हवामान अंदाजाचा ‘निसर्ग’ वेध 

हवामान अंदाजाचा ‘निसर्ग’ वेध 

कोकण किनारपट्टीवर नुकताच ‘निसर्ग’ चक्रीवादळाने तडाखा दिला. मात्र, हवामान अंदाजाचे प्रगत तंत्रज्ञान, अत्याधुनिक यंत्रणेच्या मदतीने आपण चक्रीवादळाचा यशस्वी सामना करू शकलो. त्यामुळे प्राणहानी व वित्तहानीही कमीत कमी झाली. हवामान अंदाजाबरोबरच दैनंदिन जीवनातही अद्ययावत तंत्रज्ञान उपयुक्त ठरतेय. 

सध्याच्या अद्ययावत तंत्रज्ञानाच्या काळात जीपीएसचे आगमन, मोबाईलचे नेव्हिगेशन आणि इच्छित ठिकाण शोधण्यातील सुलभता आदींमुळे प्रवास सहज आणि सोपा झालायं. वाहतूक व्यवस्थेशी तंत्रज्ञान व्यवस्थित जोडले गेले आहे. त्यामुळे, इच्छित ठिकाणांपर्यंत वेगाने प्रवास करता येतोय. ऑनलाईन उपलब्ध असलेले सविस्तर नकाशे, वाहतुकीची स्थिती, मॉडेल्सच्या मदतीने जवळचा रस्ता शोधण्यासही मदत होत आहे. त्याचप्रमाणे, इंटरनेटवरील संकेतस्थळे आणि ॲपवरीही याबाबत विविध प्रकारची माहिती उपलब्ध असते. तिच्या मदतीने तुम्ही हवी असलेली मोटारही दूरवरूनच शोधू शकता. 

तंत्रज्ञान आपल्याला प्रवासामध्ये मदत करतेय, तशीच त्याने नुकतेच निसर्ग चक्रीवादळाचा सामना करण्यातही मदत केली. निसर्ग चक्रीवादळ अरबी समुद्रात निर्माण झाले होते. दोन दिवसांपूर्वीच ते कोकण किनारपट्टीला धडकले. चक्रीवादळ धडकण्याचे ठिकाण, वेळ आणि हवामानाचा अंदाज वेधशाळेने वर्तविला. त्यासाठी, उपग्रह आणि पृथ्वीवरील विविध ठिकाणच्या हवामान स्थानकांकडून आलेल्या माहितीचा वापर करण्यात आला. या सर्वांच्या मोजमापातून एक प्रकारची परिणामात्मक माहिती तयार झाली. तिचा वापर करून हवामानात नेमके कसे बदल होतील, याचा अंदाज वर्तवण्यात आला. जगभरात अनेक वैज्ञानिक आणि संस्थांनी गेल्या काही दशकांत त्याची अनेक मॉडेल विकसित केली आहेत. भारतीय हवामान खाते (आयएमडी), युरोपियन सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फोरकास्टस (ईसीएमडब्लूएफ) आणि नॅशनल वेदर सर्व्हिस (एनडब्लूएस) यांनी ग्लोबल फोरकास्ट सिस्टिम (जीएफएस) हे मॉडेल विकसित केले. हे मॉडेल उपलब्ध परिमाणात्मक माहितीचा वापर करते. त्यानंतर, महासंगणक या माहितीचे मोजमाप करतो. त्यातून हवामान अंदाज वर्तविला जातो. आता अशा प्रकारची माहिती इंटरनेटवर प्रसिद्ध करता येते. मोबाईल ॲपवरही ती उपलब्ध झालीय. mausam.imd.gov.in आणि windy.com ही अशी माहिती देणारी काही संकेतस्थळे होत. स्मार्टफोनवरील ॲप्सवर माहिती उपलब्ध असल्यामुळे प्रत्येक नागरिकाला ती सविस्तरपणे उपलब्ध होतेय. वेब किंवा ॲपवरील डायनामिक व्हिज्युअल डिस्प्लेमुळे मॉडेल सुरू करता येते. पुन:पुन्हा पाहता येते. चक्रीवादळासारख्या नैसर्गिक आपत्तीचे वेळ आणि ठिकाण दृश्य स्वरूपात दिसते. त्यामुळे, एखादी व्यक्ती चक्रीवादळाचे ठिकाण, तीव्रता आणि वेळ या माहितीच्या आधारे त्याची हालचाल पाहू शकते. अशा प्रकारे दूरसंचार आणि मोबाईल तंत्रज्ञानाने हे आपल्या सर्वांसाठी उपलब्ध करून दिले. 

१. तंत्रज्ञानामुळे ‘निसर्ग’चा सामना 
आपल्या हाताशी असलेल्या अद्ययावत तंत्रज्ञानामुळे आपण ‘निसर्ग’ चक्रीवादळापूर्वी वेगाने पावले उचलली आणि प्राणहानी व वित्तहानी कमी करू शकलो. हवामानाचा अंदाज, दळणवळण आणि अंतर्गत नेटवर्कमुळे हे शक्य झाले. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे सुयोग्य उपयोजन असलेला हवामान अंदाज हा या सर्वांचा गाभा होय. 

२. हवामान अंदाजाची अचूकता 
दिवसेंदिवस अधिकाधिक माहितीची उपलब्धतता आणि अचूक मॉडेलमुळे हवामान अंदाजही अधिकाधिक अचूक होतोय. हवामानाची वर्तमानकालिन स्थिती आणि मॉडेल्समधून वर्तविलेल्या हवामान अंदाजामुळे आवश्यक पावले उचलण्यास मदत होते. 

३. तंत्रज्ञानाला अत्याधुनिक यंत्रणेची साथ 
हवामान अंदाजाच्या या तंत्रज्ञानाला आता अत्याधुनिक यंत्रणेची साथ लाभलीयं. त्यामुळे, माहिती मानवी वाचनाच्या दृष्टिने दृश्यमान करणे शक्य झाले आहे. त्यामुळे, परिणामकारकता आणखी वाढली आहे. 

४ दैनंदिन जीवनात फायदा 
अशा प्रकारचे हवामान अंदाज आपले जीवन जगण्याचा जणू मार्गच बनले आहेत. ॲप, संकेतस्थळांवरील सविस्तर माहितीमुळे कुणीही सामान्य मनुष्याला आपल्या दिनक्रमाचे नियोजन करणे शक्य झाले आहे. अशा प्रकारे, हवामानासोबतच वाहतुकीचे ‘नेव्हिगेशनही’ तपासल्यामुळे दैनंदिन जीवनातही सुलभता येऊ शकते. 

(अनुवाद : मयूर जितकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com