ज्ञानरचनावाद प्रभावी करूया

prasad manerikar
prasad manerikar

ज्ञानरचनावाद प्रभावी होण्यामागे प्रयोगशील शाळांनी केलेले काम महत्त्वाचे आहे. रचनावाद शिक्षणात अधिक प्रभावीपणे आणायचा असेल, तर आपल्याला अजून मोठा पल्ला गाठण्याची गरज आहे. योग्य दिशेने प्रयत्न केले, तर निश्‍चितपणे हे उद्दिष्ट गाठता येईल.

गेल्या साधारण तीन वर्षांमध्ये महाराष्ट्रात प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत काही सकारात्मक बदल घडून आले. अनेक सरकारी आणि खासगी शाळा रचनावादी शिक्षण पद्धतीने प्रेरित होऊन त्याच्या अंमलबजावणीच्या दिशेने पावले टाकत आहेत आणि ही बाब निश्‍चितच अभिमानाची आहे. गेल्या तीन-चार वर्षांच्या काळात अनेक शिक्षकांनी रचनावादाचे धडे गिरवायला सुरवात केली, शैक्षणिक साहित्यनिर्मिती केली, विविध उपक्रम तयार केले. समाजमाध्यमांच्या प्रभावी वापरामुळे हे उपक्रम इतर शिक्षकांपर्यंत वेगाने पोचले आणि शालेय पातळीवर काही ना काही बदल होऊ लागले, जे स्वागतार्ह आहेत.

या काळात अनेक जिल्हा परिषद व नगरपालिकांच्या शाळांचे रूप बदलायला सुरवात झाली. शाळांच्या भिंती रंगवणे, जमिनीवर उपक्रम करण्यासाठी काही व्यवस्था करणे, उपक्रम मांडणे, शैक्षणिक साधने तयार करून वा विकत आणून त्यांची संख्या वाढवणे या बाबी सुरू झाल्या. या बदलांचे फायदे निश्‍चितपणे दिसू लागले. शाळेचे रूप बदलले, शाळा, वर्ग जास्त संवादी होऊ लागले आणि यातून निश्‍चितपणे काही एका पातळीपर्यंत शैक्षणिक गुणवत्ताही सुधारण्यास मदत झाली. ‘असर’सारख्या अहवालातूनही हे सकारात्मक बदल दिसून आले. या बदलांचा परिणाम म्हणजे काही गावांमधून इंग्रजी माध्यमांच्या शाळांतील मुले जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये येऊ लागली. खरे तर ही सुरवात आहे. रचनावाद शिक्षणात प्रभावीपणे आणायचा असेल, तर आपल्याला अजून मोठा पल्ला गाठायला हवा. योग्य दिशेने प्रयत्न करायला सुरवात केली, तर निश्‍चितपणे आपण उद्दिष्टांपर्यंत पोचू शकतो, असा विश्वास देण्याचे काम झाले आहे.

