलापूर जिल्हा, कोल्हापूर जिल्ह्यातील धनगरवाडे येथे पाण्याच्या थेंबासाठी संघर्ष सुरू आहे. आलेल्या टॅंकरमधून पाणी मिळवण्यासाठी त्यांच्या मागे मेंढरासारखे लोक पळत आहेत. पुरेसे पाणी नसल्याचा मोठा फटका दुग्धउत्पादन आणि कुक्कुटपालनाला बसला आहे. जनावरांना चारा देताना तो वेगवेगळ्या प्रकारचा देण्यावर मर्यादा येत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावांत पाण्यासाठी रात्रीचा दिवस करावा लागत असल्याचे दृश्‍य आहे. 

सांगली जिल्ह्यात टॅंकरचा आधार

सांगली जिल्ह्यातील पूर्व भाग दुष्काळात होरपळत असून, पिण्याच्या पाण्याच्या टॅंकरने द्विशतक गाठले आहे. चौदा वर्षांत टॅंकरची संख्या दोनशेवर जाण्याची ही तिसरी वेळ आहे. जिल्ह्यात सहा तालुक्‍यांतील 200 गावे, 1,251 वाड्या-वस्त्यांवरील चार लाख एक हजार लोक आणि सत्तर हजार जनावरांना 199 टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. अनेक ठिकाणी पुरेसे पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. शेती पिकली नाही, जी पिके होती ती करपून गेली आहेत. हाताला काम नाही, कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे, ही माणसांची अवस्था; तर जनावरांची त्याहून बिकट. सध्या दहा चारा छावण्यांना मंजुरी मिळाली असून, पाच छावण्या सुरू झाल्या आहेत. 

जलसमृद्ध कोल्हापूर जिल्ह्यातही टंचाई

काळम्मावाडी, राधानगरी, तुळशी धरण आणि छोट्या-मोठ्या तलावांमुळे कोल्हापूर हा पाण्यासाठी समृद्ध जिल्हा म्हणून ओळखला जातो. या ओळखीला यंदा धक्का बसला असून, जूनच्या पहिल्या आठवड्यात राधानगरी तालुक्‍यात टॅंकर सुरू करण्याची वेळ आली आहे. महत्त्वाच्या तिन्ही धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी घट झाली असून, हा पाणीसाठा काही दिवस पुरेल एवढाच आहे. गतवर्षी परतीचा पाऊस न झाल्यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे. सध्या जिल्ह्यातील 109 गावे आणि 188 वाड्यांवर पाणीटंचाईचे संकट गहिरे झाले आहे. आणखी आठ दिवसांत पाऊस पडला नाही, तर अनेक गावांना टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ येणार आहे. 

खटाव, माणला सर्वाधिक फटका

कोयनेसह धोम, बलकवडी आदी धरणांतील पाण्याने तळ गाठलेला आहे. कोयना धरणात तर धरण बांधल्यानंतर पहिल्यांदाच अशी परिस्थिती उद्‌भवल्याचे सांगतात. त्यामुळे पाण्याचा काटेकोर वापर होत आहे. पाणीटंचाई जिल्ह्यात सर्वत्र जाणवत असली, तरी सर्वाधिक फटका माण आणि खटाव तालुक्‍याला बसला आहे. येथील बहुतेक लघु पाटबंधारे प्रकल्प कोरडे पडले आहेत. त्यामुळे जनावरांना चारा उपलब्ध होत नाही. हे पशुधन जगवण्यासाठी जिल्ह्यात सरकारी व खासगी अशा 40 छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. 

एकीकडे दुष्काळाने होरपळ सुरू असताना त्यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्नही अगदी निगुतीने सुरू आहेत. सरकारी पातळीवर जे प्रयत्न व्हायचे ते होवोत; पण आपल्या बांधवांचे आपण देणे लागतो, या जाणिवेतून अनेक सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन खासगी टॅंकरने पाणीपुरवठा, चारा छावण्यांसाठी चाऱ्याची मदत केली आहे. काही ठिकाणी वैयक्तिक पातळीवर आपल्या घरचे पाण्याचे स्रोत ग्रामस्थांसाठी खुले केले जात आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prasad Inamdar Writes about Monsoon Situation