व्हॉट्‌सॲपवरच्या ‘खोट्या बातम्या’!

व्हॉट्‌सॲपवरच्या ‘खोट्या बातम्या’!

कोरोनाच्या काळामध्ये सोशल मीडियावर, त्यातही प्रामुख्याने व्हॉट्‌सॲपवर कोरोनासंबंधीच्या विविध पोस्ट्सचं पेव फुटलं होतं. त्यात जगात कुठं किती हाहाकार माजला आहे इथपासून कोरोना कुटिल डाव असल्यापर्यंतच्या टोकाच्या पोस्ट्स असायच्या. अमुक केल्यानं कोरोना होत नाही, तमुक केल्यानं खडखडीत बरा होतो, अशीही माहिती असायची. त्या काळात कोरोनासंबंधी असलेल्या भीतीमुळे आपल्याला आलेली प्रत्येक पोस्ट अत्यंत भक्तिभावाने वाचली जायची आणि आपल्या सर्व कॉन्टॅक्ट्सना फॉरवर्डही केली जायची. या पोस्ट्समुळं कोरोनाविषयीच्या भीतीमध्ये भरच पडली होती. अफवा, खोट्या बातम्या अत्यंत वेगानं पसरल्या जाणं, हे विशेषतः व्हॉट्सॲपच्या वापराचं एक अत्यंत भेसूर रूप आहे. अर्थात, हा प्रकार फक्त कोरोनाच्या काळापुरताच मर्यादित नाही. सोशल मीडियाच्या सुरुवातीपासून इंटरनेटच्या आणि ई-मेलच्या सुरुवातीपासूनच हे प्रकार सुरू आहेत. सोशल मीडिया प्रचंड वाढलेल्या वापरामुळे या गोष्टी तयार होण्याचं प्रमाण वाढलं आहे आणि अत्यंत वेगानं पसरणं शक्य झालं आहे. 

मुळात अशा अफवा किंवा खोट्या पोस्ट्स कोण आणि का तयार करतं, असा प्रश्न नेहमी पडतो. व्हॉट्‌सॲपच्या स्वरूपामुळं कोणतीही फॉरवर्ड पोस्ट मुळात नेमकी कोणी लिहिली, हे तपासणं केवळ अशक्य असतं. या अनामिकतेचा फायदा घेऊन काही विघ्नसंतोषी लोक अशा पोस्ट्स लिहीत असावेत. व्हॉट्सॲपवर ढळढळीत खोट्या बातम्या पसरवण्यामागं समाजात जाती-धर्मांवर आधारित तेढ निर्माण करणं, एखाद्या राजकीय पक्षाचा प्रचार-प्रसार करणं, आपल्या विरोधी मताच्या पक्षांना वा नेत्यांना बदनाम करणं, असे काहीही अंतस्थ हेतू असू शकतात. अर्धवट ज्ञानावर आधारित असलेल्या किंवा कोणत्याही तथ्याचा आधार नसलेल्या पोस्ट्स मात्र लोकांना मदत करायच्या चांगल्या हेतूनं लिहिलेल्या असू शकतात. मात्र, त्यांना तथ्याचा आधार नसल्यानं त्या वाचून त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांची दिशाभूल अथवा नुकसान होऊ शकतं. 

दिशाभूल होऊ नये यासाठी... 
 कोणताही ‘महत्त्वाचा वाटणारा’, काहीतरी भीषण घडलंय, असं सांगणारा किंवा काही औषधोपचार असलेला मेसेज आपल्या व्हॉट्‌सॲपवर येऊन कोसळला, की त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवायचा नाही.

 असा कोणताही मेसेज वाचून घाबरायचं अथवा पॅनिक व्हायचं नाही. 

 त्यानंतर आलेल्या मेसेजचा, बातमीचा खरे-खोटेपणा तपासणं. हे वाटतं तितकं अवघड नाही. तुमच्याकडं आलेल्या बातमीची सत्यता गुगलवर तपासावी. असा सर्च केल्यास अक्षरशः काही सेकंदांत तिचा खरे-खोटेपणा समोर दिसतो. 

 कोणतीही महत्त्वाची वाटणारी बातमी किमान दोन-चार स्वतंत्र आणि प्रतिष्ठित वर्तमानपत्रांच्या साइटवरून किंवा त्यांच्या ट्विटर हँडलवरून तपासून पाहिल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवायचा नाही! 

 ‘कोणत्याही महत्त्वाच्या वाटणाऱ्या बातमीचा खरेखोटेपणा मी स्वतः तपासला नसेल, तर ती बातमी मी पुढे कोणालाही पाठवणार नाही,’ असा नियम स्वतःसाठी करायचा. 

 ज्या बातमीची सत्यता आपण पडताळून पाहिलेली नाही, ती पुढे न पाठवणं हा कोणतीही अफवा वा खोटी पोस्ट पसरू नये, यावर उत्तम उपाय असतो. 

 व्हॉट्सॲप आणि एकूणच सोशल मीडियावरच्या अफवा, खोट्या बातम्या आणि दिशाभूल करणाऱ्या पोस्ट्सपासून स्वतःचं आणि आपल्या मित्रपरिवाराचं रक्षण करत राहणं म्हटलं तर अगदी सोपं असतं. त्यासाठी फक्त सतत जागरूक राहावं लागतं! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com