अजूनही रचनावाद म्हणजे शाळेत साहित्य, साधने वाढवणे, जमिनी शैक्षणिक बाबींनी रंगवणे; तसेच भिंतीवर चित्रे, मुलांच्या कामासाठीची जागा वाढवणे इतक्‍याच मर्यादित अर्थाने सार्वत्रिक पातळीवर घेतला जातो. खरे तर रचनावाद ही मुलांची शिकण्याची नैसर्गिक पद्धत म्हणून सार्वत्रिक मान्यता पावलेली पद्धत आहे. नैसर्गिक यासाठी म्हणायचे की मुळात शिकणे ही मुलांची उपजत प्रेरणा आहे. मुलांना शिकायला आवडते. ती त्यांना मिळालेल्या उपजत प्रेरणेने आणि नैसर्गिक पद्धतीने शिकत जातात. मुले आपले ज्ञान आपण मिळवतात, असे रचनावाद सांगतो. म्हणजेच मुले त्यांच्या अनुभवांतून, कृतीतून त्या घटकासंबंधी ज्ञान मिळवतात. अगदी लहान मुलांचे निरीक्षण केले तरी ही गोष्ट प्रत्ययाला येते. त्यामुळे आपल्याला यापुढे रचनावाद अधिक प्रभावी करण्यासाठी काही गोष्टींचा निश्‍चितपणे अवलंब करावा लागणार आहे. रचनावादी पद्धतीमध्ये महत्त्व हे शिकवण्याला नसून, शिकण्याला आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या भाषेपासून बदल करावा लागेल. ‘आम्ही रचनावादी पद्धतीने शिकवतो’ असे म्हणण्यापेक्षा ‘आमच्या शाळेत मुले रचनावादी पद्धतीने शिकतात’ आणि शिक्षक म्हणून आम्ही काय करतो, तर मुलांना रचनावादी पद्धतीने शिकण्यासाठी मदत करतो, अशी भूमिका शिक्षकांची असावी लागेल. त्यामुळे पारंपरिक शिकवण्याच्या पद्धतीला छेद देऊन मुलांसाठी शिकण्याला पूरक वातावरण निर्माण करावे लागणार आहे. मुले अनेक गोष्टी करून पाहतात, स्वतः अनुभव घेतात. हे सारे अनुभव केवळ शाळेच्या चार भिंतींमध्ये व शाळेच्या परिसरात उभे करणे अशक्‍य आहे. त्यामुळे शिक्षण हे शाळेबाहेरील परिसरात आणि समाजात घेऊन जावे लागणार आहे. मूल जिथे शिकू शकेल, त्या बाबी शाळेशी जोडाव्या लागतील. हे करण्यासाठी पाठ्यपुस्तकांवर आधारित शिक्षण करण्यापेक्षा कौशल्य विकसन आणि संकल्पना स्पष्टीकरण यांचा विचार करावा लागेल आणि हे मुले ज्या परिसरात वावरतात, तेथील त्यांच्या अनुभवांशी जोडत जावे लागेल. रचनावादाचा अजून एक महत्त्वाचा पैलू आहे, तो म्हणजे प्रत्येक मुलाचा व्यक्तिगत विचार. याचे कारण प्रत्येक मूल स्वतंत्र असते, त्याची शिकण्याची पद्धत, कृती करण्याचा वेळ वेगवेगळा असतो, असे रचनावाद मानतो. त्यामुळे प्रत्येकाला त्याच्या गरजांनुसार संधी मिळणे आणि त्याच्या गरजेनुसार शिक्षण मिळणे आवश्‍यक आहे. एखाद्याची गरज लेखनासाठी जास्त वेळ देण्याची असेल, तर त्याला तो मिळावा लागेल किंवा एखाद्याला चित्रकामात अधिक वेळ गरजेचा असेल, तर त्याला मिळावा लागेल. म्हणजेच शिक्षण हे तासिकांमधून बाहेर काढावे लागेल. हे कसे करायचे, याच्या प्रभावी पद्धती आज उपलब्ध आहेत, आपल्याला त्या आपल्या सोयीने बदलून घ्याव्या लागतील. वर परिसराचा उल्लेख केला तो परिसर मुलाच्या शिक्षणासाठी अनेक दृष्टीने महत्त्वाचा आहे. मुलाच्या अनेक संकल्पना स्पष्टतेसाठी आवश्‍यक ते घटकद्रव्य परिसरातून मिळत असतात. मूल जे शिकते ते करून पाहण्याच्या संधी पुन्हा परिसरात उपलब्ध असतात आणि अशा संधी जाणीवपूर्वक द्याव्याही लागतात. त्यामुळे मुलांचे शिक्षण प्रभावी होण्यासाठी घर-शाळा-परिसर अशी तिपेडी वीण अधिक बळकट करावी लागणार आहे. कारण मूल शाळेत शिकत असले, तरी त्या शिकण्याचा उपयोग त्याला समाजामध्ये करायचा असतो. त्यामुळे शिक्षण आणि समाजाची रचना यांची सांधेजोड करावी लागेल. समाजात वावरण्यासाठी सक्षम शिक्षण कसे मिळेल, याचा विचार करावा लागणार आहे. यासाठी शिक्षक प्रशिक्षण व पालक प्रबोधन या दोन्ही मुद्यांना हात घालावा लागेल. मुलांच्या शिकण्याला त्याच्या घराशी कसे जोडून घेता येईल आणि शालेय शिक्षणात पालक त्यांचे ज्ञान कसे वापरू शकतील, असा दुहेरी विचार करावा लागणार आहे, त्यातून निश्‍चितपणे जबाबदारीची जाणीव पालकांमध्ये निर्माण होईल. आता शाळेत असलेल्या पालक समित्या या दृष्टीने अधिक प्रभावीपणे काम करू शकतील. यातूनच भोवतालच्या प्रश्नांशी शिक्षण जोडता येऊ शकेल.
गेल्या काही वर्षांत आणखी एक सुखावह बदल होतो आहे, तो म्हणजे महाराष्ट्रातील प्रयोगशील शाळांची संख्या वाढू लागली आहे. रचनावाद प्रभावी होण्यामागे या प्रयोगशील शाळांनी केलेले काम महत्त्वाचे आहे. या शाळांतून नवा विचार आणि शिक्षणपद्धतीचा अवलंब केला जात आहे. समाजाचाही अशा शाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होऊ लागला आहे. या शाळा प्रयोग करत राहतील, ते त्यांचे कामच आहे. या शाळांतून वापरल्या जाणाऱ्या प्रयोग-पद्धती तपासून घेऊन त्यांचा प्रसार करण्यासाठी आपण यंत्रणा उभी करू शकलो तर ती मोठी भर ठरू शकेल. रचनावादी शिक्षणाचा सुरू झालेला हा प्रवास आता थांबवता कामा नये. पुढील सहा महिन्यांत विधानसभेच्या निवडणुका होतील, नवे सरकार येईल. त्या वेळी यात आवश्‍यक त्या सुधारणा व मदत करणारी धोरणे आखली जावीत, यासाठी सक्षम तयारी करावी लागणार आहे. शिक्षकांना प्रयोग करायला प्रोत्साहन मिळणे, त्यासाठी आवश्‍यक बदल करणे, चुका करायची व त्या सुधारायची संधी मिळणे हे व्हावे लागेल. त्यातून येत्या काळात शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल होऊ शकतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com